विसर्जनघाट आणि न संपणारी दरी

विसर्जनघाट आणि न संपणारी दरी  ५/९/१७

गणपती विसर्जन धामधुमीत चालू होते. स्वरूपाने हट्ट केला म्हणून तिला गणपती विसर्जन घाटाकडे घेऊन गेलो. जातानाच अनेक मित्र मंडळी, भावबंद आणि गावकरी पाटावर दरवर्षीप्रमाणे पाटामध्ये विसर्जन करत होते. काठावर होणारी आरती आणि मोरयाच्या घोषणा दुमदुमत होत्या. तिथे प्रसाद मुक्तपणे दिला आणि घेतला जात होता. मोदक आणि खिरापत सर्वात जास्त दिले जात होते. एका वेळेस किमान ५ गणपती आरत्या होत होत्या एकामागून एक. मस्त रेलचेल होती मोदक आणि कर्पूरआरतीची.

तसे स्वरूपाला पाण्याचे खूप आकर्षण  आहे. समुद्रवर गेलो होतो तेंव्हा ते पाणी पाहून ती जाम वेडी झाली होती. आता भरून पाहणारा हा पाट पाहून ती खूष झाली. तिचे लक्ष फक्त त्या वाहत्या प्रवाहाकडे आणि येणाऱ्या गणपतीकडे होते. मध्येच तिने समोर काही मुले पमपम आहेत असे मला सांगितले. (पमपम शब्द आमच्याकडे नागडे किंवा विवस्त्र अवस्थेसाठी आहे तिच्या डिक्शनरी मध्ये) मी सहजचखाली नजर टाकली तर ३ ते ४ लहान मुले त्या वाहत्या प्रवाहात येणारे गणपती थेट पाण्याच्या मध्यामध्ये नेऊन बुडवण्याचे काम करत होते. त्यांना त्याबदल्यात काही पैसे वगैरे नको होते.

ते चिमुकले नीट पाहिल्यावर लक्षात आले की थंड पाण्यामुळे आणि सतत पाण्यात उभे असल्याने कुडकुडत होते. काही वेळ निरीक्षण केले असता लक्षात आले की मिळणारे मोदक, प्रसाद गोळा करत होते. एका जुनाट पिशवीत ते हा मिळणारा खाद्यान्नाचा प्रकार (प्रसाद होता इतरांसाठी, पण उपाशी पोटी असणाऱ्या जीवांना ते खाद्यान्नच होते.) इथपर्यंत मी नॉर्मल होतो पण त्यानंतर जे पाहिले ते काळीज हेलावणार होतं. पाण्यात वाहत येणारे सर्व फळप्रकार देखील ते गोळा करत होते. जास्त सडलेले अथवा खराब नसेल तर ते लगेच पिशवीत जात होते.

निर्माल्य म्हणून फेकले जाणारे फळ कुणाच्या चेहऱ्यावर हास्य आणेल हे कधीच कल्पनेत ही वाटले नव्हते. खूप सारं विचारचक्र सुरु झालं. किती विरोधाभास आहे आपल्या अवतीभवती? कुणी काही हजार रुपयांची उत्सवमालिका करतो तर कुणी वाहत्या आणि वाहिलेल्या फळांचा देखील भुकेला आहे. ही आर्थिक असमानता आणि असीमित दरी देव जाणो कधी कमी होईल. उत्सव माणसाला उभे करतात असं म्हटलं जातं मग कधी कसे अजूनही अनुत्तरीतच. अर्थात उत्सव व्हावेत आणि त्यात कसूर व्हावी हा उद्देश्य नाही पण कुणावर आरतीचे मोदक आणि वाहती फळे गोळा करण्याचे दिवस येऊ नये हीच इच्छा.


--- सचिन गाडेकर  

Comments