विवश मी हतबल मी ... २२/२/१८
विवश मी हतबल मी ...
२२/२/१८
का उठावे, सावरावे, विसरावे,
अंधारी स्वप्न निशेचे |
का लोटोनी स्वत:स
पुढे कोसळती पहाड सर्व दिशेचे |
काढूनी समजूत चालतो
पूर्णत: थकलेला |
विवश मी हतबल मी |
का तयार व्हावे, नमन
करावे अन पाय धरावे देवाचे |
का ध्यान धरुनी
बसावे, जोडावे तुटले भाग मनाचे |
धरुनी आस मृगजळाची
धावून दमलेला |
विवश मी हतबल मी |
का चढवावा साज, ताज
जो जेथ न अधिकारात बसावे |
का रेटावे ज्यास
त्यास अन स्वत:वरच मिश्कील हसावे |
बनूनी धीट बोलतो
रेटीत आतून पोखरलेला |
विवश मी हतबल मी |
का यावे प्रांगणात,
कर्मकांडी तेच ते माळ मंत्र जपावे |
का दोष द्यावा
नशिबास, का दोष इतरांकडे सोपवावे |
म्हणूनी ‘होईल ठीक’
तो रस्ता पुरता उखडलेला |
विवश मी हतबल मी |
का अधुरे ठेवत पूर्ण
करावे अन परतीस प्रवास निघावे |
का आस लावावी उगवेल
प्रभात हे कुक्कुटास दाखवावे |
करुनी महत्प्रयास
झोपतो मी निद्रानाश झालेला |
विवश मी हतबल मी |
का विश्वास ठेवावा
भूत, वर्तमान अन भविष्य जे वर्तावे |
का अन कधी जुळेल
हिशोब अन मिळतील जुने परतावे |
रोखुनी श्वास जगतोय
मी गतप्राण झालेला |
विवश मी हतबल मी |
---- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment