वैराटगड आणि प्रवास (भाग २ )

 

वैराटगड आणि प्रवास  (भाग २ ) १० ऑक्टोबर २०२३

किमान अडीच तास हळूहळू मार्गक्रमण करत, सह्याद्रीच्या वाटा तुडवत संपूर्ण चमू घडाच्या मुख्य द्वारापाशी पोहोचला. तिथं पोहोचेपर्यंत नव्वद टक्के लोकांच पिण्याचं पाणी संपलं होतं. प्रत्येकाने किमान दोन बाटल्या पाणी आणलं होतं पण गर्मी, ऊन आणि अशी सरळ चढाई यामुळे शरीर थकते आणि तहान लागल्याने पाणी पिणे अनिवार्य होते. मुख्य द्वारापाशी थोडा विसावा घेतला आणि स्थानिक मंडळीनी अडचण ओळखली. त्यांनी सर्वाना सावलीत बसवून सगळ्या बाटल्या गोळा करत काही मुलांना घेऊन पश्चिमेकडे घेऊन गेले. तिकडे किमान चार ते पाच पाण्याचे टाके आहेत आणि त्यात पिण्यायोग्य पाणी असते हे त्यांना ठावूक होते.

मी स्वत: सोबत गेलो. गडाच्या कडेकपारीतून थेंब थेंब टीपकणारे पाणी त्या टाक्यात जमा होत होते. तटाक्यातले पाणी अगदी थंड होते आणि स्वच्छ होते. मुलांनी जवळजवळ पन्नास बाटल्या भरून घेतल्या.  तिथे गडावर वास्तवास असणारी काही गगनगिरी भक्त हेच पाणी वापरत असल्याने ते खात्रीशीर होते हे नक्की. मग त्या थंड पाण्याने नवे चैतन्य भरले आणी पुन्हा घोषणा देत गडावर फेरफटका मारला. गडावर एक प्राचीन मंदिर आहे. छोटंसं शेड असल्याने बसण्याची सोय आहे.  एव्हाना दुपार झाल्याने सर्वांना सोबत आणलेल्या  खाद्यपदार्थावर सर्व तुटून पडले. एकमेकांना शेयर करत क्षुधा शांती झाली. पोटोबा झाल्यानंतर स्थानिक दादांनी तिथली भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती दिली. या अश्या कमी वर्दळ असलेल्या गडावर बरीच नवीन माहिती ऐकायला मिळते.

पुढे दोन अतिशय भारी आणि विशेष गोष्टी पाहायला मिळाल्या. एक म्हणजे गडावरील चोरवाट. वैराटगडावर शस्त्रकोठार होते . आपात्कालीन परिस्थितीत महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी ही वाट असावी. गडाच्या एकदम मागच्या टोकाला किमान पन्नास फुट थेट खाली जाणारी वाट पाहून सर्व विद्यार्थी थक्क झाले. युद्ध नीती आणि गडाच्या रचना लक्षात येत होत्या. या वाटेतून खाली जाणे किती अवघड असेल हा अंदाज सगळ्यांनाच आला होता. या वाटेवरून उतरण्यासाठी एककर दोरखंड  हवा किंवा कसरत करत उतरावे लागे.

दुसरी एक विशेष बाब स्थानिक दादांनी दाखवली ती म्हणजे गडावरील शौच व्यवस्था. अगदी मागच्या बाजूला गडाच्या भिंतीला खेटून भारतीय प्रकारातील शौच व्यवस्था होती. आजही ती वापरली जाऊ शकते असे सांगण्यात आले. हा उल्लेख यासाठी कारण ब्रिटीश आणि मुघलसाम्राज्य यांच्या प्रदीर्घ राजवटीने आपण हा विचार करणे सोडूनच दिलं आहे की आमच्या देखील सार्वजनिक व्यवस्था होत्या.  मोहेंजोदडो आणि हडप्पा तर उत्तरे देतातच पण गडावरील टाके, शौच गृहे, चोर वाटा आणि अश्या अनेक गोष्टी स्वराज्य आणि आमच्या त्या काळातील दीर्घदृष्टी दर्शवतात.

संपूर्ण गड फिरून सर्व परत निघालो. काळजी घेत खाली उतरलो. गडावर जाणे तसे सोपे पण खाली उतरतांना तोल जाऊ शकतो म्हणून जास्तीत जास्त काळजी घेत सर्व खाली आलो. पूर्ण दिवस ढग आणि ऊन असा लपंडाव सुरु होता पण पर्जन्य देव काही प्रसन्न झाले नाहीत. सर्व खाली आले आणि एक समाधान होते ते सर्वाना गडावर जाऊन सुरक्षित खाली येण्याचे.  चेहऱ्यावरचा आनंद खास होता कारण आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा उघड करणारा हा ट्रेक होता. गिरीप्रेमी संस्था, एम आय टी समूह आणि स्थानिक लोक यांचे आभार मानत सर्व परत निघाले. ठरलेल्या ठिकाणी जेवण केलं आणि परतीचा प्रवास सुरु झाला. जेवण झाले आणि काही वेळातच गाडीत सामसूम झाली. थकवा आला असला तरी समाधान चेहऱ्यावर दिसत होते. सर्व एकमेकांना भेटत परत आपापल्या घरी निघाले. मनात जन्म घेत होती इच्छा  पुढच्या ट्रेकची. भेटू लवकरच पुढच्या ट्रेकला असे सांगत सर्व पसार झाले.  ते म्हणतात ना...शेवट गोड झाला पाहिजे.

धन्यवाद ..

-प्रा.डॉ. सचिन शंकर गाडेकर 

Comments

Popular Posts