दिवाळी आणि इंव्हीटर ५/११/२०१८

दिवाळी आणि इंव्हीटर ५/११/२०१८

आज सायंकाळी दिवाळीनिमित्त काही पणत्या घेण्यास गेलो असता एक दृश्य पाहिले. नगर मनमाड रोडलगत गर्दी असतेच तशी. तिथेच रस्त्याच्या कडेला एक बाप आणि त्याचा मुलगा पलंग मांडून सामान विकत होते. बाप पणत्या तर मुलगा रांगोळी विकत होता. मुलगा हा फार फार तर सहावी सातवीत असेल. थोड्या पणत्या न्याहाळत त्या मुलाकडे माझे लक्ष गेले तर तो मन लावून रांगोळी विकत होता. अमुक एक रंग अमुक ग्लासभर पाच रुपये असे काहीतरी ऐकू येत होते. येणाऱ्या सर्व ग्राहकांना तो वेगवेगळ्या मापाने रांगोळी देत होता. चटकन एवढे पैसे झाले आणि उर्वरित पैसे परत देखील देत होता. तो वडिलांना मदत करत होता हे तर नक्की पण त्याला त्याची प्राप्त परिस्थिती माहीत होती हे नक्की.

आम्ही जेंव्हा गेलो तेंव्हा बराच वेळ झाला होता. अंधार पडू लागला होता. त्या दोघांच्या स्टॉलवर लाईट नसल्याने अंधार जाणवत होता. ग्राहक उभे राहत डोळे फाडत वस्तू हाताळत होते. तेवढ्यात एक रांगोळी घेण्यासाठी आलेली महिला रांगोळी  न घेताच  परतली. तिने जाता जाता पुरेसा लाईट नाही अशी सबब देखील दिली.

इथपर्यंत मी फक्त पाहत होतो पण त्यांनतर तो चिमुरडा जे बोलला ते विशेष होते. तो वडिलांना थोडासा नाराजीने म्हणाला, "बाबा, मी म्हणालो होतो ना की संध्याकाळी इथे आपल्याकडे इंव्हीटर (inverter) हवेच. इथे गिऱ्हाईक संध्याकाळी जास्त असतात" त्याचे बाबा देखिल निशब्द आणि हतबल वाटले क्षणभर.
एवढे नक्की की तो छोटासा मुलगा काळासोबत जगायला शिकवतोय असे वाटले. एक गिऱ्हाईक गेले म्हणून त्याचे तात्काळ विश्लेषण करत त्यावर तोडगा काढावा असे त्याला वाटते. त्याची गरिबी आणि जबाबदारी ओळखुन आहे तो आणि त्यावर आपल्या जुन्या पिढीला सूचना देखील देत आहे तो.

मला राहवले नाही म्हणून मोबाईल टॉर्च लावत राहिलेल्या पणत्या घेतल्या आणि त्या मुलाकडे पाहत परत निघालो. पुढील बराच वेळ प्रश्नांची सरबत्ती होत होती की त्याला देखील दिवाळी असेल का? त्याला देखील सुट्टी असेल का? त्याला देखील शॉपिंग आणि मकडत बांधलेला किल्ला असेल का? त्याला मामाच्या गावाला जायचे नसेल का?

त्याला या वयात खांद्याला खांदा लावून उभं राहताना चांगले आणि वाईट दोन्ही प्रतिक्रिया मन देत आहे. सणवार का बाजारपेठ फुलवतात याचे एक उत्तर नक्की मिळाले.

--सचिन गाडेकर

Comments

Post a Comment