शीक्षावल्ली तैत्तिरीयोपनिषदि (लिखाण १)
शीक्षावल्ली तैत्तिरीयोपनिषदि (लिखाण १)
ही शिक्षावल्ली एक मैलाचा दगड आहे आणि म्हणून त्याचे अवलोकन करूयात. यात अनेक सूत्रे आहेत. त्यातील क्रम काहीसा असा आहे.
शासन
तैत्तिरीय उपनिषद्
वेदम अनूच्य आचार्योऽन्तेवासिनम अनुशास्ति ।
सत्यं वद ।
धर्मं चर ।
स्वाध्यायान्मा प्रमदः
वरील ४ उक्ती नंतरच्या सदरात येतील. या नंतर येते ...
आचार्याय प्रियं धनमाहृत्य (Offer to the Teacher whatever pleases him.)
या उक्तीचा अर्थघटन करताना ‘आचार्याय’ ही चतुर्थी प्रथमा विभक्ती आहे हे आठवले. (लिमये सरांची आठवण होणे स्वाभाविकच) यानुसार आचार्यांना रुचेल, आवडेल असे धन द्यावे असा ढोबळ शब्दार्थ अर्थ होतो.
आता प्रश्न उभा राहतो की जे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करत तो कृतज्ञतेने गुरुदेवांना आवडेल किंवा रुचेल असे काहीतरी देतो. यात आजच्या तराजूत जाऊन तोलले तर हा सगळा विचारच व्यर्थ आहे हे नक्की. कारण फक्त अर्थधोरणी आणि व्यवसायलक्षी शिक्षणात हे असे अकल्पनीयच आहे. असो. कारण आधी फी आणि नंतर प्रवेश हा आजचा प्रकार आपणास रूढ झालेला आहे. यात प्राथमिक शिक्षण जे सरकारी व्यवस्थेत दिले जाते तेच फक्त अपवाद असतील.
यात आचार्य यांना काय रुचेल हे फार महत्त्वाचे. बहुदा आचार्य हे ६० वयोमर्यादा उलटलेले आणि सांसारिक बाबींतून मुक्त झालेले असत असा प्रघात असे. काही पूर्ण वेळ आणि तरूण असतीलही पण अनुभवाने परिपक्व आणि रोजच्या भाकरीच्या धक्क्याचा गुलाम नसलेला आचार्य काय मागत असेल बर? सहज कल्पना केली की नारायणमूर्ती, टाटा, महिंद्रा, रमेश भटकर अशी मंडळी जर आपल्या आजच्या डबघाईस आलेल्या विद्यापीठांत जर जाऊन शिकवू लागले आणि पूर्ण वेळ देऊ लागले तर तिथे विद्यार्थी कसे तयार होतील? स्वत: भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम सर यात सर्वात अग्रेसर होते यात शंकाच नाही.
पुढे मुद्दा हा येतो की कोणते धन मागितले आहे? धन कोणते मानले जाते? पुन्हा आजच्या कागदी नोटा आणी मुल्य प्राप्त झालेली पाषाणखंड(सोने नाणे ) याची आठवण होऊ नये. जर आमचे स्तोत्रे आम्हाला ‘धनं अग्नि, धनं वायुः...., हे सांगते तर स्पष्टता यायला हवी. एखाद्याला अग्नी स्रोत मागितला तर तो त्यावर किती काम करत असेल? ‘धनं वायुः’ मागितले असेल तर तो आजच्या हवा प्रदूषण यावर काहीतरी करत असेल ना? कोणी ‘धनं वसु..’ वर काम करत असेल तर आजच्या सारखी जबरदस्ती प्लास्टिक बंदी घालावी लागणार नाही असे वाटते. यात द्वेष्टा जो आहे त्याचे व्हिजन जास्त मोठे असावे हे नक्की.
प्रियं धनमाहृत्य असे म्हटले तर प्रियं म्हणजे काय? प्रिय ते जे कोण्या एकासाठीच प्रियं नसेल. जे समाजव्यवस्थेत सर्वांची काळजी घेत केले जाईल. घाई असेल तर सिग्नल तोडणे मला प्रियं बनते तर ते हिताचे आहे काय? एखादे काम फक्त माझ्या फायद्याचे असेल आणि इतरांस जर त्याचा त्रास होणार असेल तर ते प्रिय नसून अप्रिय आहे हे म्हणावे लागेल. जर मूल्य अधिष्ठित शिक्षण प्राप्त असेल तर विद्यार्थी स्वत: असे काही कसे मागेल? भाकरीचा धक्का इतका मोठा होऊन बसला आहे की मुल्ये केंव्हाच डिबार झाली आहेत. प्रियं ते जे सर्वसमावेशक असावे किंवा किमान अनावरोधी असावे असे म्हणूयात.
आचार्य आणि विद्यार्थी हा संबंध जितका सुदृढ तितके सोपे मन ओळखणे. जर विद्यार्थी गुरूशी एकरूप आहे तर गुरुप्रियं काय आहे हे शोधावे देखील लागणार नाही. अश्या परंपरेत दिले जाणारे शिक्षण आज कालबाह्य आहे हे वेदनादायी आहे.
असो, हे सूत्र आपण थोडक्यात पाहिले. यावर अजून खोलवर मंथन अपेक्षित आहे आणि ते करत राहुयात.
--- सचिन गाडेकर
उपनिषद लर्निंग
Comments
Post a Comment