country first म्हणे फवाद साहेब

country first म्हणे फवाद साहेब ... २/१०/१६

काल परवा सेनेच्या झालेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर उमटलेल्या प्रतिक्रिया खरंच अभिमानास्पद होत्या. स्वत: विरोधीपक्ष नेते या धाडसाचे कौतुक करतांना दिसत होते. प्रत्येक भारतीय अभिमानाने सांगत होता की हे असचं व्हायला हवं. त्या भामट्या अन पळकुट्या पाकिस्तानला असाच  धडा शिकवला पाहिजे. सर्व स्तरातून या मोहिमेचे कौतुक झाले. व्हायला ही हवे.

याच पार्श्वभूमीवर भारतात काम करणारे पाकिस्तानी कलाकार अन त्यांचा विरोध तर होणारच. काही संघटना पाकिस्तानी कलाकारांना विरोध करत आंदोलन करतांना दिसल्या. आता सर्वप्रथम झी वाहिनेने त्या पाक कलाकारांना या उरी हल्ल्याची निंदा करावयास सांगितली. अपेक्षेप्रमाणे त्यांनी नकार दिला अन मग आम्ही त्या मालिकाच बंद करतोय असा झी ने पवित्रा घेतला. आता प्रश्न पडतो की त्यांना आपल्या मालिकांमधे काम मिळते अन मगच त्या मालिका सुपरहिट झाल्या का? बर त्यांना काम देऊन, समाविष्ट करून काही संबंध सुधारले का?मग कशाला हा खटाटोप? ते येतात फक्त पैसा अन प्रसिध्दी कमवायला. बर पाकिस्तानने तर हे जाहीर केले की ऊरी हल्ल्यात त्यांचा हात,पाय,धड वा डोके काहीच नाही. म्हणजे तो आतंकवादी हल्ला होता. पाकिस्तान सरकार अथवा सैन्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कसलाही संबंध नव्हता. तर मग या सर्व देशभक्त कलाकारमंडळींनी कठोर शब्दात त्या अमानवीय हल्ल्याची निंदा करायला हवी होती. पण तसे घडले नाही कारण त्यांना सुध्दा जाणीव आहे की या मागे पाकिस्तानचाच हात आहे. अशा पार्श्वभूमीवर हे कलाकार आमच्या देशात येणार,  इथे काम करणार, झालेल्या आतंकवादी हल्ल्याचे मनोमन समर्थन करणार, आमच्या देशात राहून country first चा आम्हालाच पाठ पढवणार.. वाह रे कलाकार!

बघा ना ही मानसिकता. म्हणावे तर गरज सरो वैद्य मरो असेच झाले ना. भारतात राहीले, इथे नाव कमवले, इथल्या जनतेने डोक्यावर ही घेतले, इथे काम करत पैसा ही कमवला आणि वेळ येताच पाकिस्तानात परत जाऊन मान वर करीत सन्माननिय फवाद खान साहेब म्हणतात की country first. वाह! याला म्हणतात देशप्रेम. याला म्हणतात देशभक्त. याला म्हणतात हुशार माणूस. खरच या फवादचा एक ही चित्रपट मी पाहिला नाहीय अजून पण त्याच्या या भूमिकेने मी मात्र प्रभावित झालोय. जिस थाली में खाया उसी में टट्टी केल्यासारखं वागला तो. पण त्याच्या बाजूने विचार केला तर तो १०० % बरोबर आहे. मूर्ख आहेत हे निर्माते अन प्रेक्षक जे यांना डोक्यावर घेतात. एवढा सगळा आदर, स्वीकार, सन्मान देऊन सुध्दा काल ते युवराज फवाद म्हणे की बॉलीवूड कुणाच्या बापाचे नाही. घ्या आता. अजून द्यावी का रेड कारपेट? अजून काही बाकी आहे का ज्याने त्याचा सन्मान राखला जाईल?
या आमच्या देशाने सतत मैत्री, प्रेम, समज ठेवत त्यांचे कलाकार, कवी,  संगीतकार, गायक यांना मान दिला. अहो, पाकिस्तान पेक्षा जास्त इथे सन्मान मिळतो त्यांना. त्यांच्या मैफिली रंगतात इथे. आम्ही कलेचे उपासक आहोत हे नक्की पण तोच कलाकार जर मर्यादा सोडत असेल तर? जर तो केलेल्या अमानवीय अन क्रूर आतंकवादी हल्ल्यांची निंदा न करता अप्रत्यक्ष समर्थनच करत असेल तर मला माझ्यातल्या रसिकाला ठार मारावेच लागेल. मला माझी एक आवड सोडावीच लागेल. जर मी एखादी कलाकृती पाहणार नाही तर फारसे काही बिघडणार नाही. रोजच्या रोज सीमेवर मरणारे माझे देशबांधव संपूर्ण जीवन सोडतात, कुटुंब सोडतात अन किती किती त्याग करतात. मी एखादी गझल ची तलफ, एखाद्या सुफी गाण्याची आवड, एखाद्या फडतूस कलाकारचा चित्रपट किंवा एखादी रोज लागणारी मालिका का नाही सोडू शकत? माझ्या हे सोडल्याने मी काही देशभक्त होणार नाही पण त्या नापाक लोकांना माझ्या आयुष्यात जागा नाही हे मात्र नक्की. माझ्या साठी सुध्दा country first च आहे.
यात एकीकडे country first म्हणणारा फवाद खान अन आमचा सलमान खान त्यांची भलामण करतोय. वाह रे पठ्ठ्या! तो फवाद देशप्रेम दाखवतो अन नकळत त्या आतंकी हल्ल्याचे समर्थन करतो तरीही आपले बजरंगी भाईजान त्यांना सन्मान द्या म्हणतात. आता या मागे कोणत्या प्रेमाचा पुळका आहे हे सांगणे कठीण. असो... जो जर मी देशासाठी त्या पाकड्या कलाकारांचा तिरस्कार करू शकतो तर कोण कुठला हा भाईजान? माझ्या देशाला असुरक्षित म्हणणारे सत्यमेव जयतेवाले पण आम्ही बॉयकॉट केलेत त्यात अजून एक आला.      

असो... तुम्ही परत या देशात येऊ नका. एवढीच माफक अपेक्षा..

                                        --सचिन गाडेकर

Comments