हेल्लारो (२०१९ राष्ट्रीय पुरस्कार विजेता गुजराती चित्रपट ) भाग ३

हेल्लारो (२०१९ राष्ट्रीय पुरस्कार विजेता गुजराती चित्रपट ) भाग ३

गावकरी एका  तांत्रिक मांत्रिकाला जो झादफुक करतो त्याला घेऊन बसले आहेत आणि तो देविमातेला चक्क बोलावणार आहे अशी समज आहे. सर्व महिलांना एकच भीती की जर देवीमाता एखाद्या माणसात आली आणि आपलं पितळ उघडं पडलं तर? मंजिरी या प्रश्नास उत्तर देते, “देवी येत नसते, ती असते.”  मग एका तरुणाच्या अंगात देवी येते. मुखिया विचारतात की देविमाते वस्तीतील बाईमाणसांकडून काही पाप झाले का? (हा प्रश्नच पहा ना!!)

दुसऱ्या दिवशी तो ढोल वाजवणारा वाटसरू वस्तीवर दाखल होतो. ढोल वाजवत मन जिंकतो व मुखिया त्याला जेवण आणि आसरा देतो. रात्री ढोल आणि पुरुषमंडळी त्यावर गरबा करतात. पाणवठ्यावर जगणाऱ्या आता त्या झोपडीतही जगू लागल्या आहेत जणू. इथे दोन वेगळ्या विश्वाचं दर्शन घडतं. महिला आत दार लावून गरबा करू लागतात कारण ढोल आणि  त्याचा आवाज त्यांना कसा थांबवणार? त्या दिवसापासून त्या हसू लागल्या आहेत, स्वत:ला आरशात पाहून लाजू लागल्या आहेत, काही ते पुन्हा शृंगार करू लागल्या आहेत. देवीमातेचे आभार मानू लागल्या आहेत.

सकाळी लगबगीनं सगळ्या निघतात पाणवठ्याकडे. त्यातील एक स्त्रीकडे एक निरोप येतो  म्हणून ती आज पाण्याला येणार नाही अशी चर्चा ऐकू येते. तिथे पाणवठ्यावर ढोलवाला  ढोल घेऊन उभा आहे  तो सांगतो की तुम्ही मला जीवनदान दिलंत म्हणून इथं ढोल वाजणार तो ही रोज. रात्री वस्तीवर तर सकाळी तिथे ढोल वाजवणार आहे. सगळ्या गरबा करत रमून जातात. तिकडे निरोप आहे कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूचा. ती वस्तीवर थांबलेली स्त्री मात्र कोसळते. तीला असंच वाटतं की तिच्या पापामुळे (गेले अनेक दिवस या महिला गरबा खेळत आहे म्हणून )आईबाप वीज पडून मेले. ती वस्तीवर कबूलनामा देते कारण तिला वाटते की अजून फार वाईट होणार आहे. ती लगबग करत निघून जाते अंत्यविधीसाठी.

वस्तीवर ही बातमी  कळताच सगळे गोळा होतात. तिकडून लागलीच सुट्टीला आलेला सैनिक ही येतो. सगळे संतापाने लालबुंद होतात. ज्या आवेशाने ते पाणवठ्याकडे निघतात ते पाहून भूकंप किंवा सुनामी येणार आहे याची चाहूल प्रेक्षकांना लागतेच.  गरबा करण्यात दंग महिलांना शुद्ध येते मोठं जमाव पाहून. त्या ढोलवाल्याला तर बेदम मारहाण होते. त्याला ओढत वस्तीवर आणतात. याचे हातपाय कापा वगैरे वल्गना होतात. मुखिया म्हणतो की आज नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणून रात्री पूजा करून याचा बळी देऊ म्हणजे पाप मिटेल. त्याला खांबाला बांधले जाते आणि प्रत्येक झोपडीतून फक्त आणि फक्त ऐकू येतात त्या किंकाळ्या ,आवाज येतो लाथाबुक्क्यांचा, त्या सर्वाना बेदम मारहाण केल्याचा, वेदनेने विव्हळत आरडाओरडा केल्याचा. मारहाणीनंतर प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर क्लोजअप नेलाय आणि चेहऱ्यावर फक्त राग, उठावाची झलक आणि बंडाचे निशाण झळकत आहे.

रात्री बळी देण्याची वेळ येते आणि त्याला मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारतात. तो म्हणतो फाटेपर्यंत ढोल वाजवू द्या ढोल फाटला की मला ही फाडून टाका. मारून टाका. गळ्यात ढोल टांगून मग ढोल वाजवू लागतो. आवाज ऐकताच मंजिरी बाहेर पडते. तीच पैजणांचा आवाज हा आवाज आहे बंडाचा आणि उठावाचा. तिला पाहताच तिचा सैनिक नवरा तिला आत हो म्हणतो. मंजिरी निर्भीड होऊन पुढे पाऊल टाकते तर आकाशातून पाण्याचा थेंब टपकतो. जलधारा वर्षू लागतात. पाऊस सुरु होतो. नवरा अंगावर धावून जाणार इतक्यात मुखिया त्याला थांबवतो आणि म्हणतो आज देवी प्रसन्न झाली आहे तिच्या रुपानं. मंजिरी ठेका धरत गरबा करू लागते. एक एक दार उघडत एक एक स्त्री बाहेर येते. त्यांनी जणूकाही सगळे पाश, सगळी बंधने, सगळे रूढी आणि रीतीचे साखळदंड तोडून टाकले आहेत , सगळी दिखाऊ परंपरा झुगारून दिली आहे असे हावभाव दिसू लागतात. त्यांना कोणालाच नवऱ्याचे काय मरणाचे देखील भय उरले नाही अशी देहबोली दिसू लागते. पाऊस जोरदार सुरु आहे आणी त्या सर्व फेर, धरून ठेका गरबा करत आहेत. ढोलवाला म्हणतो देवी कोणाच्या ना कोणाच्या रूपाने नक्की येते. ती मुक्ती देते जाचातून. त्याचा इशारा मंजीरीकडे असावा किंवा बाहेरगावी अंत्यविधीला जाणऱ्या स्त्रीकडे बहुतेक.

इथे पाऊस आणि गरबा या वळणावर चित्रपट संपवून अद्भुत कमाल केली आहे दिग्दर्शकाने. त्याने हाच शेवट दाखवून स्तब्ध केले आहे सर्वांना. काय पाहिजे आहे देविमातेला? तिथले पुरुष हा पाऊस शुभसंकेत म्हणून स्वीकारणार का? घरातील स्त्रियांचे हे बंड आणि युगायुगाची मानसिकता यांचे काय होणार असे एक नाही हजार प्रश्न मनात उभे ठाकले हेच यश आहे चित्रपटाचे असे म्हणावे लागेल. खूप काही आहे अजून चित्रपटात. नक्की पहा एकदा. राष्ट्रीय पुरस्कार का मिळाला असेल  याचा प्रत्यय नक्की येईल.

---डॉ सचिन शंकर गाडेकर





Comments