बेंद्रे सर आणि पुष्टी .... ५/९/१७

बेंद्रे सर आणि पुष्टी .... ५/९/१७  

बालपण आणि काही आठवणी जीवनभर सोबत राहतात. त्यातील शिक्षकांचे स्थान तर अढळ आहेच. मग प्राथमिक शिक्षण, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि नंतर पदवी, पदविका अशा अनेक स्तरावर अनेक शिक्षक भेटतात. परंतु लहान वयात जे घडवतात ते सर्वात जास्त लक्षात राहतात. प्रेम आणि आपुलकी तर असतेच पण आयुष्यभर पुरेल असे प्रेम देणाऱ्या शिक्षकांना मन हळवेच याद करते. अशाच एका महान पर्वाचे नाव म्हणजे श्री भा. वी. बेंद्रे सर.
वयाची सत्तरी ओलांडून गेलीय, शरीर वयोमानाने थकले आहे असे सहज चित्र होते. आयुष्य शिक्षण क्षेत्रात इंग्रजी शिकवत आणि शेकडो चिमुकल्यांना ज्ञानदान देऊन आपले स्वत:चे वार्धक्य दुसरी इंनिंग सुरु करत व्यत्तीत करणे म्हणजेच महान कर्मयोग. उतारवयात अनुभवाची शिदोरी दररोज वाटण्याचा आनंद काही वेगळाच असेल नाही का? रिटायर झाल्यावर देखील स्वावलंबी आणि एकटेपणाचे जीवन अनुभवणे ते देखील लहान मुलांसाठी हा नमस्कारार्ह भाग आहे. त्या वयाच्या चिमुकल्यामध्ये स्वतःला सामावून घेणे आणि एकरूप होऊन जाणे हे फार तुरळक जणांना जमते.
सर इतके जवळचे असण्याचे कारण ही तितकेच विशेष. पहिले असे की त्यांच्यामध्ये प्रत्येकाला आपले आजोबा दिसत. ती आजोबाची भावनिक भूक नकळत पूर्ण व्हायची तो देखील त्याच प्रेमाने. एखादा विद्यार्थी आजारी असेल तर त्याला औषध, गोळ्या देत सर काळजी करत. काळजी फक्त शाब्दिक नाही तर त्या मुलाला ताप असेल तर स्वत: हाताने मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या लावत सर. त्याला झोप लागेपर्यंत तिथेच बसून राहत. जणू काही आमची मायच बसली असत. त्याने सकाळी गोळ्या घेतल्या की नाही हि सुध्दा चौकशी होत होती. जर गोळ्या घेण्यात कसूर झाला तर चंपीला (सरांनी झापले तर त्याला चंपी म्हटल जात.) सामोरे जावे लागत. अगदी रडू कोसळेल असे खडे बोल असत त्या चंपी मध्ये. ज्याची वर्षात एकदाही चंपी झाली नाही तो कमनशिबीच म्हणावा.

दुसरी बाब म्हणजे जो एकदा जरी सरांकडे रूमवर गेला तर तो कधीच रिकाम्याहाती परत येत नसे. सरांनी पूजेसाठी फुले आणायला सांगिलते असता आणि फुले ठेवली की पाठीवर थाप आणि किचन मधून डब्बा उघडून ‘हि घे, पुष्टी.’ कधी बिस्कीट पुडा, कधी शेंगदाणा लाडू, कधी मेथीचे लाडू, कधी गोड रव्याचे लाडू तर कधी काय. एकही जण रिक्त हाताने परत येत नसत. सर ज्या मायेने देत असत तिथे नको, नकार शक्यच नव्हते. घरची आठवण आली की एक सहारा आणि भावनिक ताकत म्हणजे सर.

तसेच शिकवता शिकवता जर आम्ही विनंती केली की आम्हाला आज कथा, गोष्ट ऐकवा तर धमाल. सर एक अफाट कथा सांगत. गोष्ट सांगणे म्हणजे हातखंड. एकदा सुरवात झाली तर सर्व रमून जात आणि वेळ कधी पसार होत असे हे कळतच नसे. त्यातील कल्पकता आणि प्रदीर्घ संदर्भ अजूनही लक्षात आहेत. ज्यांना आठवते त्यांना माहित आहे की अजूनही हिमालातील गुढ एक गूढच आहे. बेनहूर ची कहाणी तर लाईफटाईम डोक्यात फीट झालीय. गोष्ट म्हणजे सर आणि सरच.  

सर एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. भावगीत गातांना लागणारा सत्तरीतला सूर अजूनही कानात स्पष्ट आहे. ‘मनी नाही भाव......, दुसरो की जय से पेहले......, चांदण्यात चांदण... ’ आणि अगणित गीते. सर अनेकदा डायलॉग पेश करत. हिटलर कश्या आविर्भावात बोलत असे हे हावभाव करत दाखवत. अनेक निसर्गातील पक्षी आणि त्यांचे मधुर आवाज ते सर लीलया काढत. झाडामागे जाऊन तो माहौल उभा करत पक्ष्याचे आवाज ऐकवत आणि जणू लाइव आवाज ऐकतोय असे होऊन जात. होळी आणि होळीचे सुरगाणाचे अनुभव तर पोट दुखेपर्यंत हसवून जात. वर्गात अस्खलित इंग्रजी आणि शब्दफेक न विसरणारीच होती.

असे एक ना अनेक आयाम सरांचे व्यक्तिमत्व उंचावत असे. त्या कोवळ्या वयात भलेही फार काही प्रकट करू शकलो नसेल पण आज स्वत: एक शिक्षक झाल्यावर पदोपदी ज्यांची आठवण येते आणि दाटून येते त्यातील एक सुवर्ण कमळ म्हणजे आमचे बेंद्रे सर.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!


--- सचिन गाडेकर 

Comments