संचारबंदी आणि पोलीस आणि आपण २६/३/२०२०

संचारबंदी आणि पोलीस आणि आपण २६/३/२०२०
 
कोरोना विषाणू आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश २१ दिवस लॉकडाऊन झाला आहे. जनता ९० ते ९५ टक्के पूर्णपणे घरात आहे. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी तरीही लोक  बाहेर पडत आहेत. आता जे बाहेर पडले आणि गर्दी केली त्यावरून हे कळते की आपल्या कोणाकडेही आपत्तीव्यवस्थापन नावाचा प्रकारच नाही का? म्हणजे मा. प्रधानमंत्री यांनी जाहीर केल्या केल्या बाहेर पडलेल्या लोकांकडे १० ते २० दिवस पुरेल इतका काहीच साठा नाही? मग कसले हे संसारी? 

रस्त्यावर  मागणारा  सुद्धा अर्धी भाकर फडक्यात बांधून ठेवतो म्हणे. आपण इतके अधीर आणि अस्वस्थ कसे होऊ शकतो? जीवनावश्यक वस्तू आणि तत्सम बाबी सुद्धा मिळणार नाही हे ज्यांच्या डोक्यात आले त्यांनी जरा  बंदी उठली की तपासून घ्यावे. कोणते गणित आहे हे? घोषणा झाली की निघाले बाहेर. ही चाहूल कोणालाच नव्हती असे म्हणाल तर आपल्यासारखे अज्ञानी देखील आपणच. मग कशासाठी ही उठाठेव?

आता पूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन आहे. तरीही काही लोक सेल्फी, मजा, तंबाकू, लग्न, पत्ते खेळणे, लायब्ररी अशी कारणे देत बाहेर पडत आहे. बाहेर कशी संचारबंदी आहे हे पहायला जाण्यात काय थ्रील आहे? का आपण प्रशासनला अडचणीत आणत आहोत? परवा गृहमंत्री यांचा आदेश ऐकला असेलच सर्वांनी. आता अश्या विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलीस प्रसाद देत समज देत आहेत. त्यात आपण सर्व घरात आहोत आणि पोलीस मात्र चौकाचौकात आहेत. दिवसरात्र उभे आहेत. आपण आपल्या घरात आहोत आणि ते रस्त्यावर. नोकरी जिवापेक्षा मोठी आहे का हो? पण ते उभे आहेतच ना? मला तर कुटुंबाचे अनेक फोन आले की काळजी घ्या, बाहेर जाऊ नका. त्या पोलिसाला नाही का कुटुंब? त्याची पत्नी, आई, मुलगा/मुलगी, वडील काय म्हणत असतील? 

हे लिहिण्याचे कारण काही अतिसंवेदनशील आणि मानव अधिकारप्रेमी कालपासून फेसबुकवर लिहीताहेत की पोलिसांना विंनंती आहे की मारू नका, फक्त समज द्या. हे अमानवी आहे वगैरे वगैरे. कोण आहेत हे मानवी समूहाचे दयारुपी मूर्खलोक? अरे, निवांत घरात बसून, पोटभर खावून, पंख्याखाली बसून, पाऊस झाला आणि भजी सोबत चहा ढोसत हा उपदेश कोणी करायला सांगितला? हे सगळे पोलीसलोक केवढ्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही दबावाखाली असतील ते.

 सण आले की आपण सुट्टीवर आणि हे मामालोक बंदोबस्तावर. पोलिसांकडे बोट दाखवणाऱ्या महान निर्बुद्धानी जरा चौकात जाऊन १२ ते १८ तास ड्युटी करून दाखवाना. गणपती असो, ईद असो, नाताळ असो वा असा कोरोनाचा कहर असो त्यांना सुट्टी नसते. कोणाला शुगर आहे तर कोणाला बिपी देखील. पण ते उभे आहेत आजही. आपल्यापैकी अनेकांना वर्क फ्रॉम होम आहे ना. त्याने काय करायचे? त्यांनी एक दिवस जरी वर्क फ्रॉम होम केले ना तर पळता भुई थोडी होईल आपल्याला. म्हणून विनाकारण अकलेचे तारे तोडू नयेत कोणीही. पोलीस यंत्रणा यांना अश्या बिकट आणि भयंकर काळात नैतिक आधार द्यायचा सोडून उलट उपदेश? वाह, रे संवेदनशीलता. 

मी आणि सर्वच लोक या संचारबंदीत घरीच आहोत. पोलिसमामा तुम्ही सर्व काळजी घ्या आणि जो नियम मोडेल त्याल धडा शिकवाच. या वाचाळ आणि मंद लोकांच मनावर घेऊ नका. ही अशी लोक कीडच आहे समाजाला. तुम्ही लढत रहा. आम्ही देखील आदेशानुसार आमची जबाबदारी नक्की पार पाडू. 

आम्ही आपल्या सोबत आहोत. 

--- डॉ सचिन शंकर गाडेकर



Comments

Post a Comment