हर कुत्ते के दिन आते है... १/७/१६ हर कुत्ते के दिन आते है... होय, खरीच

हर कुत्ते के दिन आते है...    १/७/१६
हर कुत्ते के दिन आते है... होय, खरीच आहे ही म्हण...स्वत:चे अस्तित्व टिकवणे हे स्वत:च्या मनगटातील बळावर हवे. स्वत:च्या मनोबळावर हवे. स्वत:च्या कौशल्यावर हवे. स्वत:च्या अपरिमित कष्टाने हवे. कुणीतरी ओढून ठेवलेल्या रेघा ओढत अन त्यावर कपटाने स्वतःचे नाव कोरत चालणारे मनसुबे किती हलक्या वृत्तीचे आहेत. जंगलातील अलिखित नियम जर हा लिखापडी केलेला सुशिक्षित अडाणी पालन करत असेल तर कोण प्रिमीटीव आहे हे ही पहावं लागेल. मी, माझे, मलाच, माझ्यामुळेच, माझ्यासाठीच, माझ्याभोवतीच, या ‘ग’ मुळे गरजणारा सिंह सुद्धा चार पावले टाकले की सिंहावलोकन तरी करतो. किमान हे तरी शिकावं या माणसानं ...

मान्य आहे की स्वतःचे अधिराज्य गाजवण्याची महत्त्वाकांक्षा तर जंगलातील हिंस्त्र अन भेकड जनावारातही असतेच. त्याला तुमची नैसर्गिक भावना म्हणता येईल. मग जर त्या जंगली, अपाळीव, रानटी जनावर अन तुमच्या मध्ये काहीच वेगळेपण नसेल तर त्या डार्विन साहेबाचा सिंद्धांत तरी खोडून काढा. त्याला परत   सांगा की उत्क्रांती झाली ती कशी मग? अरे मारलेले सावज सुध्दा ते चार पाच जनावर वाटून खातात म्हणे. एकमेकासोबत मजबूत अन दंडम शत्रूची शिकार करतात. अशक्य ते शक्य करून दाखवतात. सहजीवन अन सहमती  काय असते त्या अशिक्षित, अपठीत, असंस्कृत प्राण्यांना कळते मग या कागदाच्या इमारती अन त्यावर मनोरे बांधणारे इतके कुत्सित, संकुचित अन इतके अप्पलपोटे कसे?  का इतका माझेपणा घुसतो अन डोईजड होऊन बसतो?
बरं उल्टा विचार केला तर वाटते का अपेक्षा नसावी या सुशिक्षीत मठ्ठ लोकांकडून? का नेहमी इतरांना चिरडत जाणेच पुरस्कृत ही केले जाते? त्या चीन मध्ये म्हणे एकदा मुलांवर बुलडोझर चालवून आंदोलन हाणून पाडले होते. काय हवे आहे ते ठरवायला हवे. का अभेद्य मारा करणाऱ्या तोफा मात्र सडत ठेवून स्वतःलाच आत्मसंरक्षण मागणारे लीडर असणारे देश कसे देशोधडीला लागणार नाहीत? का विरोधातून अन तिरस्कारातूनच क्रांती घडवली जाणार? का सोबत असणाऱ्या जीवजंतूंना कपटाने मागे टाकत पुढे सरकणे रुजवले जाते?
आता अन्याय झाला तर आंदोलन हेच काय ते अस्त्र उचला अन वाचा फोडा? अरे लाडक्या मित्राला पैसे हवेत हे सुद्धा ज्यांना न सांगता कळावे असे विश्व असावे असे महानुभाव सांगतात म्हणे. मग त्यात घात, प्रतिघात, प्रतिवार जर होत राहिले तर उफाळून येणारा विदारक, स्फोटक अन विनाशक ज्वालामुखी मग आ वासून पाहत बसणे अन पळ काढणे एवढेच काय ते उरेल नशिबात.
होईल सारे गाणे... दगड फेकायची नाही हेच खरे....वेळ येते अन न सांगता येते. सर्वांची येते अन नक्की येते. म्हणतात ना ... हर कुत्ते के दिन आते है..
                       
                                         --सचिन गाडेकर

Comments