सरकारी काम आणि चार दिवस थांब 6/8/19

सरकारी काम आणि चार दिवस थांब 6/8/19

सरकारी कामाची पद्धत आणि खाजगी कामाची पद्धत याचा आज पुन्हा एकदा अनुभव आला.गेले एक आठवडा बँकेत एक बचत खाते खोलावा असा मानस होता. अतिवृष्टी आणि पूरस्तिथीमुळे गेले दोन दिवस सुट्टी देखील होती. म्हटलं चला, लागलीच हे काम करून टाकू.

सकाळी साडे अकरा बाराच्या दरम्यान पंजाब नॅशनल बँकेत गेलो. पाच पैकी फक्त तीन लोक काम करत होते. मनुष्यबळ तसेही कमीच असते सरकारी ठिकाणी. मग मी हिम्मत करून एका कर्मचारी महिलेला विनम्रपणे विचारले की मला बँकेत खाते सुरू करायचे आहे, कृपया मार्गदर्शन करावे. तर काही सेकंदाने माझ्याकडे पाहत "समोर फॉर्म आहेत तो घ्या आणि भरा." मी काउंटरला गेलो तर तिथे किमान पाच प्रकारचे फॉर्म होते म्हणून सगळे घेऊन जात परत विचारलं की यातले कोणते आहेत हो? लगेच स्वरयंत्र ताणून आणि वैतागून आवाज आला " ते काय ते, अमुक तमुक असलेला फॉर्म भरा.

मी फक्त पाहत राहिलो की आलेल्या ग्राहकाला काय भारी वागणूक आहे. नवीन खाते म्हणजे अजून एक काम असा सुर असतो यांचा. मग मी शांत बसून फॉर्म चाळला तर लक्षात आलं की बरंच काही आहे यात. चुकला तर प्रॉब्लेम नको म्हणून परत जाऊन विचारलं तरी तोच सूर होता. मी फॉर्म भरला आणि द्यायला  गेलो तर "अजून एक फॉर्म आहे तो पण भरा" आता दोन फॉर्म भरा असे अगोदर कोण सांगणार?

फॉर्म भरला आणि फोटो घेऊन, तो मस्त चिकटवून गेलो तर दुपारचे अडीच वाजले असतील. मी कागद समोर केला तर म्हणे की ही कामे फक्त 11 ते 2 करतो आम्ही. मी सगळीकडं नजर फिरवली आणि खातरजमा।केली की कुठे असा बोर्ड आहे का बाबा. काहीही कुठेही असे नमूद केलेले नाही आणि याला सरकारी सिस्टीम म्हणतात. आलेला ग्राहक जो अजूनही सरकारी यंत्रणेत विश्वास ठेवू इच्छितो त्याला असा अनुभव म्हणजे कमालच नाही का!

मग डोकं तोपर्यंत सरकलेलं होतं. अर्धा दिवस किंवा 2 तास घालून असा प्रकार असेल तर वैताग आला तर काय नवल? तिथेच फॉर्म बॅगेत विचारलं की उद्या आले ते चालेल का? तर उत्तर खास होते.  तिथे असलेले ये दोन तीन कर्मचारी चर्चा करून म्हणाले की चार दिवसांनी या, इंटरनेट किंवा तत्सम अडचण आहे. त्यातल्या कुणीही हे विचारलं देखील नाही की कोणत्या प्रकारचे खाते हवे? कुठली कागदपत्रं लागतील की काय? कसलंही घेणं देणं नाही.

मी थेट खाली उतरलो आणि ठरवलं की आता पुरे झाले. एवढा बेफिकीरपणा आणि एवढी कामाची निष्काळजी?
मग रस्त्यात नेहमीची HDFC Bank  दिसली. सहजच आत गेलो आणि मला आत येत आहे हे पाहून एक तरुण पुढे आला आणि वेलकम केले. योग्य काउंटरवर जाण्यास मदत केली. मला खाजगी आणि सरकारी पद्धत येथे दिसली. लगेच तोंडी माहीती घेत दोन ते तीन प्रकार समजावले. उद्या एका दिवसात खाते उघडता येते हे ऐकून मी पण अवाक झालो. गेले दोन तास घाणेरडी सरकारी व्यवस्था जो शीण देऊन गेली त्या तुलनेत हे उजवे नाही का?

बँकेत आलेला ग्राहक ज्यांना नकोय ते बँकेच्या आणि जनतेच्या सेवेत आहे हे कसे पटेल मनाला?  खाजगी बँकेत10 हजार किमान रक्कम असावी लागते हे ठाऊक आहे परंतु असा सरकारी बिनकामाचा प्रकार आज खूप दिवसांनी अनुभवला. का सुशिक्षित लोक खाजगी सेवेकडे वळणार नाही बरं या अश्या सेवेने?खूप वेळा म्हण ऐकली होती की सरकारी काम चार दिवस थांब. आज पुन्हा प्रत्यय दिल्याबद्दल पंजाब बँकेचे आभार.

-- सचिन गाडेकर

Comments