समाज अन वाद ... अनपेक्षित लोकशाही
समाज अन वाद ... अनपेक्षित लोकशाही
गेल्या काही दिवसापासून यादव कुटुंबात पेटलेले वर्चस्वाचे रण एवढ्यात शमेल असे दिसत नाही. महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबीय विभक्त झाले तेव्हाची आठवण करून दिली उत्तर प्रदेशच्या समाजवादी नसलेल्या पक्षाने. ४ वर्ष झाले सगळी जनता डोळे फाडून वाट पाहत होती विकासगंगेची. काहीतरी मुलभूत बदल घडेल अशी खोटी आस लावून. (अर्थात सरकार बदलेले की समस्या सुटतात अथवा त्याकडे लक्ष दिले जाते हा गोड गैरसमज आहे बर का...महाराष्ट्र याचे ज्वलंत उदाहरण.) मोठ्या भोळ्या आशेने सत्तांतर करत दिलेले कौल कसे महाचुकीचे होते याचा प्रत्यय येऊ लागतो. अरे कुठे नेऊन ठेवलाय अस म्हणत दुषणे देऊ लागतो आपण. घरातल्या घरात वर्चस्व राखण्यासाठी चालेलेली कसरत लोकशाहीस काळिमा नाहीतर काय म्हणायचे? घरातील वाद मिटवीत बसणारे सर्वसामान्य जनतेसाठी कधी वेळ काढणार? स्वत:च्या गुर्मीत मश्गुल असणारे जनसेवा कशी काय करणार?
अति तेथे माती ही म्हण लहानपणी का शिकवली जाते हे बहुतेक समजले नसावे समाजवादी झेंड्याला. लोकशाहीच्या आड फक्त अन फक्त घराणेशाही पोसली जातेय अनेक ठिकाणी. जनसेवा हे नाटक अन स्वत:चे नातेवाईक, पाहुणे, सगे सोयरे यांचे अच्छे दिन येऊ लागतात. एकाच घरात लागेल तेवढी पदे दिली जातात. निवडणुकीत झेंडा मिरवणारा फक्त कार्यकर्ताच उरतो शेवटपर्यंत. राजकारण करायचे असेल तर नेतृत्व वगैरे, संभाषण कौशल्य वगैरे कशाला हवे? फक्त एखाद्या राजकीय घरात जन्म घ्यावा एवढेच पुरेसे आहे हो. बाकी तुम्ही लगेच स्वयंघोषित युवानेता, तडफदार, तरुण अन देशाचे भविष्य बनत जाता हे त्रिकालाबाधित सत्य. अशा घराणेशाहीने नवे नेतृत्व कसे काय उदयास येणार?
आता मागच्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर झाली. त्या तारखेअगोदर नुसता धडाका उद्घाटन अन भूमिपूजन ई. चा. माझ्या गावात तर चांगला रस्ता सुद्धा परत मस्त चकाचक करत एक फलक लावला गेला. कुणाच्या हस्ते, कुणाच्या समोर हे होते आणखी विशेष. आता यात दोष व्यवस्थेचा नाही. चार वर्षे सुप्त प्रशासन खडबडून जागे होत कामाचा सपाटा लावते अन सुशिक्षत असणारे आपण सहज मान्य करतो. नसल्यापेक्षा हे बरे असे म्हणत चुकीच्या मार्गांना एकदम राजमार्ग बनवतो. कृत कारित अनुमोदित (गुन्हा करणारा , त्याला करवणारा अन त्याला चुपचाप अनुमोदन देणारा हे सगळे समान दोषी असतात.)चा न्याय इथे लागू करावा की नाही? कोणीही कसलाही विरोध अथवा दखल सुध्दा घेत नाही.
असो, आता फिर..पुन्हा घोषणा, आश्वासने, मोठे मोठे वादे, बडी बडी बातें.. या भूलथापांना फसणारी आपली भोळी भाबडी प्रजा परत मतदान करायला सज्ज आहे.
-- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment