मनोगत कोरोनाचे (भाग २ ) ५ /४/२०२०
मनोगत कोरोनाचे (भाग २ ) ५ /४/२०२०
नमस्कार भारतीयांनो,
ओळख आहे ना? हो, तोच मी चीनी कोरोना व्हायरस..... आज तर तुम्हाला थेट साष्टांग दंडवत घालणार आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की एक घातक विषाणू तुम्हास थेट साष्टांग दंडवत का बरे घालत आहे? सांगतो सविस्तर सगळं. परवा माझ्या काही विषाणू मित्रांनी त्यांच्या काही निरीक्षणात आलेल्या बाबी ऐकवल्या आणि त्या ऐकून मला वाटलं की फक्त साधासुधा नमस्कार करून चालणार नाही तर थेट साष्टांग दंडवत घालावा.
माझी भीषणता तुमच्या काय कोणापासूनच लपलेली नाही. त्यात तुमच्या आग्रही सरकारने नामी आणि जालीम उपाय केला तो लॉकडाऊनचा. माझा एवढा नाईलाज झाला आहे ना काय सांगू? ती लोकल सुद्धा बंद केली तुम्ही. मला लाखोंच्या संख्येने एकसाथ शिकार करता आली असती पण तुम्ही धूर्त आणि सावध लोकांनी थेट लाइफलाईनच बंद केली. घोर निराशा झाली माझी. अशी तडफड झाली न माझी काय सांगू? किती उत्साहाने शिकलेले, सवरलेले, सुशिक्षित आणि काही येडे लोक येत बाहेर. माझे हे काम आहे, ते काम आहे असे सांगत बाहेर पडत होते. ज्याला त्याला जणू आपात्कालच आला आहे असे दिसत होते. विनाकारण बाहेर पडणाऱ्या एवढ्या सर्व लोकांना पाहून मला खात्री पटली होती की येथे माझा विस्तार मोठा आणि दीर्घकाळ असणार आहे. ते करण्यास मला मदत केल्याबद्दल थेट साष्टांग दंडवत.
बरं, मला ना तुमचे लॉकडॉउन झाल्यापासून एक मात्र जाणवले आणि ते तुम्हाला फक्त माझ्यामुळे कळणार ही माझी खात्री आहे. तुम्ही आणि तुमची लोकशाही आणि समाजपद्धती किती गुंतागुंतीची आहे हे कळले असेलच. मला असे हजारदा वाटून गेले की तुम्हाला माझ्यासारख्या विषाणूची गरजच नाही. केवढे विष भरले आहे एकमेकांविषयी!! काय एकजूट झाली आहे तुमची!! माझ्या निमित्ताने हे ते नक्की झाले असेल की कोण देशहित पाहतोय आणि कोण इथले तुकडे तोडून देखील बेईमानी करत आहे. तुमची एकता-बिकता किती खोल आणि प्रबळ आहे हे तपासून पहा माझ्यामुळे. एक विषाणू काय येतो आणी तुम्ही विखुरले गेलात. शत्रूने कशाला काय करावे तुम्हाला? अश्या संकटसमयी विष ओकणारे, दुही निर्माण करणारे, समाजात द्वेष आणि भीती पसरवणारे माझ्यापेक्षा घातकच बरं का.... त्या सर्व घातकी लोकांना थेट साष्टांग दंडवत.
अजून एक बरं का, मला माझ्या जगभरच्या प्रवासात इथे जे पहाया मिळाले ते कुठेही पाहायला मिळाले नाही बऱ का आणि त्यासाठी फक्त थेट साष्टांग दंडवतच उरतो. जे डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यंत्रणा आणि सर्व अत्यावश्यक सेवा तुमच्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहे त्यांना म्हणे तुम्ही आभार आणि शाबासकी म्हणून दगडफेक करत आहात, अंगावर थुंकत आहात, त्यांचा अपमान करत आहात आणि थेट असहकार्य करत आहात. वाह, कसली समज आहे हो तुमच्याकडे. काही पोलिसांना चकवून बाहेर पडत आहे तर काही मास्क आणि जरुरी सामान चढ्या भावाने विकत आहे. मला हे जाम आवडले. कारण मी जे करू शकत नाही ते तुम्ही किती छान करता हे पाहून मी धन्य झालो. मला कितीही मिटवा, तुमची ही बाजू मात्र माझ्यामुळे समोर आलीय. कसल्या गप्पा मारता रे? त्या सर्व अविचारी आणि निर्लज्ज लोकांना थेट साष्टांग दंडवत.
असो, किती सांगू आणि काय सांगू? तुमच्या देशाकडून नवे नवे संदर्भ कळले मला. आहे तसा वेळ मला. इतक्यात तुम्ही मला जाऊ देत नाही आणि मी तर आहेच चिवट. बोलेन परत तुमच्याशी. तूर्त दंडवत घ्या आणि रजा द्या.
तुमचाच लाडका चीनी कोरोना व्हायरस ...
--- डॉ. सचिन शंकर गाडेकर
Comments
Post a Comment