रक्षाबंधन
रक्षाबंधन १५/८/१९
रक्षाबंधन हा उत्सव म्हटला की हलकेच भरून यायला होतं. बालपणीपासून सगळ्या नात्यांत हळवे आणि जीवाभावाचे नाते म्हणजे बहिण भावाचे. एका छताखाली वाढलो, मोठे झालो, खेळलो , बागडलो आणि असीमित भांडलो. ज्यांना हा भाग अनुभवास आलाय ते धन्यच. बहिण भाऊ आणि भांडणे तर मोजमापाच्या पलीकडेच असतील. जे दोघे भांडतात कधी तर लगेच संधी होत परत तोच प्रकार. पुन्हा भांडण आणि पुन्हा एकदा सुलह. जर ती बोलली नाही तर लगेच काहीतरी खटपट करत तिला मनवायचं आणि पुन्हा भांडायचं.
बऱ भांडण्याच कारण काय तर माझा अभ्यास असेल तर तिला टीवी पहायचा असतो, मग रिमोटवरून अगदी तुंबळ मारामारी. मला जे हवं असते ते तिला लगेच पाहिजे असत. बर या ढबाकुटीत बंधू मोठा असेल तर लहान्या भावंडाला मारले म्हणून आई वडील परत त्यालाच वाजवतात. हा घरातील मोठ्या असलेल्या भावंडाचा नेहमीचा प्रोब्लेमच म्हटला पाहिजे. असेच एकमेकांना हाणत मारत, झगडत कसे एकजीव झालो हेच कळले नाही.
खरे सांगायचे तर कधी लहानाचे मोठे होऊन गेलो हेच कळाले नाही. कधी ती दुडूदुडू धावणारी छोटी बहिण मोठी झाली आणि आईच्या भूमिकेने काळजी करू लागली हे देखील कळले नाही. नकळत माझी काळजी घेणारी एक व्यक्ती बनते तो बहिण. त्यात ती लहान असो अथवा मोठी. तिच्या विचारपूस केल्यानेच अर्धे श्रम जणू हलके होतात. ती जेंव्हा हक्काने झापते , रागावते आणि तंबी देते तेव्हा खूप गहिवरून येतं. तिच्यात आपोआप आई कशी काय अवतरते हे मात्र उलगडण्या पलीकडचे आहे. मी फक्त नि:शब्द होतो असा क्षणात.
या सगळ्या प्रवासात ती छोटीसी बहीण एकदम मोठी होऊन जाते. तिच्या आयुष्यात असणाऱ्या गोष्टी, अडचणी मागे टाकत तू कसा आहेस? काय करतो आहेस? काय समस्या तर नाहीत ना? जरा विचार करून हे ते ठरवत जा असा डोस पण देते. त्यात अपेक्षा काय तर या भाऊरायाने भेटावं, गप्पा माराव्यात, त्याला वेळ असेल तर उभ्या उभ्या भेटून जावं एवढंच काय ते अपेक्षांचं ओझं.
आजच्या वर्च्यूअल जगात सुध्दा अशा वर्षाकाठी दोन ते तीन भेटी सुध्दा तिला पुरेश्या पडतात.तिला फार काही लागत नाही. भाऊ भेटला की आधार वाटतो म्हणे, आणि सत्यच आहे ते. डोळ्यात पाणी आणून ती राखी बांधते आणि हक्काने देवाला बजावून सांगते की आता याची रक्षा मी या राखी स्वरूपात करणार आहे. देवा, तू पण लक्षात ठेव. तो फक्त एक धागा नसून तिच्या प्रेमाचं जणू कवचच आहे. त्यात तिची तळमळ आणि प्रार्थना टाळण्याइतका तो विधाता सुध्दा मोठा झालेला नाही. त्या जीवाभावाने हे नाते जपणाऱ्या सर्व ताई, बहिण आणि सिस्टरला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा संबंध आणि असाच नात्याचा प्रेमळ भाव असाच दृढ होवो आणि हे नाते जन्मोन्जन्म असेच मिळो ही एकच याचना.
सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा |
---सचिन गाडेकर
Comments
Post a Comment