सांग सांग भोलानाथ..
सांग सांग भोलानाथ....६/७/१६
चोहीकडे रिमझिम बरसू लागलीय. जो तो या सुखद, हलक्या सरी अंगावर घेत त्या अश्याच सुरु रहाव्यात अशीच मंषा व्यक्त करीत आहे. कोरडासा गेलेला जून महिना किती तीव्र होता हे सांगायला नको. त्या वेधशाळेवर तर विश्वास ठेवावा की नाही असं झालंय. जुन्या काळी तो दारी येणारा भोलानाथ गुबूगुबू करत सर्वांना आनंद द्यायचा. त्या भाबड्या श्रद्धेला किनार होती निखळ विश्वासाची. पाऊस तर एक निमित्तच होतं सर्वांना.खरीप पिकं झाली की शेतजमीन मस्त नांगरून त्या जळजळत्या सूर्यनारायाणाकडे सोपवून तो निवांत व्हायचा. उन्हाळी पिकं, थोडासा भाजीपाला, तूर-मूग यांचे किनारे हे अपवादच. उन्हाळ्यातच होणारे लग्नसोहळे अन गावजत्रा याचे प्रक्टिकल उदाहरण.
घरासमोर असणारे लक्ष्मीधन तर घरची शोभा होती. सकाळी उठल्यानंतर पहिला विचार असायचा तो त्या पशुधनाचा. त्यांचे चारा पाणी, शेण-कूट, आवरासावर सगळं कसं रोजचे नित्याचे. स्वतः चहाचा घोट घेण्याअगोदर त्या मुक्या जीवांना शांत करणे जणू धर्मच होता रोजचा. ते सकाळचे प्रसन्न हंबरणे अजूनही कानात ताजेतवाने आहे. त्यांचे हंबरणे हे सुद्धा वेगवेगळे असते हे सांगायलाच नको. म्हणजे अगदी भुकेले असताना, मालक आसपास नसताना, आपण चारा सायकल वर आणत असताना, तहानलेल्या अवस्थेत आणि दुध काढण्यापूर्वी वासरू सोडतांना झालेली घालमेल या अश्या अनेक प्रकारचे आवाज नेहमीचे झाले होते.
सुट्टी असली की त्या पशुधनाला विशेष प्रेम मिळायचं. मस्त शाही स्नान तर झकासच...त्या लक्ष्मीच्या अंगावर असणारे गोचीड तर शत्रूच वाटायचे. ते औषध लावून, काथ्याने बारीक लक्ष देऊन घासणे फार महत्त्वाचे असायचे. नकळत त्या तो शाहीस्नान आवडले आहे असे भासवत असत. ती होणारी हालचाल, अगदी शांत उभे राहणे, कसलाही दंगा न करणे ई. बोलकी लक्षणे असायची. त्यांना कुरवाळणे तर खूप मजेशीर. शेतकरी अन त्यांचे वेगळे कनेक्शन असते. इतरांना जवळपासही न फिरकू देणारे मालक आला की मान हलवत, डुलत, लाडात येत होणारे हावभाव अवर्णनीय आंनद देऊन जायचं. तो त्यांना सोडायला गेला तर किती आंनद, किती नाटकं ...अहाहा ....
अनेकदा असं वाटून जायचं की त्या माऊलीच्या पोटच्या गोळ्याचा घास आपण हिरावून घेतोय पण ती कधीही ढूसना(शिंगाने मारणे) मारत नाही. वासरू फक्त पान्हा फुटेपर्यंत अन बाकी सगळा प्रपंच असतो. तिला त्या बाळासाठी झालेला प्रेमस्राव आपलाच आहे हे हक्क सांगणारा माणूस मात्र स्वतःचे काहीही इतरांना मिळू देत नाही हे विशेष. असो, तो एक व्यवसाय असला तरी त्याला असणारी भावनेची किनार टिकून होती. आजकाल यांत्रिक झालेला दुध व्यवसाय अन त्याची व्यावहारीकता यावर न बोललेलंच बर. जमाना बदल रहा है असं म्हणूयात पण ते अगदी विचारपूर्वक.
आता पर्जन्य सुरु झालाय. सुरु केलेल्या चारा छावण्या बंद होताय,सगळे परत फिरताय आपल्या घराकडे. त्या गुरांसाठी तिथे छावणीतच ठाण मांडलेले ते शेतकरी खरच महान आहेत. त्यात जिव्हाळा, काळजी, बांधिलकी अन अल्पसा व्यवहार आहे. त्या सर्वांवर परत यायची वेळ न यावी ही माफक अपेक्षा. सगळ्या घरासमोर परत ते लक्ष्मी फुलो, वाढो...सगळे पशुधन परत तसेच घरासमोर नांदावे...इडा पिडा जावो...बळीराजाचेच राज्य येवो.
--सचिन गाडेकर
Comments
Post a Comment