१२ पास पोराचं काय करावं? ३/६/१८

१२ पास पोराचं काय करावं? ३/६/१८

गेल्या आठवड्यात अति महत्त्वाचे १२ वी चे निकाल जाहीर झाले. एकच झुंबड मिठाई वाटप, सोशल मिडीयावर  पोस्ट आणि अभिनंदने यांची सुरु झाली. या सगळ्यात कोण किती पाण्यात आहे हे वेगळे सांगायला नको. अर्थात यश हे यशच असते. मार्क्स किती पडले यापेक्षा काही शाळा तर १००% निकाल हाच पाढा वाचताना दिसल्या. मोठे मोठे फ्लेक्स आणि जाहिराती. असो.

मुद्दा हा की एका छोट्या कामासाठी एका दुकाणात गेलो. गावातच एक  छोटेसे दुकान आहे आणि तो दुकानदार गेली अनेक वर्षे छोटासा व्यवसाय करत आहे. स्वत:चा गाडा तो एकहाती ओढत आला आहे. या व्यवसायाने त्याला फारसे काही दिलेले नाही परंतु रोजची भाकरी, काही सणवार आणि ठीकठाक जगणे त्याने शाबूत राखलेच आहे. एक मध्यमवर्गी कुटुंब, दोन शिकणारी अपत्ये आणि त्या मुलांचे आ वासून उभे असलेली भविष्ये असे वर्तुळ म्हणजे संसार आहे त्याचा हे काल कळले.

त्याकडे गेलो एका कामानिमित. २ मिनिटांत काम झाले तर निघणार तेवढ्यांत त्याने म्हटले की बसा सर. एक दोन गोष्टी विचारायच्या आहेत आणि तो सुरु झाला. पहिला प्रश्न होता की मुलाची बारावी झाली आणि बारावीनंतर काय करावे बरे? मग विचारले की त्याची शाखा कोणती होती? वडिलांना त्याची MCVC ही शाखा देखील ठीक सांगता आली नाही हो. जवळजवळ अशिक्षित परंतु कष्टाने उभा राहिलेला माणूस तो. मग टक्केवारी आणि पुढंच काय करावे हे सगळे सुरु झाले. मी पालकाला आधी त्याची इच्छा विचारली तर म्हणे की डिप्लोमा करावा असे सर सुचवताय त्याचे. इंजिनीयरिंगचा डिप्लोमा १२ वी नंतर का करता असे विचारले तर उत्तर नव्हते. बरं, आय.टी. आय. तरी केला असता दहावी नंतर असे म्हटले तर नंबर लागला नाही असे उत्तर आले.

या पालकांना जर दहावीनंतरच मार्गदर्शन मिळाले असते तर हे प्रश्न उभे नसते असे वाटून गेले. पुढे डिप्लोमाची फी खूप आहे आणि त्यात एवढा खर्च करून त्याला नोकरी मिळेल अशी शाश्वती नाही हे त्यांनीच कबूल केले. आता बारावी झाली आणि पुढील सारे शिक्षण महाग झाले आहे. नुसता पैसा ओतावा लागतो आणि हातात फक्त कागद येतो एवढे सामान्य ज्ञान पालकास आहे याचे बरे वाटले. 

पुढे पालकाचा स्वर तक्रारीचा न राहता हळवा झाला होता. सर, मिठापासून पिठापर्यंत मलाच पहायचे आहे. मी उडी घेईल सुध्दा पण आजची पोरं जाम आळशी आहे हो. या पिढीला साधे कवडीचे पण व्यवहार ज्ञान नाही हो. त्यांना फक्त  मोबाईल आणि टीवी कळतो. आम्ही या वयात कामावर जायचो. घरात हातभार लावायचो. बारावीच्या पोराला लाज वाटते छोटे मोठे काम करायला. अरे, दिवसभर त्या मोबाईलमधे डोक न घालता एखादं काम शिकलं किंवा मला हातभार लावला तर किती बऱ होईल ते.

काही वेळाने तोच स्वर आर्त झाला. अहो सर, चार वाक्य धड लिहिता येत नाहीत यांना. चार पाहुणे घरी आले तर समोर दोन शब्द विश्वासाने बोलता येत नाहीत. घुम्यासारखी बसलेली असतात पायात किंवा मोबाईलमध्ये डोकं घालून. एखादे काम दिले तर ते धड पूर्ण होत नाही. त्यात आवाज चढवला तर जीवाचं बरं वाईट करून घेतील अशी भीती वाटते. पोरं लैच हळवी झालीत या पेक्षा जास्त परावलंबी झालीत सर. थोडं जरी रागावलो तरी एक तर रडत बसतील किंवा अबोला धरत घरातून निघून जातील. सर, कोण आहे आम्हाला त्याच्या शिवाय? मग तो किती निर्भीड, बिनधास्त आणि चंट असायला पाहिजे एवढी अपेक्षा पण नको ठेवू का?

१२ वी झालेल्या मुलासाठी एवढा भेदरलेला बाप पाहून सुन्न झालो. कहानी घर घर की अशीच असेल तर मात्र एक पूर्ण पिढी रुळावरून घसरली आहे असे म्हणावे लागेल. त्यांना थोडा धीर देत काही नेहमीचे समुपदेशन केले आणि थोडा होमवर्क करून परत भेटतो असे म्हणालो. इथे पुढ्यात उभी राहते अशी पिढी जिच्या लेखी मुले मोठी झालीत खरी पण परिपक्व किंवा स्वावलंबी नाहीत. आणि दुसरी  ती पिढी जी मुळातच भातासाठी शाळेत जाते आणि ढकलगाडीने (आधी आईबाप, नंतर शाळा, नंतर इंटर्नल मार्क्स आणि वशिला किंवा पैसा) पुढे सरकते आणि व्यवस्थेला दोष देते स्वत:च्या अपयशासाठी.

असो, खूप सारे प्रश्न उभे केलेत त्या पित्याने एक साथ. शोधूयात उत्तरे काही.

--- सचिन गाडेकर

Comments