महाड, सावित्री अन काळरात्र

महाड, सावित्री अन काळरात्र ... ९/७/१६

गेल्या आठवड्यात सावित्रीचा हाहाकार अन त्यातून झालेला अपघात (की हत्या?) हे एक भले मोठे प्रश्नचिन्ह उभे करते ते आपल्या सार्वजनिक सुरक्षेबाबत. त्या काळ रात्री जे लाल डबे वाहून गेले अन तेथे सरकारी यंत्रणा तब्बल १२ तासाने पोहोचते. जर याच जागी दोन लाल दिवे वाहून गेले असते तर? जाणारा जीव इतका स्वस्त झालाय की कुणालाच त्याच सोयरसुतक नसावं .

सकाळी तर लगेचच सारवासारव सुरु होटे की पूल ब्रिटीश कालीन होता. त्याचे आयुष्यमान जास्त होते. त्याचे ऑडीट पण झाले होटे म्हणे. कोण या अधिकारी वर्गांना असे निर्धास्त बनवतो की तीन महिन्यापूर्वी ऑडीट झालेला, सुरक्षित म्हणून जाहीर केलेला पूल कसा काय मान टाकतो अन अनेक संसार कायमचे उध्वस्त करतो? काय चुकले त्या बापाचे ज्याने स्वत: ड्युटी मागून घेतली कारण त्याला लेकराचा शालेय प्रवेश निश्चित करावयाचा होता... प्रत्येकजण या अथवा त्या मार्गाने सरकारला कर भरतोच. त्याचा हा मुलभूत अधिकार आहे की त्याला किमान रस्ते, पाणी अन वीज मिळावी. या स्वतंत्र झाल्यापासूनच्या मुलभूत गरजा आहेत बर का.... एकावर एक लादलेले कर आम्ही निमुटपणे भरायचे ते कशासाठी? वेळेत कर भरून जर आमच्या नशिबी फक्त काळरात्र अन मरण असेल तर का करावे आम्ही हे सोपस्कार?

या अनास्थेमागे लपलाय तो भस्म्या रोग. नुसता दुसऱ्याचा लचका तोडून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचा अन सगळ कस आलबेल आहे हे भासवण्याचा. त्यात या घटनेला दोन दिवस होत नाही तर आमदार निर्लज्जपणे स्वत:चे पगार अन पेन्शन एकमताने वाढवून घेतात. बर आरोप प्रत्यारोप करणारे, एकमेकांचा समाचार घेणारे मुजोर लोकप्रतिनिधी हीच एकी, हाच एकोपा, हीच तळमळ जनतेच्या प्रश्नावर का नाही दाखवत? का इतकी पराकोटीची अनास्था? किती हा अप्पलपोटेपणा! किती ही जाड चमडी म्हण्यायाची? तिथे येऊन स्वत:ची मुजोरी दाखवणारे पुढारी तर धन्यच आहेत. निर्ल्लजपणाचा कळस हा की माध्यमे पुढचा दिवस ती व्यक्ती माफी कशी मागेल यात मश्गुल झाली अन दुख्खाचा डोंगर कोसळलेले मात्र निमुटपणे मदतीची वाट पाहत होते.   

अरे कोणी घराबाहेर पडावे तर हे मरण समोर आ वासून उभे आहेच. ना रस्ते धड, ना कोणते पूल धड, ना कोणते महामार्ग धड....इथे आम्ही अन फक्त आम्ही कारणीभूत आहोत कारण आम्ही विसरभोळे आहोत. अजून दोन दिवस पुलांचे चित्र, ऑडीट, बातम्या अन परवा एखादी नवी घटना घडली की हे पडले मागे. आता सर्व पूल धोकादायक आहेत की काय याची तपासणी होणार. देव जाणे ते तरी कसे होणार? हैदराबादला निर्माणाधीन पूल जीवावर उठतो तेंव्हा अनेक वर्षांपूर्वी बांधलेले हे पूल ते फारच प्रामाणिक अन सच्चे म्हणावेत. चला तर मग  वाट पाहूयात त्या होणाऱ्या पुढच्या अपघाताची अन त्यावर होणारी चर्चा अन ब्रेकिंग न्यूज....

आता काय पुन्हा नव्याने घोषणा, पुन्हा नव्याने राजकीय दौरे, पुन्हा त्याच गाठीभेटी , तेच रटाळ अन किळसवाणे न्यूज बायीट , त्याच बुरसटलेल्या महाचर्चा अन सर्वात महत्वाचं ...ये रे माझ्या मागल्या.

--- सचिन गाडेकर

Comments