१०२ नॉट आउट आणि मनोवस्था ६/८/१८

१०२  नॉट आउट आणि मनोवस्था ६/८/१८

काही चित्रपट एकदा पाहून झाले की मागे पडतात. काही चित्रपट असे असतात की  ते स्मरणात राहतात तर काही मध्येच काही प्राप्त परिस्थिती किंवा मनोवस्था असेल तसे उसळी मारतात आणि पुन्हा त्या चित्रपटाची  उजळणी होते हमखास. 102 नॉट आउट हा त्यातलाच एक चित्रपट. एव्हाना हा चित्रपट आला आणि गेला पण कुठेतरी हलवून गेला माझ्यासारख्या प्रेक्षकाला असे नक्कीच म्हणता येईल.

हा चित्रपट मुळातच दोन बाप लोकांचा अभिनय पाहूनच पैसा वसूल होतो. एक शहेनशहा तर दुसरा चॉकलेट बॉय ते एवढ्यात बटाटा झालेला अभिनेता. हा चित्रपट पाहताना दोघेही लक्ष वेधून घेतात. एक छोटीशी पटकथा पण त्यात जो प्राण ओतला आहे उभयतांनी तो अजबच आहे. कुठेही तुलना होत नाही दोघात आणि इच्छा देखील होत नाही डावा उजवा म्हणण्याची.

तर मुळात हा चित्रपट एक हिम्मत हरलेला, खचलेला, लढाईपूर्वीच मनोबल हरवलेला ७५ वर्षे पूर्ण केलेला मुलगा (ऋषि कपूर )आणि त्याचे १०२ वर्षाचे तरूण, उत्साही आणि लढवय्या बाप (बच्चन साहब)यांचा प्रवास आहे. ऋषि कपूर त्या साच्यात इतके फिट बसवलेत डायरेक्टरने की काही काळ आपण त्य व्यक्तिरेखेशी सहानुभूती व्यक्त करू लागतो. या उलट बिनधास्त, मनमौजी बच्चन साहेब तर जिंकून टाकतात. त्यात ते गुजराती हेल्यातले संवाद इतके मस्त वाटतात की ऐकत बसतो माणूस आणि लॉजीक लावत बसत नाही.

या पटकथेत ऋषि कपूर खचला आहे मुलाच्या वागण्याने. त्याचा मुलगा न सांगता सोडून जातो, न सांगता – न बोलावता लग्न करतो, अनेक वर्ष संबंध नहीवत करतो. इथे एक म्हातारा बाप खचून जातो. मुलगा इतका चुकीचा वागत असून देखील आंधळी माया त्याला झुकायला भाग पाडते. तो मुलाच्या लोभाला ओळखतो पण पुत्र प्रेम आणि नातवंड भेटतील या खोट्या आशेने ते दुर्लक्षित करतो. इथेच सगळी गोम आहे. मुलगा स्वत:च्या संपत्तीसाठीच थोडाफार संबंध टिकवून आहे हे देखील माहित आहे त्या बापाला.

१०२ वर्षाचा बाप चंग बांधतो काहीतरी करण्याचा आणि त्या भावनिक पांगळ्या झालेल्या मुलाला एकामागून एक अट टाकत पुन्हा मूळ स्वभावाकडे परत आणतो. त्याला आलेली कात सुस्त करून गेली आहे आणि ती काढली तरच तो उभा राहील हे सुद्धां जाणतो. एक शंभरी ओलांडलेला बाप त्या मुलाचे स्वत:चे हरवलेले अस्तित्व परत शोधतो. पुन्हा खाली झुकेलेले खांदे सरळ होतात., हरलेले मन सुखावू लागते आणि सुकलेली इच्छाशक्ती पुनर्जीवित होते. जीवन कसे जगावे हे विसरलेली गाडी पुन्हा रुळावर येते आणि बेधुंद होत धावत सुटते.

चित्रपटाशेवटी स्वत: ऋषि कपूर इतके वर्ष ज्याची वाट पाहिली, ज्या मुलासाठी डोळे आतुर झाले होते तो का भेटायला आलाय हे सत्य मान्य करत त्याला एयरपोर्ट वरतीच सुनावत कायमचा संबंध तोडत धडा शिकवतो. १०२ वय वर्षे असणारा बाप आपल्या ७५ वर्षाच्या मुलाला खरे जीवन दाखवतो. घाबरून, धसक्याने न जगता येईल तो क्षण आनंदाने जगवा असे पटवतो. वय ही शारीरिक मर्यादा असेल पण मन थकले अथवा दमले तर अकाली वृध्दत्व माथी येणारच. 

आता चित्रपट आरसा आहे जीवनाचा असे म्हटले तर चूक ठरणार नाही. मन आणि सत्य यांचा संघर्ष टिकटिक करत होता डोक्यात. स्वत:चे एकतर्फी जीवापाड प्रेम असणारा मुलगा एका बाजूला तर त्याने सातत्याने केलेली स्वार्थाने प्रेरित हेळसांड असे गणित उभे राहते. थोड्या काळासाठी का होईना मन रेटून नेते बुद्धीला आणि सत्याला. आरडाओरडा करत मन खोटे सत्य आहे किंवा बरोबर आहे असे भासवते देखील पण एक क्षण येतो की डोळे उघडून कटू सत्य पडताळत योग्य निर्णय घ्यावा लागतो. मनावर दगड ठेवत कठोर पाऊल उचलणे सहज सोपे नाहीच तसे.

कठोर निर्णय कधीच सहज घेतले जात नाहीत याची पुनरुक्ती घडली एका प्राप्त परिस्थितीमुळे आणि पुन्हा एकदा हा चित्रपट आवर्जून पाहिला.

--- सचिन गाडेकर

Comments