हेल्लारो (२०१९ राष्ट्रीय पुरस्कार विजेता गुजराती चित्रपट ) भाग १

हेल्लारो (२०१९ राष्ट्रीय पुरस्कार विजेता गुजराती चित्रपट ) भाग १

(परवा याची MX Player वर या चित्रपटाची असलेली लिंक अजिंक्य कुलकर्णी यांनी पाठवली म्हटल्यावर चित्रपट लगेच पाहिला आणि त्यानंतर दुसरा आदेश की आता रिव्ह्यू पण लिहा. मग काय अजून काय पाहिजे. )

२०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आहे हा . हा चित्रपट खास कारण त्यात एक संवेदनशील विषय इतका व्यवस्थित हाताळला आहे की चित्रपटप्रेमी आवर्जून दाद देतील. गंभीर विषय मांडतांना कधी कधी अतिशय टोकाचे संवाद किंवा बिभत्सता आपसूक घुसवली जाते परंतु इथे दिग्दर्शकाला १०० पैकी १०० गुण कारण स्त्री, तिचं अस्तित्व आणि आणि आजच्या भाषेत फेमिनिझम अश्या नाजूक आणि तितक्याच आक्रमक विषयावर चित्रपट असूनही कुठेही गाडी रुळावरून घसरत नाही. कुठल्याही समाजाला किंवा समूहाला लक्ष्य करत नाही. एखादा समाज ७० -८० च्या दशकात किंवा आज असा असेलही पण त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं आहे, मर्मावर नाही. चित्रपट स्त्री विरुध्द पुरुष असा समजावा किंवा घुसमटलेली स्त्री आणि तिच्या आतली मुक्त भावना, इच्छा यांचा हे पाहिल्यावर नक्की कळेल. प्रादेशिक चित्रपट मग श्वास असो किंवा हेलारो.. इथल्या मातीशी पक्का इमान त्यांचा आणि म्हणून की काय थेट सुवर्णकमळ मिळते.  सांगायला हरकत नाही की ६ कोटी खर्च करून तयार झालेला हा सिनेमा १६ कोटी व्यवसाय करून गेला.

बरं चित्रपटात कच्छ असे सुंदर चित्रित केले आहे की बस्स. अगदी  पहिल्याच काही मिनिटात चित्रपटाचे आशय घट्ट केलेत त्यांनी. एक वस्ती आहे आणि सर्व पुरुष एकत्र येऊन संध्याकाळी तिथे असलेल्या देवीची मनधरणी करणार आहे गरबा खेळून. पाऊस पडावा यासाठी हा सगळं खटाटोप. वडील तयार होऊन बाहेर निघताच एक चिमुरडी विचारते आणि बाप तिच्या आईला खडसावतो की इथं मुलींनी प्रश्न विचारायचे नसतात. शिकवून ठेव तिला. इथं मुली किंवा स्त्रिया गरबा करत नाहीत.  (इथेच प्रश्न घोंगावायला सुरुवात होते की अरे पण का? )मुखियाच्या हस्ते आरती होते आणि एकच मागणी की पाऊस पडू दे. नवरात्र आली तरी थेंब नाही. मग सगळे पुरुष मस्त फेर धरत देवीला आळवत आहेत आणी घरच्या देव्या मात्र छोट्या झरोक्यातून देवीचा उत्सव पाहत आहे. तेवढ्यात ती चिमुरडी आईला विचारते की आई, आपण गरबा का नाही खेळू शकत? तुझी इच्छा नाही होत का ग? आई निरुत्तर आहे आणि विषय अजून गंभीर आणि खोल आहे हे कळून जाते.

सकाळ होते आणि मग त्यांचा पाचवीला पुजलेला संघर्ष पाण्यासाठी. पायपीट करत, कळशी आणि हंडे घेऊन सगळी महिला ब्रिगेड वस्तीपासून दूर पानावठ्याकडे निघतात. इकडे चावडीवर सगळे पुरुष ही चर्चा की एक विधवा आहे आणि तिला ही पाण्याला पाठवायला हवं पण इतरांना सूचना द्या की तिच्याशी कोणी बोलू नका आणि तिच्यावर लक्ष ठेवा. (हे असे का याचा उलगडा नंतर होतो.) वर्षापेक्षा अधिक काळ ती विधवा वस्तीबाहेर देखील गेली नाही पण पाणी जास्त मोठी समस्या आहे म्हणून तिला जाऊ द्या असा ठराव होतो. लग्न होईपर्यंत तिला बाहेर जाऊ देऊ नका म्हणजे विघ्न येणार नाही अशी पुस्तीही जोडली जाते. 

तिथेच वस्तीतील एक तरूण सैन्यात आहे आणि त्याचे लग्न ठरले अशी चर्चा होते. पुढच्या प्रसंगात लग्न आणि त्या जोडप्याचा पहिल्या रात्रीचा पहिला संवाद हा असा . तो म्हणतो, “शिकलेली आहेस का? आणि किती?” मग ती उत्तर देते, “अमुक एक वर्ग” त्यवर त्याचे उत्तर असे, “मी ऐकलं आहे की शिकलेल्या पोरींना एक तर शिंग फुटतात किंवा पंख, तर मला सांग तुला काय फुटलेत? आणि काही फुटलं असेल तर स्वत:च कापून टाक. मी कापले तर जास्त त्रास होईल.” (पहिली रात्र, पतीशी पहिला संवाद आणी हे असे संवाद छिन्नविछिन्न करतात )

सकाळ होते आणि परत सर्व स्त्रिया पानावठ्याकडे निघतात. सर्व स्त्रिया चर्चा आणि मोठ्याने गप्पा मारत आहेत कारण त्यातली एक म्हणते हीच एवढी वेळ की जिथे मनभरून बोलता येतं, स्त्रिया बोलू शकतात, जागून घेण्याची हीच काय ती वेळ.  एक स्त्री नवीन वधू मंजिरीला विचारते की तू गावाची की शहराची? तर उत्तर ऐकू येते, “इथे स्त्री फक्त पुरुषाची आहे, न गावची ना शहराची. त्यात आज पहिल्यांदा वस्तीच्या बाहेर पडलेली विधवा मात्र शांत झालीय कारण तब्बल अनेक महिन्यांनी तिने बाहेर श्वास घेतला आहे. मंजिरी तिच्याशी बोलायला जाते तर त्या मधील एक म्हणते,”इथले नियम आहेत काही” मग मंजिरी म्हणते, “हो ना, नियम ही त्यांचे आणि खेळ ही त्यांचे, त्याचा भाग मी बनणार नाही, त्यांचा भोग बनलोय न तेवढं बस्स झालं. ” (संपूर्ण चित्रपटात मंजिरीच्या पात्राचे संवाद अगदी अप्रतीम लिहिले आहे)

पाणी भरून महिला परततात. वस्तीत एक गर्भवती महिला आहे आणि ९ वा महिना असल्याने तिला  पाणी इतर महिला आणून देतात. त्यात मंजिरी तिला मदत करते आणि तीच्याशी बोलते. तिला विचारते की बाळ लात मारते का? ती महिला म्हणते की मारते कधीकधी. मंजिरी हळुवार हात ठेवते आणि आतून बाळ लात मारते. “बघ तुझ्या मनातलं ओळखलं आणि बाळाने चक्क पोटात लात मारली. मंजिरी म्हणते,”माझ्या मनातलं ओळखलं ना, मग नक्की ती मुलगीच असणार.”  

मंजिरी दुपारच्या वेळी भरतकाम हातात घेते तर तिची सासू हे टाकून देते आणि म्हणते की इथे हे करत नाही, करायचं नाही. मंजिरीचा प्रश्न आहेच की का? मग म्हातारी सांगते की एक विधवा होती वस्तीत, ती भरतकाम करत असे, गावाकडून येणाऱ्या एका तरुणाला ते देत पैसे जमवत असे. आपल्या समाजात स्त्रीने पैसा कमवला तर ती बाजारात उभी राहिली अशी समज आहे.  मग एकदाच बिंग फुटलं आणि ते दोघे पळून गेले. तेंव्हा पासून जो पाऊस गेला तो गेलाच. देवीमातेचा कोप  झाला. त्यांना खूप शोधलं आणि एकदाचं शोधून दोघांना जीवे ठार मारलं. हे ऐकून मंजिरी विचारते, “मग त्यांना ठार मारल्यावर लगेचच धो धो पाऊस पडला असेल न?” इथे मात्र म्हातारी निरुत्तर होते आणि आपणही.

त्या दिवशी गरबा खेळण्यासाठी पुरुष बाहेर निघतात. तो सैनिक मंजिरीला सांगतो की इथं स्त्रिया गरबा खेळत नाही. तिच्या डोळ्यातील प्रश्नांना तो उत्तर देतो तिचा संभोग घेऊन आणि मग बाहेर जातो देविमातेच्या गरब्यासाठी. किती विरोधाभासी चित्र की बाहेर मातेची भक्ती आणि घरातील स्त्रीच्या डोळ्यात फक्त पाणी. आधी एकीच मर्दन आणि नंतर दुसरीचं दर्शन. मग पारंपारिक गरबा सुरु होतो. मंजिरीच्या डोळ्यातलं पाणी मात्र थांबत नाही.

क्रमश:

 

डॉ. सचिन शंकर गाडेकर





Comments