मुंबापुरी , आझाद मैदान अन उपोषण

मुंबापुरी , आझाद मैदान अन उपोषण 10/10/16

गेले दोन दिवस सगळा मुलुख दसरा मेळावा अन घरोघरी होणाऱ्या पूजेची तयारी करत होते. त्याच दरम्यान ठरल्याप्रमाणे सगळं काही पणाला लावून आमरण साखळी उपोषणाला बसलेल्या बहादूर सहकारी मित्रांना पाठबळ द्यायला जायचं ठरलं. हा दसरा अन्याय, विलंब, अनास्था या अन अनेक सरकारी व्यवस्थेतील लागलेल्या किडी बद्दल एक निमित्त घेऊन आला होता अन यातून सुन्न ,निचपीत पडलेल्या सरकारला जाब विचारला जाणार होता.
आझाद मैदान हे ठिकाण ठरले होते. सर्व आवश्यक परवानग्या घेत , सरकारी पद्धतीने निवेदन देत हा प्रवास सुरु झाला. या यात हे आंदोलन, हा रोष होऊ नये या साठी जुजबी प्रयत्न प्रशासन करतच होते.  अगदी ठाम निर्धार केलेलं पथक वेळेवर पोहोचलं. पथकात कुणी नाशिक, नगर,नागपूर, गडचिरोली, मुंबई, सांगली, पुणे अन अनेक ठिकाणाहून आलेले सहभागी मंडळी उत्साहात होती. अश्या कार्यक्रमाची ही पहिलीच वेळ म्हणून सगळ्या खबरदाऱ्या घेणं गरजेचं होतं .

कुणी पोस्टर बनवत तर कुणी घोषणा बनवत होते. तिथेच एक दिवस  250 रुपये भाड्याने एक दरी घेतली बसायला. एक नेहमीचा बॅनर लावून श्रीगणेश केला.  आजूबाजूला अनेक आंदोलनकारी निवांत पडलेले होते. किंबहुना ते आम्हाला सुचवत होते की बहुत दूर जाना हैं। त्याचं ते अवसान पाहून मनात धस्स झालं. कुठल्या काळापासून ते इथे आंदोलन करत असावेत देव जाणो. तसे आझाद मैदान  असेच गजबजत  असते अशा प्रकारच्या आंदोलनांनी. स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्द लढा देण्याचा मार्ग लोकशाहीने दिला आहेच. फक्त त्याची दखल कोणी घेतं का हा यक्ष प्रश्न आहे.

एखादा नवीन आंदोलन समूह आला की त्यांची तत्पर दखल घेत मंत्रालय ती बाब संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देते असा कार्यभाग आहे. अर्थात रोजच माननीय मुख्यमंत्री  या गोष्टींचा गोषवारा घेत असतील हे गौडबंगाल आहे म्हणा. तदनंतर नेहमीच कडक अन खडूस वाटणारे पोलीसमामा इथे मात्र खूप काळजीने विचारपूस करत होते. योग्य ते मार्गदर्शन करत होते. त्यातील एक मामा म्हणाले की मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलावर हा अहवाल रोज जातो . आपल्यातील एक 3 जणांचे पथक प्रातिनिधिक स्वरूपात बोलावून त्यांच्या मागण्या व स्वरूप जाणून घेतले जाते. खरे तर या वाक्यांनी समस्त चमूत जणू नवचैतन्य भरले. कोण कोण पथकात जाणार, काय काय मुद्दे मांडणार हे सगळं विचारचक्र सुरू झालं. दरम्यान दुपार झाली होती. उपवास करणे हा प्रकार न रुचणाऱ्या व्यक्तींना भुकेले राहणं किती अवघड आहे हे जाणवू लागलं होतं. अन्न अन पाणी पूर्ण बंद होते.त्यात अंतर्गत चर्चा रंगत होत्या. पुढील रणनीती आखत सगळे मग्न होते.

तेवढ्यात पहिली धडक दिली ती प्रसारमाध्यमे अन त्यांच्या टिमनं. एका नामवंत वृत्तपत्र प्रतिनिधीने सर्वांशी संवाद साधत बातमी देण्याची तयारी दर्शवली. त्या वेळी सर्व माहिती देऊन एक गोष्ट लक्षात आली की अजून जास्त मीडिया पर्यंत जावे लागेल.  एका टीम ने ती जबाबदारी घेत अनेक मीडिया प्रतिनिधीना भेटत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला स्थानिक आमदार,खासदार यांना भेटून रात्री निवासाची सोय करायची होती. काही यत्न अन दैवयोग म्हणावा की सोय झाली. दिवसभर झालेले आंदोलन, अखंड उपवास शरीरातली सगळी ताकत खेचून घेत होते. दुपारच्या वेळेत सगळे थोडे शांत होत आराम करू लागले. शरीर, वाणी, डोळे,बुद्धी सगळं काही दमू लागलं होतं.काही काळ पडल्याने ऊर्जा पुनरुज्जीवित झाली अन पून्हा सुरु झाला तोच उपक्रम.
                                                                                                                    --  सचिन गाडेकर

Comments