अरे मनुक्षा, एवढं काय ते करून घे १६/४/२०२०
अरे मनुक्षा, एवढं काय ते करून घे १६/४/२०२०
झालाय नाईलाज तर आता पुरता इलाज करून घे |
रिकामी सारी खोली मनाची आटोकाट भरून घे |
अरे मनुक्षा, एवढं काय ते करून घे |
बसलास घरी आता तर, परी आपल्या माणसात बसून घे |
निखळ नितळ विनोद करत समवेत तू ही हसून घे |
अरे मनुक्षा, एवढं काय ते करून घे |
थांबलास आहे जेथे होतास तेथेच, परी पूर्णपणे थांबून घे |
सांभाळलस इतरांना थोडं, स्वतःला ही सावरून घे |
अरे मनुक्षा, एवढं काय ते करून घे |
असशील चिंतेतही थोडे काही परी चिंतन ही करून घे |
मग्न निराशेत न होता मस्त मनाची पोकळी भरून घे |
अरे मनुक्षा, एवढं काय ते करून घे |
असतील मर्यादा वस्तूंना परी मर्यादा तुझी ओळखून घे |
पडले असेल अंतर इतरांत परी अंतर्मन निरखून घे |
अरे मनुक्षा, एवढं काय ते करून घे |
वाचला असशील उद्रेकातून परी गोष्टी चार ओळी वाचून घे |
जावेसे वाटेलच बाहेर कुठे परी घरातच पुरता तू राहून घे |
अरे मनुक्षा, एवढं काय ते करून घे |
पसरवतील संशय लोक परी गाठ विश्वासाची बांधून घे |
पसरतंय किल्मिष द्वेषाच परी अमृत प्रेमाचं गाठून घे |
अरे मनुक्षा, एवढं काय ते करून घे |
होतेय घुसमट आतल्या आत परी आतल्याचा वेळ राखून घे |
दिसतील चुका आप्तांच्या खूप परी तेवढं निकरानं झाकून घे |
अरे मनुक्षा, एवढं काय ते करून घे |
मिळाला आहे वेळ फुका परी ती संधान स्वत:शी साधून घे |
शोधती सगळेच बाहेरी मात्रा परी ती शोध मात्र आतून घे |
अरे मनुक्षा, एवढं काय ते करून घे |
--- डॉ सचिन शंकर गाडेकर
Comments
Post a Comment