जेजुरी, प्रमाण अन दिसलेला देव .

जेजुरी, प्रमाण अन दिसलेला देव ... (भाग २) १५/८/१६
कुणाला कुठे देव दिसेल याचे प्रमाण देणे अवघड आहे. देवाच्या दारी देवा आधी दिसतात ते भिकारी, मागणारे, हात पसरत भिक्षा मागणारे, मागे लागत देव दर्शन करून देतो म्हणणारे एजंट आणि स्वयंघोषित पुजारीगण. या सर्वांमुळे देवाकडे निघालेला जीव अर्धमेला होतो जणू. त्याला जणू लुट (ही लूट भक्ताच्या दृष्टिकोणातून) वाटते. हीच लूट काही जणांच्या रोजीरोटीचा भाग आहे हे देखील कटुसत्य आहे.
तिथे पायरीवर जातांना कित्येक जण भंडारा विकत होते. आम्ही गाडी पार्क केली तिथे ‘पार्किंग मोफत आहे फक्त भंडारा इथे घ्यावा लागेल.’ अशी सूचक पाटी लावली होती. आता या मागे व्यावसायिकता आहेच पण देवस्थानी  असलेले स्थानिक यापेक्षा अजून कशाने पोट भरतील हा ही प्रश्नच आहे. मर्यादा ठेवत सुरु झालेले व्यवस्थापन हावरट बनत त्याची गरीमाच खलास करून टाकते हे खूप वेदनादायी असते. चप्पलसेवा देखील अशीच राखली जाते. तुम्ही हवी ती देणगी द्या असे म्हणणे तीच उक्ती शेवट पर्यंत पाळणारे आहेत हे ही विशेष.
त्या सभामंडपा पुढे काही लोक घेर करत बसले होते अन कुणीतरी पुजारी काहीतरी मंत्र म्हणत शेवटी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ चा गजर करत होता. त्या गजरानंतर सर्व बसलेले लोक उभे ठाकून हातातील भंडारा अन खोबरे उंच हवेत उधळत होते. रांगेत पुढे असणारे विना यत्न करता त्या पिवळ्या रंगाने माखून जात होते. प्रत्येक गजर हा पन्नास मुठीचा असेल. एवढ्या प्रमाणात होणारी उधळण सर्व वातावरण भंडारामय करत होते. या सर्व प्रकारात लक्ष वेधून घेतले त्या काही चिमुरड्यानी ...सर्व शाळेत जाण्याच्या वयात असावेत असा भास होत होता. ती सर्व चिमुरडी बालके एक ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ चा गजर झाला अन खोबरे हवेत उधळले की पुढच्या क्षणी ते अचूकपणे वेचून स्वत:च्या जवळील पिशवीत भरत होते. प्रत्येक गजर त्यांची झोळी भरत होता अन मला वाटले की या बालगोपाळासाठी ते उधळलेले खोबरेच प्रसाद अन उधळणारे देवाचे रूप होते. त्या उधळण झालेल्या खोबऱ्यातून जर ते शाळेची फी अथवा पुस्तक अथवा एखादे वेळचे भोजन घेत असतील तर तोच त्यांचा देव आहे. अगदी गाभाऱ्यासमोर असलेला हा देव फार कमी लोक पाहत असतील.
थोड्याच अंतरावर एक थकलेली अन काहीसी भुकेलेली वृध्द स्त्री बसली होती. ती दिसणाऱ्या काही भक्तांकडे याचना करत होती. तेवढ्यात एका महिलेले देवाला फोडलेले नारळ अन काही पेढे गाभाऱ्यात न वाहता त्या म्हातारीला दिले अन सोबत थोडे पाणी देखील दिले. हे दिलेले दान घेतांना ती म्हातारी त्या देणाऱ्या महिलेच्या पाया पडली अन हात जोडून ती आभार मानत दिलेले अन्न खाऊ लागली. मला त्या वृध्द स्त्रीच्या डोळ्यात तिथेच मंदिराच्या परिसरात देव नजरी पडला. ज्या भावनेने ती म्हातारी पाया पडली अन तिने जो नमस्कार केला तो थेट खंडेरायलाच पोहोचला असेल यात शंका नाही. अगदी समोर असणारे देवत्व न ओळखता दगडात शोधणारे आपण कधी कधी खरेपण विसरून देखावा करत बसतो अन इथेच गल्लत होते.
त्या प्रांगणात अनेक प्रतीरूप खंडेराय लोक शोधत असतील अन ते त्या रूपात पाहतही असतील. जिथे चैतन्य अजूनही मूर्तीपेक्षा अधिक अन अग्रक्रमाने पूजनीय आहे तिथे देव आहेच आहे.
                                                  --सचिन गाडेकर

Comments