वाढदिवस विशेष इसाक पठाणसर 12/11/18
वाढदिवस विशेष इसाक पठाणसर 12/11/18
इसाक, आज तुझा वाढदिवस. अनंत शुभेच्छा.
एक खंबीर व्यक्तिमत्व आहेस तू. इसाक म्हणजे रफ आणि टफ अशी सर्वाना ओळख आहेच तुझी. पण असे फार कमी ज्यांना या कडक आणि कठोर व्यक्तीचा हळवेपणा माहीत आहे. अगदी माझ्या उलट स्वभाव आहे तुझा पण कधीच मैत्रीत अडसर आला नाही. एकाच क्षेत्रातील आपण पण कधीच ईर्ष्या किंवा मनात स्पर्धा उभी राहिली नाही.
मला आठवतेय की मी अकॅडेमीला आलो आणि किती लवकर आपली ओळख मैत्रीत बदलली. तसे तुम्ही माझे सिनियर पण हा भेदच उरला नाही. काहीच महिन्यात आपला ग्रुप म्हणे गॅंग नावाने ओळखला जावा असे उत्कट मैत्रिप्रेम होते. प्रत्येक ग्रुपचा एक भक्कम आधार असतो, एक हुंकार असतो. हुंकार तो होतास आणि आहेसच. दिवसभर काम करत आलेला शीण , शारीरिक थकवा किंवा मानसिक तणाव तुझ्या चार हास्यपंचने नकळत दूर होई. तो पुणतांबा फाट्यावरचा चहा आणि भजे अजूनही मनात घर करून आहे. रोज श्रीरामपूर ते अकॅडेमी हा प्रवास करूनही तोच उत्साह आणि तीच ऊर्जा तू सांभाळत होता हे आम्ही डोळ्याने पाहिले आहे. हि मैत्री कुटुंबानाही एकत्र करत गेली. मग एखाद्याचा वाढदिवस असो वा एखादा सणवार, आपण कारण शोधत होतो एकत्र येण्याचे. कुटूंबे देखील एकजीव व्हावी इतके दृढ नाते उभे राहिले त्या काळात.
या गेलेल्या काळाबद्दल जेवढे लिहीन तेवढे कमी पडेल कारण प्रत्येक क्षण हा आनंद आणि फक्त आनंद होता. पण काय आहे ना, चंद्राला देखील ग्रहण लागते. काहीसे असेच झाले असे म्हणेन. निर्णय चुकले की चुकवले की व्यक्ती चुकल्या यात जायचे नाही मला. सगळे जग जेंव्हा पाठ फिरवून बसते तेंव्हा सावरणारा, एक आणि मी आहे सॊबत म्हणणारा किती विशेष असतो हे मला विचारावे अवघ्या जगाने. माझ्या अश्या काळात ज्याने खंबीर साथ दिली, मी चूक असेन वा बरोबर ज्याने कसलीही, ज्याने कसलीही तमा न बाळगता किंवा दबाव न जुमानता स्वतःच्या झालेल्या पडझडीत देखील माझी बाजू सांभाळली तो तू आहे. आयुष्यात मोजकेच मित्र येतात आणि त्यातीलही अगदी तुरळक आजीवन साथ देतात. माझा कोटा तू पूर्ण केलास भावा. कितीही वाईट दिवस पाहिले तरीही तुझ्या हिमतीकडे पाहून मला हिंमत आली आहे अनेकदा. तुझ्या जिगरबाज मनाला जवळून अनुभवले आहे मी. एकामागून एक धक्के देणारे नशीब आणि त्यात ओढायचा असतो तो घरगाडा. तू हे सगळे पार पाडलेस मागच्या काळात. तुझ्या लढाऊवृत्तीचा आणि कष्टाचा मीच काय जो तुला ओळखतो तो चाहता आहे हे नक्की.
एवढे तर नक्की कळाले आहे की नोकऱ्या येतील जातील, पैसे येतील जातील. देव जाणो उद्या कष्ट करत खूप पैसा येईल, आयुष्य सुखकर होईल पण त्या क्षणी, प्रत्येक पावलागणिक जर असे मित्र नसतील तर हिमालयाएवढे यश सुध्दा तुच्छ आहे. मला आनंद आहे की इसाक माझा मित्र आहे. एवढ्यात भेटणे कमी होईल कारण कामाची शहरे बदलली. असो, पण धागा तोच आहे आणि भावना देखील तिचा आहे.
आज खूप लिहावेसे वाटत आहे पण काय करणार? तुझे क्रिकेट प्रेम, सायकल चालवणे, व्हॉलीबॉल प्रेम, भजी प्रेम असं किती किती लिहिणार?
फक्त एक लक्षात ठेवूयात की खूप उंच उडायचे आहे. खूप काही करायचे आहे. किनारा त्या सागराला असेल पण आमच्या स्वप्नांना नक्कीच नाही. मिळालेलं हे मैत्रीचं पान असंच बहरू द्यावं या विधात्यानं. कोणताही वाईट काळ त्याला संपवू शकत नाही हे तर सिद्ध झालंच आहे. आता ते अजून कसं बहरेल हे नक्की पाहुयात. विधात्याने असे मित्र देत आयुष्य सुंदर बनवलंय म्हणून त्याचे आभार आणि तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.
-- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment