वाढदिवस विशेष ..अजिंक्य कुलकर्णी ४/१०/१८

वाढदिवस विशेष ..अजिंक्य कुलकर्णी ४/१०/१८

अजिंक्यदेव यांचा वाढदिवस म्हटलं की खूप काही लिहावेसे वाटत होते. आज सकाळपासून खूप सारे विचार डोक्यात घोंगावत होते.अजिंक्यभाई, तुम्हाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. ईश्वर तुम्हास ते सर्व प्रदान करोत जे तुमच्या आणि त्या विधात्याच्या मनात आहे.

अजिंक्य भाई म्हणजे एक चालता बोलता ज्ञानवृक्ष. या मागे आहे पुस्तकांशी असलेला त्यांचा अखंडीत व्यासंग. माझ्या माहितीत असलेल्या शेकडो जनांत हा एक अवलिया माणूस आहे जो सतत नवनवीन वाचत असतो आणि त्याचे समर्पक चिंतन देखील करतो. त्यांची पुस्तकसंपदा तर एकदा भेट द्यावी अशी आहे. माणूस भेटून प्रभावित नाही झाला तरच नवल. यात असे म्हणतात की वाचन वाचकाला अंतर्मुख करते. हा अवलिया ते सगळे वाचलेले बहिर्मुख होत सर्वांपर्यंत घेऊन देखील जातो. सहजच  चहा प्यावा आणि काळ परवा वाचलेल्या पुस्तकात काय वाचले? काय शिकायला मिळाले?काय भन्नाट विचार होते असे ऐकायला मिळते. मला त्यांनी भेट सुचवलेले आणि भेट दिलेले “डीप वर्क” इतके भावले की त्याने माझे अनेक आयाम बदलवले. अनेक नव्या गोष्टी आणि नवे उपाय सुचले. भाई, धन्यवाद बर का....

बरं हा अवलिया नुसता पोकळ वाचक नसून तो एक उत्कृष्ट लेखक हि आहे. अजिंक्य भाई असे काही लिखाण करतात की ते थेट मनात जागा निर्माण करते. त्यांचे लेखन ठाव घेते थेट हृदयाचा. पुस्तकांचे समीक्षण तर कमालच असते. अनेक प्रथितयश लेखक यांचे लेख वाचून त्यावर प्रतिक्रिया देतात आणि कौतुक करतात हे महत्त्वाचे आहे. आम्ही आणि असे अनेकजण चातक बनलो आहोत त्यांच्या पोस्ट आणि लेखांचे. यात समकालीन विषय असेल तर धारदार आणि चपखल टीका करताना मागे पुढे न पाहता सत्य मांडतो हे फार भावते.

एवढ्यावरच थांबलो तर कसे होईल हो.... भाईचा आणखी एक हातखंडा म्हणजे इतिहास. त्याच्या अभ्यास आणि संशोधक याचा परीघ खूपच विस्तारला आहे. सोदाहरण आणि तार्कीक असे वक्तव्य असते. त्यात आजच्या दीड जीबी डेटाचा सर्वोत्तम उपयोग कोणी करत असेल तर हे महाशय. युट्यूबवरील माहितीप्रत आणि अभ्यासपूर्ण भाषणे डाऊनलोड करत वेळ देऊन ऐकत बसने हा छंद. मागे मला एका एक हार्डडिस्क भरेल एवढे विडीयो आणि ऑडियो दिले होते. अजूनही दमछाक होते ते पूर्ण करायला. गेल्यावर्षी शाळेत मुलांसाठी घेतलेली शिवचरित्र व्याख्यानमाला तुम्ही किती उंचीवर नेऊन ठेवलीत हे सांगायची आवश्यकता नाही.

या लिखाण आणि वाचन याच्या पुढे त्यांची आवड आहे चित्रपट पाहण्याची. यात प्रामुख्याने दर्जेदार हॉलीवूडचे चित्रपट येतात. एखादा संदर्भ आला तर थेट तो चित्रपट आणि त्याची माहिती येणार म्हणजे येणार. बाकीचे मग मात्र तो चित्रपट त्या नंतर नक्की पाहतात. मराठी, हिंदी अथवा इंग्रजी असो, दर्जा असेल तर चित्रपट पहिलाच समजा. नुसता न पाहता त्यावर समीक्षण देखील अप्रतिम असते.
या सगळ्या बाबी पाहिल्या की मग प्रेरणा मिळते भाई. उत्साह, अभ्यास, अद्भुत वक्तृत्व, माणसांना जिंकून टाकणारी शैली हे सगळं देवाने एकाच ठिकाणी देऊन कमालच केलीय.
तुमची पोटतिडीक तुम्हाला इतर लोकांपेक्षा वेगळी ठरवते. पोटतिडीक मग ती आजच्या व्यवस्थेबद्दल असो अथवा भरकटनाऱ्या पिढीबद्दल, असो आजच्या कमकुवत शिक्षण प्रणालीबद्दल किंवा फ्री इंटरनेटच्या नादात सर्वस्व दावणीला लावत वेळ वाया घालवणारी विद्यार्थीदशा असो तुम्ही जे प्रयत्न करत आहात ते असेच सफल होवोत.
एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहात तुम्ही आणि तुम्ही मित्र असल्याचा अभिमान आणि आनंद आहे.

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन. तुम जियो हजारो साल.....

--- सचिन गाडेकर

Comments