मनोगत कोरोनाचे (भाग १ ) ४/४/२०२०

मनोगत कोरोनाचे (भाग १ )    ४/४/२०२० 

नमस्कार भारतीयांनो, 
ओळखलत मला? मी  चीनी कोरोना व्हायरस..... 
हो, नमस्कार करतो तो ही  कोपरापासून हात जोडून. 

मी  तसा मूळचा चीनचा. तुम्हा भारतीयांना तसेही चीनी वस्तू, खेळण्या, फोन आणि बरच काही फार आवडतं म्हणा. पण पहिल्यांदा तुम्ही एखाद्या चीनी गोष्टी बद्दल इतके जागरूक वाटले मला. आता माझा जन्म माणसाच्या चुकीतून झालायं हे सर्वश्रुत आहे. मला आणि माझ्या जन्मदेशाला जेवढ्या शिव्याशाप मिळत आहे त्यावरून माझी अडचण झाली आहे. उभ्या जगाला घरात कोंडून ठेवलंय मी माझ्या प्रभावाने. अर्थात विकसित, अविकसित किंवा महासत्ता बिरुद मिरविणारे आज हतबल आहे माझ्यामुळे. मी, एका विषाणूने सगळ्या मानवसमूहाला गुडघे टेकायला भाग पाडलं आहे हे मान्य करा तुम्ही देखील. 

माझ्या आगमनाने काही गोष्टी मात्र निखळ पाण्याप्रमाणे स्पष्ट झाल्यात. माझे काही निरीक्षण तुम्हाला सांगतो.

पहिले असे की माझ्याशी दोन हात करायला तसा तुम्हा भारतीयांना खूप वेळ मिळाला होता. म्हणजे वूहान, माझे जन्मस्थान असो वा तुमच्या सुनबाईंचे सासर इटली किंवा तुम्ही ज्यांना बोलावून गळ्यात पडून गाजावाजा करता तो  अमेरिका या सर्वाना खूप कमी वेळ मिळाला आणि याची  मोठी किंमत ते मोजत आहेत. त्या तुलनेत तुम्ही वेळीच सावध झालात का हे बघा जरा. पूर्वतयारी माझी तर झालीच होती. मला स्वत:ला माझ्या पाशातून सुटून, दवाखान्यातून बरा होणारा प्रत्येक पेशंट पाहून खूप त्रास होतो. अरे, असे कसे होऊ शकते ना? अजून माझ्यावर सिध्द उपचारपद्धती नाही,  माझ्यावर रामबाण(मी हिंदू नाही बऱ का...रामबाण हा वाक्प्रचार किंवा रूढ म्हण आहे ) उपाय नाही. माझी लागण  होऊच नये म्हणून एकही लस अस्तित्वात नाही. अर्थात अजून तुम्हा हुश्शार लोकांना लस सापडली नाही यातच मला समाधान बऱ का. 

दुसरी बाब अशी की माझ्यामुळे लाखो लोकांना ते मिळाले ज्याची ते रोज इच्छा करतात. नोकरदार तर कधी सुट्टी येते आणि घरी थांबतो असे त्याला होते. कॅलेंडर दहा वेळा उचकून पाहणारे अनेक आहेत. या सगळ्यांना आता मात्र चार दिवसात त्या लाडक्या, हव्याह्व्याश्या घराचा उबग कसा काय आला? कसे काय प्रशासन हे सगळे घरात रहावे यासाठी तुम्हाला लाठी दाखवत आहे? अशी कोणती मजबुरी आहे ? कुटुंब आणि घर याला सर्वस्व मानणारे तुम्ही अचानक असे अगतिक कसे झालात हो? मला कळत नाहीये कारण माझ्या देशात या गोष्टींना त्यांनी सहज करून दाखवले. 

तिसरी गोष्ट ही अशी की माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्य यंत्रणेचे अस्तित्व आणि रिकामे वासे कळले. माझ्या तीव्र आघाताने पिडलेला व्हेंटीलेटर शिवाय टिकत नाही. तुम्ही गेली अनेक दशके ही यंत्रणा किती तुटपुंजी ठेवली आहे हे कळले असेल. सरकार दरबारी किती सक्षम आरोग्य सेवा हे किमान पहिल्यांदा सामान्य लोकांना कळाले असेल आणि  ते ही माझ्यामुळे. अश्या आपत्कालीन परिस्थितीत काम करणारे तुमचे वैद्यकीय प्रशासन पाहून मला पहिल्याच दिवशी धडकी भरली आणि दुसऱ्या दिवशी तारांबळ पाहून पुन्हा मला उत्साह आला. हा अर्थात माझ्या विळख्यातून सोडवायला तुमचे डॉक्टर आणि सर्व यंत्रणा फारच जोर लावते आहे हे नक्की. त्यांची हिम्मत कशी तुटेल हे मी पहिल्या दिवसापासून पाहतोय आणि अपयशच माझ्या नशिबी आहे. असो. 

असो, बरंच बोलायचं आहे, बराच वेळ आहे तुमच्या आणि माझाकडे. बोलेन उद्या. येतो, काही भक्ष्य मिळते का पाहतो. खूप लोकसंख्या आणि खूप संधी आहे म्हणे इथे. 

तुमचाच  लाडका चीनी कोरोना व्हायरस  

--- डॉ. सचिन शंकर गाडेकर

Comments