पक्षीसृष्टी आणि माझी खिडकी ९/८/१८
पक्षीसृष्टी आणि माझी खिडकी ९/८/१८
माझ्या राहत्या घराच्या बेडरूमच्या खिडकीत गेले काही दिवस एक पारव येरझारा घालत होते. तिकडे जास्त लक्ष दिले नव्हते कारण वाटले की सहजच येत जा होत असेल. थोडाफार आडोसा असल्याने ते पारव तिथे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून येत असावे. सकाळी सकाळी होणारी पंखांची फडफड विशेष आनंद देऊन जाते. खाली पडलेली छोटी छोटी पिसे आमचे चिमुकले आनंदाने पाहत बसतील तर अजून भारी.
परंतु, अचानक परवा सौभाग्यवती यांनी निदर्शनास आणून दिले की खिडकीच्या एका कोपऱ्यात पारवाने अंडी घातली आहेत. हळूच अवलोकन केले तर अहाहा...एक नवा जीव माझ्या खिडकीत लवकरच गुटर-गुटर करणार या विचाराने आम्ही दोघे पण खुश झालो. त्यात तिथे थोडी अडगळ असल्याने पारव बाहेर गेले असता हळूच बाकीचे सामान जे अंड्याना धोका बनतील असे वाटले ते सर्व काळजीपूर्वक काढून घेतले. त्याच बरोबर आतापासून तिथे नवा जीव अंड्यातून बाहेर येत डोळे उघडेपर्यंत लुडबुड करायची नाही हे देखील ठरले.
कालपासून ते पारव अनेक तास तिथे बसून आहे. एखादेवेळेस खिडकीत ह्ळूच जरी डोकावले तर भीती आणि असुरक्षितता त्या पारावाच्या डोळ्यात, आवाजात आणि हालचालीत पहावयास मिळते. किती जीव असेल त्या अंड्यात आणि शेवटी प्रेम ते प्रेम. कालच एका सिग्नलला थांबलो असतानाची गोष्ट सांगतो. सतत सिग्नल असेल तर काही गरीब चिमुकले भिक मागतात. तिथे एका लहानग्या मुलाने भिक मागीतली म्हणून एका उच्चभ्रू व्यक्तीने जोरात खेकसून काहीतरी अभद्र शब्द वापरले. ते पाहून पलीकडे त्याची आई लगेच आली आणि उघड्याश्या बाळाला उचलून घेत त्या व्यक्तीवर संतापली. तिच्या डोळ्यातील भाव तेच सांगत होते जे कोणतीही आई व्यक्त करेल.
आता आम्हास हे नवीन पाहुणे कधी येताय आणि आम्ही कधी त्या लहानग्या जीवांना पाहू असे झाले आहे. अर्थात कुठलाही स्वार्थी प्रयत्न न करता आणि त्यांच्या विश्वाला कुठलाही धक्का न लावता. हळूवार ते जन्मावे आणि सशक्त होऊन उडून जावे या विशाल विश्वात विहरण्यास. हे निरभ्र आकाश त्या जीवांची वाट पाहत आहे.
वाट पाहू एका मातेच्या ममतेने साकारलेले नवे जीवन अनुभवण्यास. आनंद आहे की पक्षीसृष्टी माझी खिडकी निवडते आणि अजून जबाबदार बनवते.
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment