प्रशांत गीते भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | २८/६/१८

प्रशांत गीते भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | २८/६/१८

आज काहीसा विशेष दिवस आहे आम्हा साठी. आमचे लाडके प्रशांत भाऊ यांचा आज वाढदिवस. प्रशांत भाऊ यांच्यासाठी फक्त हैप्पी बर्थ डे एवढंच म्हणून भागणार नाही हे आतून वाटले. त्यात अजिंक्यदेव यांचा मेसेज आला आणि म्हटलो कि आज लिहावंच लागेल काही चार शब्द.
प्रशांत भाऊ म्हणजे एक अनोखा संगम वक्तृत्व आणि नेतृत्व यांचा. एक लीडर कसा असावा हे शिकावे त्यांच्याकडून असे व्यक्तिमत्व. अनेक वर्ष हि मुलुखमैदान तोफ धडाडत होती आणि असे काही प्राण ओतत होती कि काय सांगावे? ज्यांनी त्यांना ऐकले ते सगळे याचे साक्षी आहेत. एकदा का तोफ सुरु झाली तर ती थेट काळजात जात चैतन्य उभे राहत असे. (आपण सर्व निमित्त आहोत ही समज याच्या मुळाशी आहे ) रात्र असो दिवस असो काही फिकीर नाही.
प्रशांत भाऊ म्हणजे विचारप्रवाह स्थिर आणि विचारधारा स्पष्ट असा खमका माणूस हा. खमका या साठी  कारण अद्भुत स्थिरता. कधीही राग किंवा चिडचिड नाही असा अवलिया माणूस. एवढे सारे निरोप, मेसेज, लिखाण, रिपोर्ट आणि अजून बरच काही तांत्रिक काम करत देखील एकदाही मी चिडचिड किंवा तनफन करताना पाहिले नाही. अर्थातच नाव प्रशांत आहे. प्रकर्षेण शांत: स: प्रशांत अशी शब्द फोडच आहे संस्कृत मध्ये. यश पचवले तसेच अनेकदा अपयश ही. (यात अपयश म्हणजे  भगवंताने घेतलेली परीक्षा हे पक्के डोक्यात) म्हणून स्थिरवृति असे म्हणावे वाटले. विचारधारा तर आता जीवनाचा भाग बनली आहे.
प्रशांत भाऊ म्हणजे धावते चक्र. अख्खा जिल्हा पिंजलाय बरका यांनी. एखाद गाव नसेल तिथे भेट दिली नसेल. प्रेम आणि आपुलकीचे वाहक कसे असावे हे शिकायला मिळे. असे म्हणतात ना की सेकंद काटा जसा धावेल त्या काही प्रमाणात मिनिट आणि तास काटा धावतो. असे सेकंद काट्याला ही लाजवेल अशी गती आम्ही पाहिलीय. त्यात भाऊ शिक्षक. एखादी जरी सुट्टी मिळाली तर हे कुठल्या तरी तालुक्यात किंवा गावात पोहोचले असत. ‘नदी वेगेन शुद्धति’ हे मूर्तिमंत शुध्द रूप पहावयास मिळते आज देखील.
त्यांची प्राथमिक शाळा तर नशीबवान म्हटली पाहिजे कारण अकोले सारख्या दुर्गम भागात खरे मूल्य  आणि जीवन शिक्षण देत आहे ते. प्राप्त परिस्थितीला, सरकारी अनास्थेला दोष न देता अखंडपणे मुलांना नवनवे उपक्रम देत आहेत. अनेक तरुण शिक्षक सुध्दा जिल्हा परिषदच्या कारभाराला नाव ठेवत स्वत: थिजून जातात त्या काळात वर्धेयम विष्णू म्हणत सतत धडपड करणारा एखादा काजवा सुध्दा सूर्याला लाजवून जातो. आज अश्या अनेक काजव्यांचे प्रतिनिधी बनलेत भाई. उप्रकम सुद्धा असे भारी की नामवंत खाजगी शाळा देखील धडे घ्यायला येतील. मग ते अगदी बीजरोपण असो किंवा एक मुल एक झाड असेल. यात हाडाचा शिक्षक डोकावतो आणि तो माझा भाऊ  आहे याचा अभिमान आहे.
अजून खूप लिहायचं आहे पण अभिष्टचिंतन करतो आणि ब्रेक घेतो.
जीवेत शरद शतम |
मोदाम शरद शतम |
नन्दाम शरद शतम |
अदीना स्याम  शरद शतम |
अजिता स्याम शरद शतम |

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ !

---- सचिन गाडेकर आणि अजिंक्य कुलकर्णी

Comments