वर्ष २०१९ आणि लेखाजोखा (भाग २)

वर्ष २०१९ आणि लेखाजोखा  (भाग २)

सरते वर्ष नेहमी आठवणीत राहील कारण या वर्षी झालेला पाऊस. पावसाळा हवा असा म्हणणारा शेतकरी, व्यापारी किंवा नोरकदार सुद्धा वैतागेल एवढा पाऊस या वर्षी झाला. अर्धा महाराष्ट्र पुरात अडकला होता. हजारो जीवने विस्थपित झाली. ज्या रस्त्यावरून पायी चालणं मुश्किल होत तिथे थेट बोटी फिरत होत्या. गावच्या गाव पुरात अडकली. शेकडो प्राणी दगावले आणि सार्वजनिक मालमता बाधित झाली ती अगणित. महालक्ष्मी एक्सप्रेस आणि त्यात जीव मुठीत धरून बसलेले हजारहुन अधिक प्रवासी कसेबसे बचावले.मग आपण कौतूक चालू करतो त्या बचावकार्याचे, लोकांच्या मदतीचे आणि दिलदार जिगरबाज सैन्याचे. यात गफलत होते ते इथेच. कोणीही याचे कारण शोधून त्यावर उपाय काढला का? का अशी यंत्रणा नाही जी असे होण्याआधी सावध करू शकेन? केवढी तंत्रज्ञान प्रगती सुरु आहे पण ती सामान्य माणसाच्या मदतीला येत नाही हेच खरे. बहुधा मरण इथे फार जास्त स्वस्त झाले आहे.  कशी काय ती ट्रेन पुढे जाऊ दिली? कोणत्या यंत्रणा अश्या मुसळधार पावसात सजग होत्या? बरं झालं ते झालं.. मग कोणावर कारवाई झाली? कोणी जबाबदारी घेतली? तर फक्त म्हणायचं की निसर्गापुढे कुणाचं काय चालत हो? आणि पुढे चालायचं.

अगदी अशीच अवस्था महानगर असे बिरुद मिरवणाऱ्या पुण्यात देखील  होती. एका रात्रीत १६ जणांना जीव गमवावा लागला. अतिवृष्टी अशी झाली की आभाळ फाटावं अशी अवस्था झाली. काही तासातच होत्याच नव्हतं झालं. त्यात एक मात्र नक्की समोर आलं की शहर विस्तार होतांना केलेला अपहार समोर आला. गावठाण आणि डोंगर यांचा फक्त खुर्दा पाडला गेला आणि उंच उंच इमारती बांधताना नैर्सर्गिक प्रवाह मग अगदी ओढे नाले असतील ते सरसकट बुजवून बांधकाम केल आहे. केवढा हा आततायीपणा? काही किमान नियम देखील पाळायचे नसतील तर मग मात्र निसर्ग असा का कोपतो? पावसाळ्यात हिवाळा आणि उन्हाळ्यात हिवाळा किंवा हिवाळयात पाऊस असे का होते हे विचारण्याचा कोणता अधिकार उरतो आपल्याला?   लोकसंख्या वाढते आहे हे जरी असले तरी काही मूलभूत गोष्टी सांभाळाव्या लागतीलच ना? कसे काय निसर्ग मग साथ देईल आपणास? भीती  तर अशी आहे की आपले अर्धे आयुष्य निभावले देखील पण असेच रोज होणार असेल तर पुढच्या पिढीला काय उरणार आहे? एक तासभर जरी पर्जन्य कोसळला तर रस्ते बंद काय होतात आणि वाहतूक कोंडी होते काय... एवढीच लोकसंख्या असणारे इतर देशात मात्र असे होत नाही एवढे नक्की. आपल्याला किमान व्यवस्था उभी करावीच लागेल हे पुन्हा स्पष्ट झाले.

या सगळ्या धामधुमीत अनेक चांगल्या गोष्टीही झाल्यात. एक वर्षभर फक्त तासिका तत्वावर नोकरी केली आणि जून मध्ये पुन्हा पूर्णवेळ प्राध्यापक होण्याचे ठरवले. एम. आय. टी. व्यवस्थापन आणि विभागप्रमुख यांनी विशेष प्रयत्न केले याची जाणीव सदैव राहील. कामाचा व्याप म्हणजे आनंद. कामाची धावपळ म्हणजे शिकण्याची संधी आणि रोज नवनवीन गोष्टी वाचत राहणे, वर्गात जाऊन १००% टक्के देणे जणू कर्तव्यच आहे आपले.  मग संधी येतात. एकामागून येतात. याच काळात मित्र स्वप्नील सर आणि अशोक सर यांनी केलेले प्रयत्न विसरू शकणार नाही. आपला मित्रच आपला सहकारी व्हावा हे सर्वानाच वाटते पण त्यासाठी जीवापाड प्रयत्न केलेत या दोघांनी. 

एम.आय. टी. पीस स्टडीज  मुळे खूप सारे आयाम खुले झाले. स्टाफ मधील प्रत्येकजण खास आहे कारण ती कर्मभूमी आहे.  अगदी पहिल्याच महिन्यात नाशिक येथे एका चर्चासत्राला जाण्याची संधी मिळाली. सोबत अनुभवी सिनियर आणि मित्र भागवत सर होते. दोघांनी विभागाचा पहिला वहिला शोधनिबंध  देखील सादर केला.  मूल्यशिक्षण आणि उच्चशिक्षण याची सांगड घालणारा मस्त विषय मांडला. राष्ट्रीय स्तरावर केलेला हा प्रयत्न सुखावून गेला. जबाबदारी येते आणि  ती आपली चाचणी असते, परीक्षा असते आणि तिथे "उम्मीदो पे खरा उत्तराना बितरना" फार आनंद देऊन जाते. सप्टेंबर तर अजून एक पाऊल पुढे पडले. दिल्ली इथे आयोजित राष्ट्रीय संवाद सत्रात प्रतिनिधी होण्याची सुवर्णसंधी मिळाली.  तीन दिवस अभूतपूर्व अनुभव होता. ए .आय. सी. टी. ई. च्या प्रांगणात घालवलेला वेळ खासच होता. दिल्ली बाहेर प्रदूषण आणि गर्दी वेदनादायी होती.  तिथे त्या गर्मीत दोन चार ठिकाणच पाहू शकलो. मुंबई, पुणे का स्पेशल आहे हे कळले त्या दिवशी. ज्यांची रोजीरोटीच तिथे आहे त्यांना काय संघर्ष करावा लागत आहे याची जाणीव झाली. राजधानी एवढी प्रदूषित करून ठेवली आहे की आता इथे श्वास घेणे देखील अवघड होते. असो, विमानाचा प्रवास ते तीन दिवस झालेले बौद्धिक आठवणीत राहील.

क्रमश: 

--- सचिन गाडेकर

Comments

Post a Comment