वाढदिवस विशेष डॉ. प्रमोद ठोंबरे 10/10/18
वाढदिवस विशेष डॉ. प्रमोद ठोंबरे 10/10/18
आज डॉ. प्रमोद ठोंबरे यांचा वाढदिवस. आज काही विशेष लिहावंच लागेल. प्रमोद आज जो काही आहे तो फक्त आणि फक्त संघर्ष आणि चिकाटीचा परिपाक आहे. त्याचे आयुष्य अगदी सातवीपासून जळवून पाहणाऱ्या लोकांना आजचा प्रमोद अभिमान वाटेल असाच आहे. २००८ साली पुण्यात आलो आणि मन रमले ते प्रमोद, शरद, हितू आणि अश्या अनेक जनांमुळे. मुळात प्रमोद म्हणजे आव्हानं घेणारा, काहीतरी वेगळं करू असं म्हणणारा. त्यामुळे डॉ बनण्याचे स्वप्न त्याने पाहिले.
स्वप्न आणि स्वप्न न पाहता ते सत्यात उतरवले. त्यात कुठे वैदिक अभ्यास करणारा प्रमोद आणि कुठे हे भयाण व्यावसायिक झालेले वैद्यकीय क्षेत्र. परंतु प्रमोद यात कधीच भरकटला नाही. त्याची दिशा, त्याचे ध्येय सतत त्याला जागवत होते हे नक्की. औरंगाबाद सुटले आणि पुणे जीवनपथ झाला. अगदी तास न तास, दिवस रात्र रुबी हॉलचे काम असो किंवा डोक्यात फिरणारे चक्र असो. आमचा प्रमोद कधी ढासळला नाही आणि ढळला देखील नाही. (अर्थात देवाने त्याला त्यासाठीच थोडे स्थूल आणि भक्कम बनवले असावे.) त्याची सुरवात आणि त्यात पाचवीला पुजलेला संघर्ष फक्त आठवला तरी अंगावर शहारे येतात.
अखेर संकल्प झाला आणि सुरवात झाली दिर्घायुच्या उभारणीची. एक एक पाऊल रचत सांगवित दीर्घायु सुरु झाले. जाड्या, तुझा संकल्प आणि तुझी संकल्पशक्ती याला कारणीभूत होती. तुझा ध्यास आणि कष्ट देव तरी किती दिवस उभ्या डोळ्याने पाहणार होता? तू एल्गार केलास आणि सगळं कसं आपसूक जुळून आलं. दीर्घायु फक्त तुझे स्वप्न न राहता ते आता प्रत्यक्ष रूपात आलं होतं. आम्हा सगळ्यांना आनंद तर होताच पण जास्त वाटत होता तो गर्व आणि अभिमान तुझा. कधी असे शब्द वापरून तुला सांगेन हे वाटे आणि आज तर मौका भी है..दस्तूर भी...
पुण्यात आलास. क्लिनिक सुरु केलेस आणि आज स्वतःचे घर हे सगळं सांगून मला भौतिक बाबी सांगायच्या नाहीतच मुळी. मला सांगायचे आहे ते आपल्या कष्टाला यश देव देतो कारण आपण कुठेही चुकत नाही यासाठी. किमान त्याला आवडेल असे, त्याने अपेक्षित असे जगण्याचा यत्न करत आहोत म्हणून तो अशी प्रेमपत्रे देत आहे हे समजून घेणे गरजेचे रे.
या समस्त प्रवाहात तुझ्या वाढदिवसाला तुझ्या या यशात बरोबरीची भागीदार अर्चनावहिनी हिचे नाव नाही घेतले तर सगळे व्यर्थ होईल. उभ्या जगाची फाटाफूट करत मिळवलेलं प्रेम किती भक्कम आणि किती सार्थ होतं हे आज कळत असेल सर्वाना. आम्ही तर डोळ्याने पाहत देखील आहोत. योग्य व्यक्ती आणि योग्य साथ हे तुम्हा दोघांचे वर्णन होईल बघ. आज मागे वळून पाहशील तर खाचखळगे आणि व्यर्थ प्रतिकार दिसेल पण तुमच्या कष्टाने आणि देवाच्या आशीर्वादाने आजचा आज किती मस्त, सुखद आणि प्रेरणादायी आहे हे नक्की.
हा प्रवास, हि यशोगाथा खूप बोलकी आहे. खूप काही आहे तुझ्याकडून शिकावे असे. असाच प्रवास चालू दे आणि होऊ दे निरामय आयुष्य तुझ्या हाताने.
मस्त मजेत रहा आणि आनंद भरत रहा आमच्या जीवनात तू सदा. दीर्घायु हो! औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
---- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment