राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ..
सुट्टी म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी कराव्याश्या वाटतात. परंतु खूप काही राहूनच जातं. दोन वर्षांपूर्वी सुचलेली ही कविता शेयर करत आहे.
राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ..
उठावे थोडेसे लवकर म्हणत आपसूक पसार होते सकाळ |
न्हावू माखू घालत देव्हारा मनोभावे निवांत जपावी माळ |
घ्यावा हरिपाठ अन गुणगुणावे अभंग घेऊन हाती टाळ |
व्हावे सूर्यदर्शन अर्घ्य देत, लावावी अंगणी तेवती दीपमाळ |
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........
घ्यावा मस्त चहा गरम गरम अन नवीन काही खाणे |
इडली डोसा, शिरा जोडीला कानावर हिंदी मराठी गाणे |
जात अंगणी चिऊ काऊला टाकावे कसे दोनचार दाणे |
खेळावे विसरून मोठेपण पुन्हा बनावे मग सर्वात लहाने |
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........
घ्यावी चावी अन फिरावे शोधत मित्र मंडळी मग घरघर |
जावे शेतावर, झापावर, सहजच मारावा फेरफटका चक्कर |
उरकावी राहिली साहिली अडकली ती कामे पटापट भरभर |
नमावा गावातला गणेश, बिरोबा, खंडोबा अन पार्वती हरहर |
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........
भेटावे कडकडून सारे नवे जुने सहकारी दोस्त मित्रगण |
काय रे,असे तसे, म्हणत भांडत व्हावी सगळ्यांची भणभण |
म्हणावे सॉरी काहींना तर काहींना घालाव्या लाता ही दनदन |
करावा कोपच्या कधी अन ओंगापोंगा, फिरत करीत वणवण |
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........
व्हावा अभ्यास अन वाचन अवांतर बसून तास न तास |
भरवावा लाडाने पिल्लूला प्रेमाने मोजून प्रत्येक तो घास |
भेटावे सवंगडी निवांत चघळत विषय काही तेच ते खास |
बसावे एकटे काही काळ घेत मागोसा कसा सरला हा मास |
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........
धरावे पुस्तक हाती दिसेल ते अन पुरववा वाचनचा तो छंद |
चाळावी डिक्शनरी अन वेबदुनिया अगदी मनसोक्त अनिर्बंध |
खेळावे पत्ते,चंपल पाणी,चीचुके,सापशिडी लुटत मनमुराद आनंद |
गप्पा गोष्टी,कथाकथन तर कधी अंताक्षरी खेळत बसावे स्वानंद |
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........
एकटे बसावे एकट्याने घालवावा एकट्याशी एकटा थोडा वेळ |
बोलावे स्वत:शी स्वत:ने जमेल तसा स्वत:च घालावा मेळ |
करावे मंथन, चिन्तन, मनन, भजन कधी ध्यानधारणा निर्भेळ |
जोडावा, घट्ट करावा निभवावा अचूक बुध्दी भावनेचा खेळ |
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........
व्हावा थोडा आराम ही मग दुपारी जेवून भले झोपावे ढाराढूर |
नको डाएट,उपवास वगैरे खावे प्यावे जोरदार तजेलदार भरपूर |
रंगावे दिवसागणिक ऐसे सांजेला सर्वांना लागावी भलतीच हूरहूर |
वेचावा,द्यावा, वाटावा आनंदची मनोभावे अविश्रांत सर्वदूर |
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment