बस आणि तिकीट .... २३/९/२०१७
बस आणि तिकीट .... २३/९/२०१७
एरवी ट्रेनचे होणारे एकामागून एक होणारे अपघात पाहता आपला थोडा महाग परंतु एस. टी. चा प्रवास बरा असा विचार अनेकजण करताय. मी हि त्यातला एक. एवढ्यात पुणेवारी झाली आणि या वारीचे वर्णन अजून बाकीच आहे म्हणा. परतीच्या प्रवासात निघतांना एका ५ तासाच्या अंतरात जे काही हवे ते सर्व होतेच. पाणी, चार्ज मोबाईल, एक मस्त पुस्तक आणि हाती पेन आणि खिशात कोरे कागद. कधी काय सुचेल आणि लिहावेसे वाटेल हे सांगणार कसे?
आता रविवार असूनही जागा मिळणे म्हणजे काहीतरी पुण्य केले असेल आणि त्याचे फळच मिळाले अशी भावना मनात आली. बसून सर्व बस पाहिली तर किमान ७०% प्रजा बसली होती. कंडक्टर महाराज अगदी प्रामाणिकपणे तिकीट देत होते आणि आपले काम करत होते. गाडी एका प्रसिध्द गावी आली आणि बहुतेक जन उतरले देखील. तिकडे चहापान घेऊन चालक आणि वाहक आले आणि गाडी मार्गस्थ झाली. कंडक्टरने परत तिकीट तिकिटचा राउंड मारला आणि तो किमान २ वेळा येरझारा मारून परत खाली बसला.
आता हा वाहक असा का करतोय हे आम्हा दोन तीन जणांना कोडे पडले. तेवढ्यात वाहक उठले आणि थेट मोजणी चालु केली. प्रत्येकाला तिकीट घेतले का? कथे जायचं आहे हे परत क्रमाक्रमाने विचारू लागला. आम्ही चक्क काढलेले तिकीट दाखवले पण तो मात्र चिंतामुक्त होईना. त्याने सर्व पुरुष मंडळी पुन्हा तपासली. आम्ही मग विचारले की काय प्रोब्लेम आहे का? काय गडबड आहे? त्यावर कंडक्टर म्हणाला की एक कुणीतरी मागच्या गावापासून तिकीट काढले नाही कारण लोक २६ आहेत आणि तिकिटे गेलीय २५.
त्याच्या प्रश्नावर सहज नजर टाकली आणि एका काकांनी सुचवले की परत १००% लोकांना विचारा. यात त्यांचा इशारा आमच्या पुढील महिला वर्गाकडे होता. आणि जसे वाहक सुरु झाले एका ठिकाणी एक सुशिक्षित दिसणारी, हातात स्मार्टफोन,कानात आतपर्यंत गेलेले हेडफोन आणि तोंडावर बांधलेले स्कार्फ असणारी तरुणी कबूल झाली की मी मागच्या गावावरून तिकीट काढले नाही. कंडक्टर काही क्षणांत चिडले की इतक्या वेळा मी विचारतो आहे तर उत्तर का नाही दिले? यावर तीन फक्त म्हणाली की रेडीओ चालू होता. कंडक्टर म्हणाले तर ठीक आहे पण तिकीट घ्या चला. त्यावर दबक्या आवाजात ती म्हणाली की काका एवढेच पैसे होते आणि मला पुढच्या गावापर्यंत म्हणजे अजून किमान ६० ते ८० किलोमीटर जायचे आहे.
कंडक्टर हे ऐकून म्हणाला की पैसे नाहीत कसे? यावर ती म्हणाली की गडबडीत मी पैसे घेतले नाहीत आणि आता पैसे नाहीत. मी देते उतरल्यावर लगेच. कंडक्टर थोडा चिडत, रागवत म्हणाला की ते काय होईल ते पहा. लेडीज आहे म्हणून खाली उतरून देत नाहीय पण ए.टी. कार्ड असेल तर मध्ये एखाद्या पेट्रोल पंपावर अथवा हॉटेलवर पैसे काढून घ्या आणि द्या. ती हळूच हो म्हणाली आणि पुन्हा मान खाली घालून गप्प झाली.
एक काका त्या मुलीला म्हणाले की किती पैसे लागतील बाळ तुला? बहुधा रिटायर व्यक्ती असावा. त्यांनी थेट प्रश्न केला आणि कंडक्टरला लागलीच पैसे देऊ केले. अजूनही असे मदतीचे हात अचानक पुढे येतात. यातच दोन तीन महिलांनी पण पुढाकार घेतला. ती तरुणी लगेच खजील झाली. तिने आपली पर्स खोलली आणि त्यातील ६० रुपये देऊ केले. ती म्हणाली माझ्याकडे एवढेच आहे आणि मी देत नव्हते कारण हे संपले की माझ्याकडे पैसे नाही काही खाण्यास वा पिण्यास. मी एका मुलाखतीस जात आहे आणि त्यसाठी मी हा मार्ग निवडला. सगळी बस क्षणात हळहळली. तिने मात्र देणाऱ्या कुणाचेही पैसे घेतले तर नाहीच पण अजून कळले नाही की आता पुढे ती काय करणार? परत कशी जाणार? तिच्या ए.टी. एम. होते की नाही हा खुलासा झाला नाही. ती तिच्या विचारात मग्न होती आणि एक वेगळीक हतबलता व्यक्त करत होती. आर्थिक असमानता म्हणू किंवा अजून काही पण काही क्षण मन सुन्न होऊन जातं की किती अवघड आहे जगणं देखील काही साठी इथे. एक छोटीशी रक्कम माणसाचं मोजमाप करून जाते. असो, त्या मुलीने बस मध्ये इतर लोकांनी दिलेली रक्कम नाकारली हे देखील विशष. विचारचक्र चालूच होते. पुन्हा मन मग्न झाले भग्न अवस्थेत.
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment