हेल्लारो (२०१९ राष्ट्रीय पुरस्कार विजेता गुजराती चित्रपट ) भाग २

हेल्लारो  (२०१९ राष्ट्रीय पुरस्कार विजेता गुजराती चित्रपट ) भाग २

हेलारोच्या कहाणीत एक नवीन आणि खास  दिवस उजाडतो. स्त्रिया परत पाणवठ्याकडे निघाल्यात आणि नेहमीप्रमाणे  गप्पा आणि खदखद सुरु आहे. त्यातला एक संवाद तर असा की हे बऱ आहे की पाऊस पडावा म्हणून त्यांना (पुरुष) गरबा आणि आम्हा स्त्रियांना उपवास? तर त्यातली एक म्हणते की मी तर काल मोडला उपवास, काय मेला वगैरे नाही माझा धनी. या सगळ्यात त्यांना त्या पाणवठ्याजवळ कोणीतरी इसम/ वाटसरू बेशुद्ध पडलेला दिसतो. त्याला पाणी पाजावे की नाही यावर विधवा म्हणते की मी सुवासिन असते तर नक्की त्याला पाणी पाजले असते. मी आज जर पाणी पाजले तर माझ्या चारित्र्यावर लगेच शिंतोडे उडवतील सारे. हे ऐकून भूज शहरात वाढलेली मंजिरी पुढे होते आणि कळशीतून त्याला पाणी पाजते. तो शुद्धीवर येतो आणि आभार मानतो. तो तिथून निघू लागतो तर त्याच्याकडे असलेला ढोल पाहून मंजिरी विचारते की ढोल तुमचा आहे? मग वाजवणार का? तो वाटसरू म्हणतो “तुम्ही माझा जीव वाचवला मी ढोल का नाही वाजवणार तुमच्यासाठी?”

तो वाटसरू पलीकडे तोंड करून ढोल बडवू लागतो, एक नाद उभा राहतो आणि मंजिरीच्या हातातली कळशी खाली पडते आपोआप आणि पाय थिरकू लागतात. ती बेभान होऊन गिरक्या घेऊ लागते आणि गरब्याचा फेर सुरु होतो. एक एक करत सगळ्या हंडे उतरवतात आणि मग घाबरत घाबरत गरबा सुरु होतो. जे उभं आयुष्य करता आले नाही त्या पुरुषप्रधान वस्तीत ते आज चक्क शक्य झालं होतं त्यांना आणि मग काय... सगळ्या बेभान होऊन जगून घेतात, गरबा करतात आणि काही क्षण जिवंत असल्याचा अनुभव घेतात.  चित्रपटातील वाग्यो रे ढोल हे गाणं खास आहे. त्यातील शब्द सांगतात की माझ्या मनातील वाळवंटात जणू हा ढोल वाजतो आहे. जणू पिंजऱ्यात कैद झालेलं मन मुक्त झालं. या छोट्याश्या आनंदाने देखील दमायला झालंय की काय . थोड्याश्या या स्वप्नासाठी मी रात्रभर झोपली देखील नाही आणि माझ्या नशिबावर काळी तीट लावली की कुणाची याला नजर लागू नये.  अगदी भारी शब्दरचना आणि त्या स्त्रियांच्या मनातील खदखद जणू शब्दांकित केली आहे असे वाटते. घरी जाऊन मात्र जमेल तसे पापक्षालन करतात कारण पगडा एवढा मोठा आहे की मनोमन पाप केल्याची भावना आणी आता अनिष्ट होणार, देवी कोपणार अशी भावना उभी राहते.

दुसऱ्या दिवशी पाय जास्त लगबगीनं निघतात त्या पाणवठ्याकडे. काल गरबा खेळलो तरी गावात काही अघटीत घडले नाही, भूकंप आला नाही. म्हणजेच कोप झालेला नाही. आणि अशी मनाची समजूत काढून गरबा सुरु होतो. त्या गरब्याच्या प्रसंगात त्या सर्व स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य, एक वेगळाच आनंद, एक खास उल्हास आणि जीवन जगतोय अशी छटा चित्रित केली आहे. तिथे अगदी अचूकपणे वाजणारं गाणं “ वाग्यो रे ढोल” खास आहे.   एक एक शब्द हेच सुचवतो की जीवन, जगणं काय आहे त्या महिलांसाठी.

