निर्भया,कोपर्डी अन मानसिकता

निर्भया,कोपर्डी अन मानसिकता ! २६/७/१६

ऐतिहासिक अन राजकीय घडामोडींसाठी ख्यात असलेले नगर आता संपूर्ण देशाच्या रडारवर आले त्या एका निष्पाप चिमुकलीच्या घटनेमुळे. आज तोवर बहुतांश सगळे नेते मंडळी अन अनेक स्वयंसेवी संस्था भेटून गेल्या म्हणे. एका निष्पाप जीवावर अत्याचार झाला अन मग प्रसाशन जागे होते. हवेत विरणाऱ्या घोषणा पुन्हा एकदा ऐकू येऊ लागल्यात. अमुक रद्द करा, तमुक रद्द करा, अमुक कायदा करा, तमुक कारवाई करा म्हणत सभागृह दणाणून सोडणारे तेवढेच सोयीचं राजकारण करताहेत हे ही नक्की. सगळे प्रशासन वेगाने कामाला लागले ते एका निरपराध बळी नंतरच. गावात तर म्हणे जत्रा भरलीय म्हणे. कशारीतीने हा देश, प्रशासन, सरकार, जनमानस काम करते याचे दर्शन. एस.टी. महामंडळ लगेच या गावातून बस सेवा तातडीने सुरु करते हे कोडेच आहे. अरे असे हजार बाराशे कोपर्डी आहेत जिथे अजूनही बस सेवा नाही. आमच्या चिमुकल्या लेकरांना अजूनही मैल न मैल चालतच जावं लागतं अन अश्या ठीकाणीच नराधम दुष्कृत्य करतात.
सरकार ज्या भिकारी अर्थव्यवस्थेवर तग धरतीय तिथे दारू बंदी करू शकत नाही कारण म्हणे मिळणारा तगडा महसूल. या जीवन उध्वस्त करणाऱ्या दारूच्या पैश्यातून आलेला पैसा काय देणार आहे या राज्याला? का इतका विवश होऊन चालतोय जो तो? अर्थात दारूबंदी केल्याने समस्या सुटतील असे ही नाही परंतु कमी तर होतील. किमान काही जीव वाचतील. या स्वैराचाराला ही काही बंधने असावीत की नाही असाही विचार मानत घोंगावत होता. का जीवन उधवस्त करणारी आमची महसूलगाथा आहे?
विचार नसते थैमान घालटाय की फक्त नववी मधे शिकणाऱ्या चिमुरडीची स्वप्ने कशी पूर्ण होणार? भले ती गरीब घरची असेल पण तिचा जगण्याचा अधिकार कसे काय कोणी हिरावून घेतो?स्वतःच्या वासनेसाठी इतरांचा फक्त वापर करायचा हा मानसिक चंग व्यसनानेच उभा राहतो. निर्भयाकांड झाले त्यातही नशा हा मोठा भाग होता. आरोपी नशेत धुंद होते अन स्वतःच्या भोगासाठी इतरांना लुटणे, मारणे वा बळजबरी करणे देखील त्यांच्या जीवनाचा भाग बनला होता हे समोर येते. यात कोण कोणत्या धर्माचा, जातीचा हे गौण ठरते.त्यात ही राजकीय बेताल वक्तव्य करणारे महाभाग बकबक करतच आहेत हे अजून संतापजनक. 
त्या छोट्याश्या उमलणाऱ्या कळीचा आयुष्याच्या अश्या वळणावर विकृत मानसिकतेने घात करणे आजच्या प्रगत समाजाचा सपशेल पराभव आहे. कुणी म्हणतय की तिला (स्त्रीला) आत्मसंरक्षणाचे धडे द्या. यात हे योग्य वाटेलही पण या उलट वासनांध नजरेत आदर कसा उभा उभा राहिला पाहिजे हे कोण रुजवणार? कुणी घात करेल म्हणून का तिने घाबरत जगावे? का तिने प्रत्येक पाउल घाबरत टाकावे? का तिने या वासनांध नजरांना खाली मान झुकवून पहावे?का तिने हा अत्याचार सहन करावा? का तिला भक्ष्य बनवू पाहणारे इतके बिनधास्त अन बेशरम बनून जातात?
तिच्या स्वप्नांचा चुराडा करणारे नराधम फासावर लटकावे ही माफक अपेक्षा ठेवावी की नाही? अजून किती बळी जावे लागतील अन किती मोर्चे अन बंद पाळावे लागतील या सुशिक्षित समाजाला?जलद न्यायव्यवस्था असावी हे ही तितकेच महत्त्वाचे. पण हे उपाय आजार झाला की मगच कामी येतात. तथाकथित समाज कसा काय एकमेकाचे लचके तोडू शकतो?कसे काय कुणाच्या आयुष्याला स्वत:च्या भुकेचा, वासनेचा, गलिच्छ मानसिकतेचा शिकार बनवू शकतो?
घरातील कोपऱ्यात खिचपत पडलेल्या आई-बहिणींना शिक्षणासाठी संघर्ष करून बाहेर आणले अन त्यांना समान न्याय दिला तो सावित्रीबाई फुले अन इतर समाजसुधारकांनी. या सावित्रीच्या लेकींचे आपण साधे संरक्षण देखील करू शकत नाही हे लाजिरवाणे नाही का? आपल्यातलाच एक घटक या थराला जाऊन मानवतेला काळिमा फासतो हा देखील आपल्या उन्नत समाजाचा पराभवच आहे. अजून काय मांडून ठेवले आहे भविष्यात देव जाणे. कोणी दुसरी निर्भया अन कोपर्डी ची घटना घडू नये हीच भावना. तिच्या जाण्याने जर या जनमानसाला थोडी जरी लाज वाटली तर धन्य. हे सरकार काही विशेष उपाय करील तर धन्य. हा समाज थोडासा तरी संवेदनशील होईल तरच धन्य.
लज्जित मानेने त्या चिमुरडीला श्रद्धांजली....

                         --सचिन गाडेकर

Comments