म्हसनखाई आणि मी
म्हसनखाई आणि मी ....१६.१.१८
आज पुन्हा काही अश्रू उघड्या डोळ्याने पाहिले. जीव असा कासावीस झाला आणि लाज वाटली स्वत:ची. कोणत्या गुलामगिरीत जगतो आहे आज देखील हे उमजेना. कष्टाने कमावलेले, हक्काचं जेंव्हा मिळत नाही तेंव्हा जीवाची घालमेल होते. कोणी किती खालच्या स्तराला जाईल हे अनुमान देखील करता येत नाही. रोज सकाळी उठून, सगळा घरचा भार आवरत पाय शाळेकडे वळताच जड का पडावेत? का मन रोखू लागते स्वत:स? काय स्वप्न पहिले असतील आणि काय वाढून ठेवलंय पुढे?
अनेक खोटे वादे झाले आणि मागच्या आठवड्यात मंगळवारचा वायदा झाला आणि तो देखील एका पगाराचा. अर्थात यावर फार विश्वास ठेवत नाही पण आशा माणसाला वेडी करते. एखादा दिवस ते चातकासारखे वाट पाहू लागतात. घरी होणारी विचारपूस तर वेगळीच. जो तो उसनवारी आणि उधारीत आकंठ बुडाला आहे हे नक्की. महिला मंडळ तरी किमान तग धरून आहे पण कर्तेधर्ते पुरुष देखील खजील होत आई बापाकडून पैसे घेत रोजचं येणं जाणं करत आहेत. दोन दोन पोरं झाली आणि तरी मायबाप रोजचे खर्च पुरवतील या पेक्षा मरणयातना कोणत्या?
गेली ६ महिने फक्त खोट्या अपेक्षा आणि तारखा खाऊन गेल्यात मनाला. कसलाही नैतिकतेचा भाग उरला नाही आता. त्या स्मशानातील बैरागी सारखी अवस्था झालीय माझी. या जिवंत स्मशानात रोज एक मुडदा येतो, कधीकधी तर दोन तीन देखील. त्या प्रत्येकाची व्यथा, रुदन आणि आक्रोश ऐकत ऐकत मन आता निष्ठुर झालंय काय करून घेतलेस स्वत:चे हे विचारतो मी स्वत:ला. रोज तो बैरागी चार चिता जाळतो. चेहऱ्यावर कसलाही लवलेश नाही. बहुधा त्याला उमगलंय की हे सगळं व्यर्थ आहे. कोणीच दखल घेत नाही त्याच्या दुखा:ची. रोजचे ते ओझे झेलत तो झोपतांना मात्र ढसढसा रडतो. जाणारा आणि जळणारा रिज त्याचे थोडे थोडे आयुष्य घेऊन जातो हे नक्की.
रोजच्या घडामोडीत जिवंत माणसांचे मडक्यासारखे जीवन करून टाकले आहे परिस्थितीने. ज्या मडक्यात जीवनरूप वाटणारे पाणी भरून ठेवावे आणि इतरांना जीवन द्यावे अश्या मडक्यांना जीवन सोडून कुणाच्या गार पडलेल्या तर कुणाच्या थिजलेल्या देहावर ओवाळण्याची वेळ येते. डोळ्यात नवसर्जन करू पाहणारे कधीच मृतप्राय होऊन बसले आहेत. हे खापर स्वत: वर की अजून कुणावर फोडायचे हेच फक्त नक्की होत नाहीय. अरे, तो रोजच्या रोज कमावून खाणारा देखील उजवा आहे आज अशी लाचार आणि हवालदिल अवस्था झाली आहे. पैसे सर्वस्व नाहीत यात दुमत ही नाही पण पैसेच नाहीत तर मग काय करणार?
आज कोणी टोकाचा विचार करू नये एवढेच वाटते. सर्वाना धीर देत सांगतोय की स्वत:ला त्रास होऊ देऊ नका. थोडे दिवस मानसिक संतुलन सांभाळा. एकदा दिवस फिरले तर सर्व आलबेल होईल. हा खोटा आशावाद नसून यत्नवाद आहे स्वत:चे हनन रोखण्याचा. बस, अशी वेळ दुष्मनावर सुद्धा येऊ नये ही कामना.
चला, पुन्हा चक्कर मारून येतो म्हसनखाईत. कोणी आले असेल पुन्हा कैफियत आणि मृतवत भाव घेऊन. तोच अंगारा, तीच पद्धती आणि तेच स्मशान वैराग्य.
---- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment