कोरोना आणि इफेक्ट्स (भाग १ )

कोरोना आणि इफेक्ट्स (भाग १ )

आज २० मार्च २०२० साल. दहा दिवसापूर्वी कोणी विचार केला नव्हता की नाईलाजाने प्रशासनाला तब्बल चार महानगरे अंशत: “लॉकडाऊन ” करावीच लागतील. एक विषाणू किती मोठा परिणाम करू शकतो हे सर्वच पाहत आहेत. बघता बघता रुग्ण वाढत गेले. प्रशासन कधी नाही ते एकदम सजग आहे असे वाटले. स्वत: आरोग्यमंत्री आणि स्वत: मुख्यमंत्री स्वत: आघाडीवर मोर्चा सांभाळताना दिसत आहेत. पत्रकार परिषदा व्यवस्थित पार पडत आहेत. जनमानस एकदम घाबरून जाणार नाही याची काळजी घेत आहेत. अर्थात जबाबदारी हीच असते आणि हेच अपेक्षित देखील आहे.

या सगळ्यात कौतुक करावेसे वाटते ते वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व यंत्रणांचे . डॉक्टर्स आणि यंत्रणा जीवाचे रान करत आहे. स्वत: आयुष्य धोक्यात घालत उपचार करत आहेत. समस्त रुग्णालये कंबर कसून उभी आहेत असे दिसत आहे. प्रशासनाच्या आदेशाने अनेकजण “वर्क फ्रॉम होम ” करत आहेत. शक्य तेवढे बाहेर जाणे टाळत आहेत. सोशल डिसटन्स कमी व्हावा याचा प्रयत्न करत आहेत. माझे अनेक डॉक्टर मित्र (जसे डॉ प्रमोद ठोंबरे )रोज सगळ्या ग्रुपवर मेसेज करून तर काहींना अगदी फोन करून बजावून सांगत आहेत. अगदी विनंती करून सांगताहेत की गर्दी करू नका. गरज नसेल तर बाहेत पडू नका. आम्ही सांगतो म्हणून ८ ते १२ दिवस काळजी घ्या. त्या सर्व मित्रांचे मनापासून आभार. वैद्यकीय सेवा आज अगदी सीमेवरील सैन्यासारखी भासत आहे. या सर्व सेनेला मनापासून धन्यवाद.

*या शुभ्र पटलावर डाग देखील आहेत आणि ते डाग आपली जनता आहे. एखाद्या गंभीर विषयाला कसे समजून न घ्यावे, कसा स्वत:चा अडाणीपणा कसा प्रदर्शित करावा याची जणू स्पर्धाच सुरु होती आणि आहे. सरकारला पोलीस यंत्रणा वापरत जमावबंदी करावी लागते हे अपयश आहे सामाजिकतेचे. अनेक विनवण्या आणि सूचना करून देखील प्रजा मात्र ढीम्मच.*

मान्य आहे की पोटपाणी आहे. अनेकांचे संसार हातावर आहे. कार्यालये सुद्धा बेफिकीर होऊन कर्मचारी वर्गाला वेठीस धरत आहेत. म्हणजे अगदी शाळा, कॉलेज यांना सुट्टी आणि शिक्षक, कर्मचारी कामावर. हे म्हणजे अगदी आम्हा शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचे झाले तर घरगडी शांत बसला असेल तर पूर्वेकडील लाकडं पश्चिमेला टाक म्हणायचं. कारण एकच की आपण त्याला वेतन देत आहोत. अखेर प्रशासन कठोर झाले म्हणून काही शेपट्या सरळ झाल्यात म्हणे नाईलाजाने.

आता काही भोपळे आहेत भ्रमाचे. काही महाभाग तर भाकीत करू लागले की हा आजार भारतीयांचे फार काही करू शकणार नाही. जगात ज्या देशांत कोरोनाने थैमान घातले ते देश आणी आपला देश यात आपण कुठे आहोत? आपली वैद्यकीय यंत्रणा किती रुग्ण आणि किती खाटा उभारू शकते याचे आकडे पाहिले तर गांभीर्य कळेल. कोरोना काही हजारात गेला तर आपली यंत्रणा नांगी टाकेल हे वास्तव स्वीकारावे लागेल. किती किट्स आहेत सध्या आणि किती विलगीकरण कक्ष आहेत हे ही वेगळेच. अर्थात आतापर्यंत वैद्यकीय यंत्रणा १०० पैकी १०० गुण घेऊन तिचे स्थान बळकट करून आहे आणि म्हणून संसर्ग न होऊ देणे हेच गमक आहे हे कळायला हवे.

आता कायद्याने का होईना बडगा आला तर तेच करूयाजे सर्वांनी स्वत:हून करायला हवे होते. घरी थांबूया. काळजी घेऊया. गर्दीत न जाऊन कोरोनावर मात करूया.

चला लढूया , सहकार्य करूया, घरीच थांबुयात आणि कोरोनाला हरवूया.

--- डॉ सचिन शंकर गाडेकर

Comments