पद्मावत २७/१/१८

पद्मावत २७/१/१८

संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत चित्रपट पाहणे म्हणजे भव्य दिव्य सेटची पर्वणी. रजपूत राजे आणि त्यांची भव्यता तश्याच खुबीने दाखवली आहे. आता पर्यंत केलेल्या चित्रपटापेक्षा एक काकण जास्त भरतील या सिनेमातील सेट. ती राज वस्त्रे आणि तो थाट पाहतच बसावे असे वैभव दाखवले आहे. हा देश आणि या देशात सोन्याचा धूर निघत असे असे का म्हणतात याचे आकलन होईल अश्या भव्यदिव्य चित्रणाने.

आता फोकस चित्रपटाकडे करूया. बहुधा भन्साळी मधेच बोर करतात हि रूढ समजही त्यांनी यावेळी मोडीत काढली. फक्त सेटचे कौतुक होत नाही तर लिहिलेले संवाद सुध्दा अप्रतिम आहेत. प्रत्येक संवाद दाद घेऊन जातो. गड, गडाचे वैभव, महाराज आणि राणीची वेशभूषा आणि बादशहाचा दरबार तर दिपवून टाकतात. हे सर्व अपेक्षितच होते.

या सगळ्यात चॉकलेट हिरो, लवर बॉयच्या इमेजने पछाडलेला शाहीद कपूर एक मस्त सरप्राइज आहे इथे. राजपूत राजा हुबेहूब रंगवलाय त्यानं. कुठलिही कसूर ठेवली नाही. खील्जीला माफ करण्याचा प्रसंग असो वा रणांगणात लढण्याचा. दीपिका आणि रणवीर सारख्या तगड्या कलाकारासमोर त्याचे अस्तित्व शेवटपर्यंत टिकून राहते. काही संवाद तर अंगावर काटा आणतात. जौहर करण्याची परवानगी तर निशब्द करते.

नायिका म्हणून दीपिकाची निवड २०० % बरोबर. नायिका म्हणून सुरवात, राजा जेरबंद झाल्यावर दिलेले संवाद, अचूकपणे मांडणे आणि चित्रपट रसिकांना भुरळ पाडणार घूमर नृत्य तर खासच. छत्राणीचा अविर्भाव पूर्णवेळ स्थिरावतो दिपिकामध्ये. कधीकधी तर शाहीद कपूर डावा ठरतो की काय असे वाटू लागते. एका महान चरित्राला न्याय देणे तसे अशक्यच परंतु मन जिंकून जाते ही नायिका.

शेवटी उल्लेख टाळलाच जाऊ शकत नाही अशी भूमिका रणवीर ने निभावलीय. क्रूरता, बिभत्सता, कपट आणि वासना हे सगळं जणू अंगावर पुरळ यावी इतक स्पष्ट चेहऱ्यावर दिसून येतं. रणवीर सिंग इथे पूर्ण भाव खाऊन जातो. एक कलाकार म्हणून आयुष्यातील एक सर्वोत्तम अभिनय केलाय असे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. खली बली गाण्यात तर राक्षस अंगात संचारावा असा नृत्याविष्कार आणि ते हिडीस फिडीस हावभाव तर अद्भुत, तोडच नाही. उन्माद असावा तर तो कसा याचा प्रत्यय येतो आणि नकळत प्रेक्षक खलनायकाच्या प्रेमात पडतात. रणवीर सिंग साठी पुन्हा एकदा पहावा इतका उच्चप्रतीचा अभिनय.

चित्रपटाचा शेवट तर अंगावर रोमांच उभे करतो. जौहरचा प्रसंग अभिमान आणि गर्व उभा करतो रजपूत स्त्रियांबद्दल. काय झाले असेल त्या चित्तोडवर. सगळं जिंकून देखील पराभव उघड्या डोळ्याने पाहणारा शत्रू आणि रजपूतानी वीरांगना कवेत घेत उठणाऱ्या अग्नीच्या ज्वाला स्तिमित करतात.

या सगळ्यात झालेला वाद पाहताना मनात कुठेही डोकावत नाही असे मला वाटते. चित्रपट म्हणजे इतिहास नाही हे देखील मान्य. असो, सेट, संवाद, युध्द रणवीर आणि जौहर डोळ्याचे पारणे फेडतात. एक चित्रपट म्हणून गेलात तर बाहेर येतांना अजून बरंच काही सापडेल.

---- सचिन गाडेकर

Comments