दसरा आणि सिम्मोलंघ

दसरा आणि सिम्मोलंघन ३०/९/१७

आमच्या संस्कृतीच्या पाउलखुणा उत्सवात दडलेल्या आहेत हे सांगायला नको. हा देश एवढे उत्सव का सहन आणि साजरे करतो हे कोडे सर्वांनाच पडते. आज सहज मेसेजेस वाचले तर सर्व ठिकाणी वाईटावर चांगल्याचा विजय, सोन्यासारखे संबंध वगैरे येत होतं. त्यात आमचे मित्र म्हणतात की सिम्मोलंघन करण्याचा दिवस. जरा विचार केला आणि मग रावणदहन, नवरात्र, सोन्याची (आपट्याची पाने) आणि बरीच काही सूक्ष्म सांकेतिक धारा जोडली आहे असे लक्षात येते.

सहज विचार केला आणि मग  सरबत्ती झाली प्रश्नांची की कशाचे सिम्मोलंघन? सिम्मोलंघन म्हणजे नक्की काय? सिम्मोलंघन म्हणजे सीमा उल्लंघन करावे की काय? आमची आई सांगत होती की जुन्या काळी सर्व गावाच्या बाहेर फेरफटका मारून येत. अर्थात हे आपण करतोच नाही का. मग सिम्मोलंघन कसे आणि का? या शब्दाला अनेक छटा आहेत आणि त्या फिरून व्यक्तीपर्यंत याव्यात हाच उद्देश्य असावा.

थोडा विचार आला  की व्यक्तीने स्वत:ला स्वत:हून घातलेल्या मर्यादा, सीमा,मजबुरी आणि अपरिहार्यता यांना उल्लंघन करण्याचा. विधात्याने घडवतांना दिलेले सोन्यारूप देह, साजूक मन आणि कुशाग्र बुद्धी आम्ही मलीन करतो किंवा वापरच करत नाही. मला हे शक्य आणि किंवा ते शक्य नाही हा मंत्रच बहुधा आपली हार निश्चित करतो. पायाला चावलेला छोटासा मुंगळा देखील पूर्ण ताकतीने चावा घेतो जणू सर्व प्राण ओतून हल्ला करतो. समोर अनेक व्यवधान आणि अवरोध पाहून जर आम्ही गर्भगळीत होत असू तर पराभव अटळच आहे.

सिम्मोलंघन केले नवदुर्गेने. होय, मातृरूप आणि कनवाळू मानली जाणारी देवीमाता रुद्र रूप घेत संहार देखील करते. आपला नेहमीचा स्वभाव आणि पायंडा सहसा कोणी सोडू इच्छित नाही. याला इंग्रजीत आपला कम्फर्ट झोन न सोडणे म्हणतात. कम्फर्ट झोन सोडण्याची हिम्मत कुणाकुणातच असते. हे खरे सीमोल्लंघन असावे या पिढीचे. रोजचा दिवस नवा आहे, रोजचा सूर्य नवा आहे. जुना असतो तो मी आणि माझा तोच जुनाट साठा. कुठे काय नवीन वाचतो आम्ही? कुठे काय नवीन बोलतो आम्ही? कुठे नवीन काय करवून घेतो आम्ही? या समाधानी मनोवृत्तीचे उल्लंघन म्हणजे सिम्मोलंघन.

आमच्या पिढीला शाप आणि अभिशाप असे दोन्ही असणारे स्मार्टफोन आणि इंटरनेटचे बंधन सर्वज्ञातच आहे. हे फक्त बंधन राहिले नसून ते गुलामगिरीच बनले आहेत. सक्रांत , दसरा आम्ही एकमेकाच्या घरी जात आणि मोठ्या  धाट्याचा आशीर्वाद आणि दोन शब्द गप्पा होत असत. आज आम्ही सर्व ऑनलाईन करून टाकलंय. पुन्हा ही व्हर्चुअल सीमा काही प्रमाणात उल्लंघन करून पुन्हा वन टू वन व्हावे असे वाटून जाते. हे खरे असेल सिम्मोलंघन.

चला, एक अजून सण पूर्ण होईल कर्मकांड आणि परंपरेने. आज एक तरी असे सिम्मोलंघन करूया जे आपली पकड घट्ट करेन. नाशिबापेक्षा कर्तृत्व आणि प्रयत्न हेच आमचे शस्त्र आणि आज त्याचे पूजन करूयात. सिम्मोलंघन करूयात.  

-- सचिन गाडेकर

Comments