न त्वं शोचितुमर्हसि | (१२/६/१८ )
न त्वं शोचितुमर्हसि | (१२/६/१८ )
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च । तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि | गीता हजारो वर्षांपूर्वी या श्लोकात जे कथन करून गेलीय त्या गोष्टीला मानावेच लागेल. फक्त जाण्याचा मार्ग कोणता असेल याचे उत्तर कोणाकडेही नाही. जाणारा व्यक्ती जेवढा वलयांकित तेवढी तीव्रता जास्त भासते. याचे श्रेय ही मिडिया आणि आपल्या मानसिकतेला द्यायला पाहिजे. तसेही मृत्यू क्रूरच आहे हे मान्य केल्यावर जीवन कसे संपले याला देखील महत्त्व राहत नसावे. एवढ्यात नैराश्य हे एक मोठे कारण बनले आहे जीवन संपण्याचे किंवा संपवण्याचे. या सगळ्यात नैराश्य (डिप्रेशन) हा राक्षस त्याचे भक्ष्य मात्र टिपत आहे आणि स्वत:ची पाळेमुळे घट्ट करताना दिसत आहे.
एखाद्या व्यक्तीला आपण स्वत: डिप्रेशनचे शिकार बनलो आहोत असे कळाले तर ते मान्य करत लगेच उपचार करत त्यावर मात करणे शहाणपण ठरेल. त्यात पब्लिक इमेज जर असेल तर मात्र व्यक्ती कचरू शकतो. कुणास कळले की मी डिप्रेशनचा शिकार आहे तर ते इतर कुणाजवळ न बोलता लपवून ठेवतात आणि स्वत: सहन करत अजून खोल गर्तेत जातात. याचे कारण काय म्हणे तर लोक हसतील, मजाक उडवतील किंवा सहानुभूती दाखवतील. या अश्या भीतीने हा दुर्धर आणि जीवघेणा आजार जास्त भयंकर बनतो हे वेगळे सांगायला नको.
त्यात घरात किंवा समाजात मन मोकळे करावे असे किती ठिकाणं आपण कमवली आहेत हे देखील पाहावे लागेल. दिवसभरातून दहा दहा अपडेट टाकणारा हे असे विकार कुणा एकासमोर तरी सहज मांडू शकत असेल काय? सोशल होत चाललेली पिढी ती थेट काळजाचा ठाव घेत अचूक मर्म आणि गडबड ओळखणारी एक जागा मात्र गमावत तर नाहीय ना? अशी एखादी जागा असावी जी सगळं बाजूला ठेवत तुमच्या सोबत उभी राहेन आणि तुम्हांस योग्य मार्गावर घेऊन जाईल. तुमचा प्रश्न आणि त्याचे गांभीर्य जाणून घेत साथ देईल.
परवाच दीपिका पदुकोन हिची मुलाखत युट्यूबवर पाहत होतो आणि त्यात हे प्रकर्षाने जाणवले कि ज्या क्षणी तिच्या पालकांना जाणवले की दीपिका डिप्रेशनची शिकार झाली आहे तर त्यांनी लगेच पाऊले उचलली. तिथे २ मोठे प्रश्न होते ते असे – तिचे करियर आणि तिचे आयुष्य. जर जे पब्लिक झाले तर तिचे करियर धोक्यात येऊ शकते. तिला कोणी काम देईल की असे होऊ शकते. यात तिच्या पालकांनी तिचे आयुष्य निवडले. फुंदून फुंदून रडणारी मुलगी एक सुपरस्टार नसून आपली मुलगी आहे हे त्यांनी स्वीकारले आणि प्राधान्य दिले तिच्या तत्काळ समुपदेशन आणि उपचार यांना. दीपिकाचा तो इंटरव्ह्यू पाहिला पाहिजे कारण हिम्मत लागते हे मान्य करायला की मी शिकार बनले होते आणि आज त्यातून बाहेर आले आहे.
एवढ्यात मागच्या आठवड्यात झालेले मनाचे खच्चीकरण जिवलग मित्रांसोबत शेयर केले आणि त्यांनी देखील समजावून घेत योग्य ते आत्मबल दिले. कुणीही टर न उडवता विश्वासच दिला आणि मन पुन्हा जागेवर आणण्यास मदत झाली. ती एक जागा प्रत्येकाला सापडेलच असे नाही. एव्हाना फेसबुकवर निलांबरी जोशी यांच्या सारख्या अनेक व्यक्तींच्या पोस्ट असेच समुपदेशन करत असतात. त्यातून हे देखील कळाले की नैराश्य लपवून ठेवण्याची बाब नाही. त्यात मन याच्यात रमव, हे कर, ते कर किंवा थोडेसे बदल करा असे करून प्रश्न सुटत नाही म्हणतात. इतर छिटपुट निराकरण करण्यापेक्षा थेट हात घातला गेला पाहिजे प्रश्नाला. जर योग्य समुपदेशन नाही मिळाले तर सुपरकॉप असो वा राष्ट्रसंत सगळे मृत्यूपंथावर चालू लागतात.
शेवटी न त्वं शोचितुमर्हसि | हा संदेश मान्यच आहे सर्वपक्षी.
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment