दिवस मैत्रीचा (Happy Friendship Day)
कालच मैत्री दिवस साजरा झाला. पावसाने त्यावर कुरघोडी केल्याने तसा दिवस रिताच गेला. आज थोडी उसंत मिळाल्याने हे सदर शेयर करत आहे. सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या एक दिवस उशिराने शुभेच्छा.
दिवस मैत्रीचा (Happy Friendship Day)
आजचा दिवसच खास. कुणाकुणाचे नाव घ्यावे असे होऊन जाते. अगदी बालपणी छोटीशी शाळेची वाट मोठी होऊन जायची. रमतगमत जायचे आणि गप्पा टप्पा महत्वाच्या असायच्या. शाळा तर निमित्त असायचं सवंगड्याना भेटायचं. शाळा सुटली की मस्त दप्तर फेकत आहे तसं विटीदांडू, लपाछपी असे पारंपारिक खेळ दमेपर्यंत खेळत. खेळ सुध्दा बहाणा त्या मित्रांना भेटण्यासाठीचा. अर्थात ते सगळे काळाच्या ओघात लुप्त झाले हे सांगणे कठीण आहे. आता मधेच एखादा सवंगडी भेटतो आणि पुन्हा उजाळा मिळतो त्या धूसर आठवणींना.
नंतर कॉलेज, व्यावसायिक शिक्षण होते आणि नवे मित्र बनतात. या नव्या विश्वात गरज असते नाते समजून घेण्याची. किती किती जण भेटतात आणि ते ग्रुप स्पिरीट उभे राहते सिनेमासारखे. त्यात भर घालतात हे सिनेमे. इगल बिच्छू सारखे गट, तर कुठे डायलॉग पडतात ‘ये दोस्ती वगैरे..’ अर्थात सगळेच मणी या माळेत ओवले जातात असे नाही बर का. पण एक नक्की आहे की या सगळ्या मित्रांमुळेच ते एकत्र पडलेले आयुष्य जणू रंगीत आणि मस्त बनते. एक एक अध्याय जोडला जातो आयुष्यात.
मग नोकरी, व्यवसाय अथवा पुन्हा अभ्यास चालू होतो आणि रोजरोज भेटणारे, तासनतास गप्पा मारणारे, रोजचा नवा स्टेट्स ठेवणारे दर्शन दुर्लभ होतात ही वास्तविकता. फोनवर ‘मिस यु मित्रा’ हा शब्दोच्चार सुध्दा तोचतोचपणा आणतो. मग कुठेतरी विकेंड ला भेटत सारी कसर दूर काढतात एवढेच काय ते सुख. जीव तुटतो त्या जुन्या आठवणी काढून. कुणाकुणाला किती वेळा कॉल करावा आणि सांगाव की ‘यार, तुझ्याशिवाय खरच हे विश्व अधुरे आहे.’ किती सारे व्यस्त असलो तरी थोडा वेळ असेल ना रे तुझ्याकडे एक मेसेज साठी, एका कॉल साठी, एका धावत्या भेटीसाठी....
मुळातच मैत्री पलीकडे असते या अशा अवरोधापलीकडे. नुसता त्याचा/तिचा विचार आला तरी काळजात एक सुखद जाणीव होते आणि मन त्या ईश्वराचे आभार मानते की हे मैत्रीचे विश्व दिले आणि मला पूर्ण केले. हे मित्र अनेक रुपात मिळतात. कोणी क्लासमेट तर कोणी चक्क शिक्षक, कोणी सहकर्मचारी तर कोणी छंद जपणारा वेडा, कोणी सिनियर तर कोणी जुनियर, कोणी छोटी बहिण तर कुणाचा मोठा भाऊ, रूममेट तर बाय डीफोल्ट बनतातच म्हणा. हे असे अजून असंख्य असे सवंगडी जीवनाला गुंफतात आणि सुंदर बनवतात.
माझ्या जीवनात असे अविभाज्य भाग बनलेले सर्व मित्रमंडळी... आपण भले काही क्षण, काही दिवस अथवा वर्ष या मधुर नात्यात गुंफलो असेल तरी ती जाणीव तशीच आहे हृदयात. तुम्ही आणि मी भलेही भेटू शकत नाही अथवा जास्त गप्पा होत नाही पण ‘अभी भी दिल धडकता है आपके लिये’ तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही मग कितीही दुरावा आला अथवा विरह. ही बांधलेली सख्यडोर ना तुम्ही तोडू शकता ना मी. मैत्रीचा दिवस बहुदा याच साठी असावा की आपण परत हा सगळा प्रवास आठवावा, प्रयत्न असावा की हे नाते असेच घट्ट रहावे. *कितीही दृष्टीआड गेला तरी मी सृष्टीआड जाणार नाही* हेच सांगायचा आजचा दिवस.
चला, तुम्हाला मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
---- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment