वर्ष २०१९ आणि लेखाजोखा (भाग १)

वर्ष २०१९ आणि लेखाजोखा (भाग १)

दर वर्षी सरत्या वर्षाचा लेखाजोखा मांडणं एक सवयच बनली आहे. याही वर्षीही ती सवय  खंडीत होऊ नये हाच प्रयत्न. २०१९ सुरु झाले ते पुण्यातील पुनरागमनाने. काहीसा स्थिर होतांना अनेक आव्हाने समोर आली आणि त्यांना झेलण्याची ताकत ही तोच देतो जो आव्हाने पाठवून आपला खुटा किती मजबूत आहे हे तपासतो. तसाही जानेवारी आता नेहमीचा खास असणार आहे कारण स्वधाचा वाढदिवस जानेवारी महिन्यात येतो.   तिचा पहिला वहिला वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रगण यांसोबत साजरा झाला. एक पिता म्हणून असे खूप कमी क्षण आयुष्यात येतील याची जाणीव आहे मला. हे माझं साजिर गोजिर पिल्लू किती भरभर मोठं होऊन जाईल याची जाणीव आहे म्हणून प्रत्येक छोटी गोष्ट साजरी करत ती आठवणीच्या गाभाऱ्यात साठवत आहे माझ्यातला बाप. अगदी एक एक क्षण व्यापून टाकतात दोन्ही कन्या आणि आयुष्य अजून किती सुंदर असावे याचा प्रश्न पडतो मला. येणाऱ्या जानेवारीत तिचा दुसरा वाढदिवस आणि प्रत्येक बापाला असे का बरे वाटून जाते की मुलं मोठी होऊच नये. अगदी अशीच चिपकू, गोंडस आणि निष्पाप रहावी. असो, तिचा वाढदिवस छान झाला.

मागच्या वर्षातील सर्वात जास्त हेलावून गेलेली गोष्ट म्हणजे पुलवामा हल्ला. तेथे झालेला भ्याड आतंकवादी  हल्ला भयंकर होता. कधी नाही तो एवढा संताप आणि राग मनात उभा ठाकला होता. मीच नव्हे प्रत्येक भारतीयच जणू एक झाला होता. दोन वर्गात तर हे बोलताना चक्क कंठ दाटून आला होता कित्येकांचा. समोर दिसणारी दृश्य आणि पालम विमानतळावरील क्षण आयुष्यभरासाठी खोल जखम करून गेले. कसा काय माणूस एवढा निर्दयी होऊ शकतो? कोण कसे काय इतके अमानवी कृत्य करू शकतो? लवकरच भारतीय मनाला उत्तर मिळाले हवाई हल्ल्याने पण प्रश्न अनुत्तरीतच राहिला की हे सगळं कधी थांबणार? अनेक पिढ्यांना अभिमान वाटेल असे काम केले विंग कमांडर अभिनंदन यांनी. कधीतरी शरमेने झुकलेल्या माना ताठ करून सांगता तरी येईल पुढच्या पिढ्यांना की असेही काही करू शकत होतो आपण आणि अनेक दशके फक्त निषेध आणि शांतता मोर्चे. 

मार्चमध्ये  मित्र, दोस्त आणि यार कोरे सर यांना विशेष सेवा पुरस्कार मिळाला. आमची मैत्री २०११ पासून आहे. हा अवलिया कसा राहतो, कसं सगळं सांभाळतो हे कळतच नाही. सरळ, साधा माणूस बब्रुवान. त्याने जे ठरवले ते तो करणारच. मग अगदी २०१२ साली प्रतिज्ञा घेत नोकरी सोडून देत ५ महिन्यात सेट-नेट पास करत स्वत:ची दिशा स्वत: ठरवली त्याने. त्याला अवार्ड मिळाला हे पाहून खूप हायसं वाटलं होतं. कष्टाचं चीज होणं काय असते हे त्याला विचारा. याच वर्षात त्याला त्याच्या तपस्येचे फळ मिळाले देखील. आय. आय.टी, बॉम्बे ला रुजू झाला ते ही प्राध्यापक म्हणून. लेट पण थेट आय. आय.टी. अश्या मित्राचा अभिमान तर वाटतोच पण अभ्यास कसा करावा, कामात परफेक्शन कसे असावे याचा मैलाचा दगड म्हणजे कोरे सर. मला माझ्या मिश्कील आणि थोड्या खोडकर स्वभावात थोडी गंभीरता नकळत आली तो फक्त बब्रुमुळे. 

मार्च तसाही खासच होता. थेट जळगाव टूर झाली. जाताना खोदून ठेवलेला औरंगाबाद जळगाव रस्ता पाहून सरकारी योजना कश्या काम करतात याचा याची देही याची डोळा प्रत्यय आला. नियोजनशून्य आणि बिनडोक कामाचा प्रकार एवढ्या उघडपणे चालतो आणि कुणी काहीही बोलत नाही हे विशेष. रोज येणारे जाणारे देखील एवढे हतबल असतील हे पाहवत नव्हते. किती मुर्दाड प्रशासन असू शकते याचा अनुभव आला. आबाचे लग्न बहुतेक यामुळेच लक्षात राहिलं आहे माझ्या. आजच्या तंत्रज्ञानपूर्ण जगात सुद्धा किमान बुद्धी  वापरता समस्त रस्ता आणि वाहतुकीची वाट लावली होती. त्या अजिंठा येथे हौसेने आलेले जपानी पर्यटक आमच्या देशाविषयी काय प्रतिक्रिया सोबत घेऊन गेले हे सांगायलाच नको. बाकी आपल्याला सगळ्याच गोष्टींची फारच लवकर सवय होते म्हणा. मग ती गटर असो वा धूळ किंवा  फुफाटा..

मार्चच्या महिन्यात कान्हा शांतीवनंला जाण्यचा योग आला. एम. आय.टी. ची संपूर्ण टीम हैदराबाद जवळील ध्यान केंद्रात तब्बल ३ दिवस होती. सहजमार्ग आणि ध्यान याचा सुगम संगम तिथे आहे. ते ३ दिवस अगदी भारावून टाकणारे होते. स्वत:चा पाया भक्कम असेल तर इमारत स्थिर राहते आणि हेच अनुभवयास आले.  चित्तेकाग्र ही वैयक्तिक साधना आहे हे सर्वश्रुत आहेच पण ते शेकडो आणि हजारो साधक एकत्र देखील करू शकतात हे खासच होते. एक विशेष बाब म्हणजे दाजी. तिथले कुटुंब प्रमुख कमलेशजी पटेल यांनी दिलेला वेळ अविस्मरणीय आणि विशेष आहे आणि राहिल.

क्रमश: 

--- सचिन गाडेकर

Comments