भूतदया आणि सर्पमित्र

भूतदया आणि सर्पमित्र  २८/३/१८

आज दुपारच्या रणरणत्या उन्हात दररोजच्या कामकाजात मग्न होतो. शांतपणे ठरलेली कामे उरकण्याची घाई चालू होती. जो तो आपापल्या कामात दंग होता. तेवढ्यात मागच्या बाजूला असलेल्या काटवण आहे आणि तिथे एक सर्प एका काटेरी बाभळीवर असल्याचे एकाने पाहिले. लगेच लगबग झाली. सारी प्रजा धूम ठोकत तिकडे पोहोचली. डाव्या बाजूला असलेल्या कुंपणाला आधार मानत सगळे उत्सुकतेने तो अडकलेला सर्प पाहिला. तो सर्प एकदम काटेरी झाडावर एक तर चिमणीच्या किंवा एखाद्या भक्ष्याच्या शोधात वर पर्यंत पोहोचला आणि एकदम अडकला होता.

सर्वांनी हे पाहताच आमच्यातील एकाने लगेचच सर्पमित्राला फोन केला. कुणीही सर्पाला मारा किंवा काय असे म्हटले नाही हे शिक्षणाचे उपकार. सर्व ठराविक अंतरावर उभे राहून त्या अडकलेल्या सर्पाला पाहत होते. तो बारीकश्या काटेरी फांदीवर असलेल्या काट्यांना सहन करत पुढे मागे सरकत होता. त्यात मध्ये मध्ये आजूबाजूला उडणाऱ्या बारीक चिमण्यांना लक्ष्य करत फणा काढून उभा ठाकत होता. अर्थात हे दृश्य विरळच. साप या प्राण्याविषयी नकळत उभा राहणारा भीतीचा भाग मनात धस्स करतच होता. सर्व मंडळी मग मात्र आपापले मोबाईल काढून जमेल तेवढा झूम करत तो तगमग शूट करत होता.

तेवढ्यात घाईघाईने राहाता परिसरात सर्पमित्र म्हणून प्रख्यात असणारे श्री. गणेश अनाप हे लगबगीने दाखल झाले. तातडीने आणि तत्परतेने स्वत:चे चालू काम सोडून ते पोहोचले. मार्च एंडच्या गर्दीत आलेला फोन कॉल घेत साप पकडून तो सुरक्षित ठिकाणी जावा यासाठी हि सगळी धडपड. ते तीन जन पोहोचले आणि त्यांनी मायना केला. सर्वाना मागे सारत मोठ्या हिमतीने (आपल्यासाठी हिम्मतच ती) पुढे सरसावले. थोडी पाहणी आणि लगेच काही प्रयत्न करून सर्प हातात पकडत मोकळ्या जागेत आणला. जे पाहत होतो ते किती भयंकर आणी धोकादायक आहे याची सर्वाना जाणीव होत होती.

मोकळ्या जागेत येऊन त्यांनी त्या थकलेल्या आणि घाबरलेल्या जीवाला थोडा उसासा दिला. आम्ही थोडी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हा ‘ स्पेकट्याकल्ड कोब्रा ’ आहे. हे ऐकताच थोडी टरकली देखील. परंतु थोडेसे निरीक्षण केले असता अनाप म्हणाले की हा कोब्रा आता जखमी अवस्थेत आहे. त्याची एकतर  कोण्या मुंगुसाशी झडप झालेली आहे किंवा एखाद्या मोठ्या नरासोबत. बोलला जाणारा प्रत्येक शब्द हा अभ्यासपूर्ण आणि अनुभवपूर्ण होता हे जाणवत होते. त्यांनी पाणी मागितले आणि सर्पाला थोडेसे पाणी पाजत शांत केले. पाणी पिताच सर्प पुन्हा तजेलदार आणि सक्रीय झाला. तोपर्यंत बाटली तयार झाली आणि सर्प काळजीपूर्वक आत ठेवला गेला.

यानंतर अनाप यांनी एक इच्छा व्यक्त केली की शाळेतील मुलांना एकदा हे सर्प विषयी प्रबोधन आणि मार्गदर्शन करू इच्छितो. मी लगेचच होकार दर्शवला कारण हे केलेलं काम खूपच सराहानीय आणि कौतुकास पात्र होते. सर्प म्हणताच मनात उभी राहणारी भीती घालवणे हा मुख्य उद्देश्य होता. पुढे आम्ही एक आभार व्यक्त करत फोटो देखिल घेतला आणि धन्यवाद दिले. जाता जाता अनाप हे देखील म्हणाले की हे मी छंद म्हणून करतो. मी  एक इंजिनियर आहे पण हे काम आवड आणि सामाजिक भान म्हणून करतो. कोणत्याही कामात असो मी लगेच धावत जातो कारण धोका टाळायचा असतो आणि एक सर्प जीव वाचवायचा असतो. त्यातही लोक चुकीचे कॉल करतात. दहा-दहा किलोमीटर काम सोडून जाऊन जर साप नसेल किंवा अफवा असेल तर मात्र वाईट वाटते कारण का चेष्टेचा आणि टाईमपासचा विषय नाही. असो, मी मात्र गेली १० वर्ष हे काम करत आहे आणी करत राहणार.

आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद दिले आणि दुपारच्या उन्हात एक जीव सुखरूप वाचवला याचे समाधान वाटले. सर्व ती चर्चा आणि ते रूप आठवत परत कामात दंग झाले. सर्वाना हे आवाहन की असे सर्प कुठेही आढळल्यास त्यास मारू नये. लवकर सर्पमित्रास बोलावून त्यास सुखरूप आणि सुरक्षित रेस्क्यू करावे हि भावना.

--- सचिन गाडेकर

Comments