चार दिवसांनी सैनिक नोकरीसाठी परत निघाला आहे आणी अतिशय शुष्क अशी भाषा आणि निरोप त्रासदायी, वेदनादायी  आहे प्रेक्षकांसाठी. त्याच रात्री वस्तीतील गर्भवतीची प्रसूती होते. म्हातारी बाहेर येऊन सांगते की मुलगी होती, बाळ जन्मलं तेव्हाच मृत होतं. दुसऱ्या सकाळी ढोलवाला तयार असतो पण कोणीही गरबा करत नाही. मनात एक शल्य आहे सर्वांच्या की आपल्या पापामुळे त्या मुलीचा जीव गेला. अजून किती पापं डोक्यावर घ्यायची? ती वस्तीची देवी पाहत आहे. ती कोपली असणार. ही शहराची देवी नव्हे. मंजिरी उत्तर देते की ही अशी शहराची आणि गावची देवी का वेगळी असते? आणि आपल्या पापाची शिक्षा त्या अर्भकाला देवी का देईल?   इतर स्त्रिया नेहमीप्रमाणे निरुत्तर. सगळ्या त्या मातेच्या सांत्वनाला जातात.तिथे मंजिरी हे सांगते की यांना असे वाटते वगैरे. ती माता सांगते शिक्षा तुमच्या पापाची नाहीतर माझ्या नवऱ्याच्या पापाची आहे. काल त्याने मला धक्का मारला आणि हे असं झालं. जर देविमातेने असे पाप केल्यावर लगेच शिक्षा सुरु केली असती तर हे सगळे जगले असते का?  मी सुद्धा थोडं बरं वाटलं की येते पाण्याला, तेवढाच गरबा पाहून, खेळून मन रमवेन. त्या दिवशी अगदी सुरवातीला दाखवलेली मुलीला तिची आई पाणवठ्याकडे घेऊन जाते. तिला म्हणते की आता तू गरबा करण्यासाठी तरसणार नाहीस. (एका आईला आपल्या लेकराची इच्छा पूर्ण करायची आहे मग त्यासाठी रूढी मोडायची तिची तयारी आहे )

सगळ्या पाणवठ्यावर जोरदार गरबा करतात. ती चिमुरडी तर हरखून जाते. गरबा करते. तेवढ्यात वस्तीवरील एक तरूण त्यांना पाहतो. सर्व घाबरतात. ढोलवाला तर सामान गोळा करतो व निघतो. तो म्हणतो की जर हो बातमी वस्तीवर गेली तर तुम्हाला मारून टाकतील हे लोक माझ्यामुळे. मंजिरी म्हणते, “तसेही कुठं जिवंत आहोत?तुमच्या ढोलाच्या तालावर गरबा करत थिरकतो तेवढंच जीवन हो, तेवढंच काय ते जगायला शिकलो, बाकी तर मेलेलोच आहोत आम्ही. मरण्याआधी एकदा हसून घेऊ, जगून घेऊन.”  मग तर त्या सर्व त्याला निवारा म्हणून ओढणी देतात तर कोणी लपवून भाकरी देतात. त्या रात्री खूप वादळ आणि सोसाट्याचा वारा येतो पण पाऊस काही पडत नाही.

दुसऱ्या दिवशी तर त्या पाणवठ्यावर तो ढोलवाला तिथे नसतो. तो निघून जात असतो, त्याला जीवाचा आकांत करून त्या शोधतात. इथे अजून एक छोटी कहाणी पेरलीय ती त्याची आणि त्याच्या कुटुंबाची. अश्याच एक वस्तीवर होळी व इतर सणा निम्मित ढोल वाजवून गुजराण करत असणारे हे कुटुंब. होळी पेटवल्यावर त्याच्या कन्येला म्हणजेच रेवाला गरबा खेळवासा वाटतो. आपण असं नाही करू शकत हे जाणून देखील लेकराच्या हट्टासाठी हळूहळू तो ढोल वाजवतो, पाहता पाहता आई देखील गरबा करू लागते. त्यांना गावातील एक तरून पाहतो आणि खालच्या जातीतील स्त्रियांनी गरबा करत होळीचा अपमान केला म्हणून त्यांच्या झोपडीला आग लावतात. त्यात रेवा आणि आई मंगळा दोघीही जळून खाक होतात.  सगळ्या सुन्न होतात तिथे. त्यात तू आमच्या वस्तीवरच का येत नाहीस? तिथे एक झोपडी रिकामी आहे, तू नवरात्र सुरु आहे म्हणून ढोल वाजव. तुला खायला ही देतील आणि राहायला ही मिळेल. आम्ही तो ढोल ऐकून किमान तनाने नाही तर किमान मनाने तरी नाचू.  वस्तीवर  गेल्यावर मंजिरीची सासू तिला पत्र दाखवते की तिचा पती सुट्टीवर येत आहे, त्याची रजा मंजूर झाली आहे. मंजिरीच्या चेहऱ्यावर मात्र तसूभरही आनंद किंवा ख़ुशी झळकत नाही. पती घरी येतोय आणि त्याच्या येण्याची उत्सुकता आणि ओढ असं काहीच तिच्या चेहऱ्यावर नाही आणि हे आकलनीय आहे.

 क्रमश:

डॉ. सचिन शंकर गाडेकर





Comments