जेजुरी अन प्रमाण ......

जेजुरी अन प्रमाण ...... (भाग १) १५/८/१६

महाराष्ट्राचे लाडके श्री मल्हारी मार्तंड भैरव दर्शन घेण्याचा परवा महायोग आला. या ठिकाणी लग्न झाल्यापासून जाण्याचे रखडले होते. एका निमित्ताने हा दर्शनाचा योग जुळून आला. या ठिकाणी जातांनाच एम.ए. करताना सर्वश्री चिंधडे सर यांनी वाचायाला लावून त्यावर चिंतन करायला लावलेला अरुण कोलटकर यांचा ‘जेजुरी’ हा सबंध काव्यसंग्रह डोळ्यासमोरून जाऊ लागला. त्या वेळी किमान पक्षी अरुण कोलटकर यांना काय म्हणायचे आहे हे त्या वेळच्या तोकड्या बुद्धीने लावलेले अर्थ आज अधुरे अन पांगळे वाटू लागले. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर विना जेजुरी पाहता ते अर्थ लावणे वा त्यावर अरुण कोलटकर यांना असे का वाटले, ते असे का म्हटले असे निष्कर्ष लावणे थोडे बालिश होते असे वाटू लागले.
द बस या कवितेत जर त्या महामंडळाच्या एस. टी. ची जर आपण खाजगी बसशी तुलना करू लागलो तर हा त्या बस वर अन्याय होईल. फक्त एक अमुक शहर ते तमुक शहर जाणारी ते ही विशिष्ट वेळेत अशी खाजगी बस कशी काय स्पर्धा करणार त्या जनसामान्यच्या लाल डब्याशी? या सर्व खाजगी कंपन्या एकत्र करून देखील महामंडळ सारखी अविरत अन अखंड सेवा देऊ शकेल काय? सणवार आले किंवा एखादे विशेष प्रयोजन आले तर अव्वा च्या सव्वा दर घेणारे खाजगी उपक्रम मात्र कोणीही बघत नाही. त्या शेवटी कवितेत ओबड धोबड रस्ते त्या देवाच्या भेटीची ओढ नासवून टाकते की काय असे वाटून जाते. या इथे देवस्थाने अन तेथील सुविधा, जाणारे रस्ते, मुलभूत सुविधा किमान असाव्यात यात वाद नाही. परंतु महानगरे जिथे या कसोटीवर फेल होतात तिथे जेजुरी अन शिर्डी काय विशेष?
देवस्थानला जाणारा रस्ता कठीणच असावा असा बहुतेक जुना मानस असावा. कुठलाही देव वा श्रद्धास्थान असे सोपे नाही. का डोंगर दऱ्या अन कडे कपाऱ्या त्या संत महंत अन मोठ्या लोकांनी निवडल्या असतील? आपण तर एक पिकनिक म्हणून पाहत असणारे देवस्थळ त्या साठी नाहीच मुळी. जीवनक्रम अन अध्यात्म जोडणारा हा खडबडीत प्रवास काही सुचवत नसेल तर ते अपयश आहे आपले. आगाऊ बुकिंग करत, रिटर्न टिकट काढत जाणारे फक्त उणीवाच शोधतील हे ही खरेच नाही का? अगदी उदाहरण द्यायचे झाले तर पंढरीला मजल दर मजल करत पायी जाणारा वारकरी कधीही त्या असुविधा, रस्ते अन वाहतुकीचा उदोउदो करणार नाही. कारण त्याच्या साठी
मार्ग महत्त्वाचा नसून अंतिम धाम जास्त महत्त्वाचे.  त्याला तर विठ्ठला कडे घेऊन जाणारा मार्ग सुध्दा पूजनीय होतो.त्यासाठी मिळणारी शिदोरी किती चविष्ट आहे यापेक्षा त्यातून मिळणारी शक्ती पुढे एक पाऊल टाकण्यासयोगदान करेल हेच त्याचे गमक.
अर्थात सुविधा नसाव्यात असे नाही. आमचे सगळे फाईव स्टार असावे असे वाटते हे पण मग संकटाशी लढण्याचा संदेश मात्र पुसट होऊ नये हे लक्षात असावे. किमानलक्षी असणाऱ्या उपाययोजना व्हाव्यात हे नक्की मात्र या असुविधा कारण बनू नये त्या मूर्त स्वरूपाला नाकारण्याचे अथवा त्यावर थेट शंका घेण्याचे. श्रध्दा अन अंधश्रध्दा
यातील अंतर ज्याने त्याने ठरवावे.
असो, जेजुरी ला पोहोचलो अन त्या भंडारामय झालेल्या नगरीत पुढचे मार्गक्रमण सुरु झाले.

                                                --सचिन गाडेकर

Comments