वैराटगड आणि प्रवास (भाग १ )
वैराटगड आणि प्रवास (भाग १ ) ७ ऑक्टोबर २०२३
सह्याद्री आणि
गडकोट हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. गेल्या आठवड्यात एम आय टी च्या
विद्यार्थ्यासोबत वैराटगड जाण्याचा योग आला.
adventure club आणि गिरीप्रेमी संस्थेचा हा संयुक्त उपक्रम जोरदार सुरु
आहे. यातूनच अनेक विद्यार्थी ट्रेकवर जाताहेत. मी देखील यात सहभागी होतो म्हणून सकाळी
साडेपाच वाजता कॉलेजला पोहोचलो. बऱ्यापैकी विद्यार्थी पोहोचले होते. एरवी सकाळी
साडे सात किवा आठच्या वर्गाला लेट होणारी मुलं मात्र उत्साहात तिथे हजर होती. रोजच्या
त्याच त्याच जीवनशैलीला बाजूला ठेवत वर्गमित्रांसोबत ट्रेकला जाणे कोणाला आवडणार
नाही बरं? असो.
वेळेत गाड्या
निघाल्या. मुलांचे रिपोर्टिंग घेणे, फॉर्म जमा करणे असे अनेक सोपस्कार पार पडले
होतेच. गाड्या निघाल्या आणि गणपती बाप्पा मोरयाचा नाद घुमला. बसेस निघाल्या आणि
उत्साह पाहण्याजोगा होता. मग काहीकाळ अंताक्षरी
तर काही काळ गाणी वाजत होती. आजकालच्या पिढीची संगीताची रुची जाणायची असेल तर अश्या ट्रेकवर सोबत जाऊन किमान
अडीच तास जी गाणी वाजतात ती प्लेलिस्ट जवळजवळ सारखीच आहे असे मला वाटले. माझ्या लिस्टमध्ये त्यातली काही गाणी होती यांचे
समाधान देखील होते. ज्या मुलांना शिकवायचं आहे, ज्यांच्यात रोज किमान आठ ते दहा तास रमायचं आहे त्यांची रुची, त्यांची
अभिरुची किमानपक्षी माहित असणे फायद्याचे ठरते असे मला वाटते. असो.
प्रवासाचा बराच
पल्ला पार केल्यानंतर पोटातून आवाज येऊ लागले होते. सकाळी इतक्या लवकर निघालेली
मुलं आणि प्राध्यापक मंडळी एव्हाना भुकेलेली झाल्याने गाडी ठरलेल्या थांब्यावर
थांबवून यथेच्छ ताव मारला. दुपारी गड चढून उतरल्यावरच जेवण मिळणार आहे हे ठावूक
होते आणि म्हणून जरा जास्त खाण्यात आले. आमचा चमू मोठा असल्याने जास्त उशीर होत
होता. पोटोबा निवांत झाला आणि मगच पुढे निघालो. आता पुढचा खाण्याचा प्रसंग किमान
चार शिवाय नाही हे मनाला समजावलं होतं मी.
गाड्या गडाच्या
पायथ्याशी पोहोचल्या. तिथे दोन गावकरी बंधू हजर होते. अश्या जास्त वर्दळ नसलेल्या
गडावर जातांना तेथील लोकल माहितीतील आणि खात्रीशीर सोबती हवेच. आजकाल सोशल मिडियामुळे
ठिकाणं विलोभनीय जरी दिसत असली तरी तिथं जाण्यासाठी आणि सुरक्षित परतण्यासाठी स्थानिक
लोक हवेच. अतीउत्साह कधी कधी जीवावर देखील बेतू शकतो . यासाठी हा सगळा प्रपंच. तेथील
एक्स्पर्टला भेटून, मुलांना काही सूचना देऊन ट्रेक सुरु झाला. वैराटगड ज्यांनी
एकदा ट्रेक केला असेल त्यांना जाणीव आहे की हा एक अवघड ट्रेक आहे. असो.
ट्रेक सुरु झाला.
गुगलवरील माहितीप्रमाणे वैराटगड हा शिलाहार राजा भोज ह्याने अकराव्या शतकात
बांधला. शिवकाळातही किल्ला केवळ एक लष्करी ठाणे म्हणूनच वापरात होता. शिवरायांनी
जेव्हा वाई प्रांत जिंकला तेव्हा ह्या परिसरातील वैराटगड, पांडवगड हे किल्ले देखील स्वराज्यात सामील
करून घेतले . पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. स्थानिक सहकाऱ्यानी बरीचशी माहिती दिली. त्यातील
एक जण मंदिर स्थापत्य याबद्दल रिसर्च करत आहे. सह्याद्रीमध्ये हिंडत शोध आणि संशोधन
सुरु आहे असे देखील नमूद केले.
गडाची चढण थोडी
कठीण होती. सोबत असणारी मुलं देखील पहिल्यांदाच असा ट्रेक करत असल्याने हळूहळू वर
चालत होते. मध्ये मध्ये उत्साह आणि उमंग भरण्यासाठी घोषणा सुरु होत्या. एकमेकांना सांभाळत,
हात देत सगळे वरती वरती मार्गक्रमण करत होते. वर्गमित्र असल्याने विद्यार्थी मस्त
आनंद घेत गड सर करत होते. आपले मावळे हे असे गड झरझर चढून लढाई कसे करत असतील? ते
एवढा फिटनेस कसा राखू शकत असतील? आणि गनिमांना एक एक गड जिंकणे सोपे का नव्हते अश्या
अनेक प्रश्नांची उत्तरं आपोपाप सर्वांना मिळत होती.
क्रमश:
- प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर
Comments
Post a Comment