माझे आणि माझ्या वर्गातल्या सगळ्यांचेच आवडते शिक्षक, सचिन सर

माझे आणि माझ्या वर्गातल्या सगळ्यांचेच आवडते शिक्षक,
सचिन सर,

जन्म आणि मरणाचा फेरा सुरु होतो, आणि सुरू होतात प्रश्न - उत्तराची आवर्तनं! जगण्याच्या ह्या रहाटपाळण्यात आई-बाप बसवत असले तर मग हा रहाटपाळणा फिरवतं कोण? मग शोध चालू होतो. जगण्याच्या या वारीत तांडेच्या तांडे ढगांसारखे सरकत गेले पण कोणी थांबलं नव्हतं. पेच होता तरी माथ्या आठी नव्हती. कारण ह्या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रत्येकाला ह्या देवानं एक मोठी परंपरा भेट म्हणून दिली. "गुरू-शिष्याची" थोर परंपरा. त्याच परंपरेचं तुम्ही एक प्रतीक आहात. त्यासाठी तुम्हाला इथूनच नमस्कार करतो!

मला आज तुम्हाला काहीतरी सांगायचंय! अर्थात १ वर्षांपूर्वी मी MIT मध्ये ऍडमिशन घेताना जसा होतो, त्यापेक्षा खूप वेगळा झालोय. Infact, तुम्ही घडवलं. Peace ह्या विषयामुळे ६ महिने तुमच्या सहवासात आम्ही होतो, तुम्ही जे बोललात, जे शिकवलंत त्यामुळे बरं झालं आमचं आयुष्यात.

सर, मराठीमध्ये 'आरती प्रभूंची' फार सुंदर कविता आहे.

ती येते आणिक जाते,
येताना कधी कळ्या आणिते
आणि जाताना
फुले मागते, ती येते..

खरंतर ही कविता प्रतिभेला उद्देशून आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. मला हे तुमच्या बाबतीत असंच जाणवतं. तुमच्याकडे येणाऱ्या प्रतिभेला तुम्ही प्रत्येक कळीचं फुल करूनच देता. बुद्धिमान माणसाने आपलं ज्ञान नुसते awards गोळा करण्यासाठी न वापरता समाजासाठी वापरावं ह्या मताचा मी आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ज्ञानाचा वापर पिढ्या घडवण्यासाठी करता म्हणून तुमचं तेज हे नेहमी आम्हाला जाणवतं.

मला तुमचं प्रत्येक लेक्चर हे पहिल्या लेक्चर सारखंच वाटलं. खरंच! तोच उत्साह, तीच energy, तीच मवाळ भाषा आणि तेच हुशार डोळे!
तुम्ही अगदी सहज सगळं सांगितलं आम्हाला. ज्ञानेश्वर माउलींपासून ते आता परवाच्या "siblings" पर्यंत. कुठेही शिक्षक-विद्यार्थी असं खेळला नाहीत.

माऊली म्हणतात तसं,

बापरखुमा देवीवरू, सहज निटू जाहला!

तुमचं बोलणं आणि शिकवणं सहज आहे. कारण प्रयत्न आणि कष्ट करून पैलवान घडवता येतात, विद्यार्थी नाही! हे कदाचित तुम्हाला उपजत असावं. म्हणूनच तुम्ही internal marks चा बडगा न दाखवता सुद्धा तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे!

सर, मला असं वाटतं की, शिक्षक हा मार्गदर्शक असावा. विद्यार्थ्यांना ज्या ज्या विषयात रस असेल त्या त्या विषयात शिक्षकाला रस असेल तर शिक्षक आपला वाटायला लागतो.
तुम्ही सतत आम्हाला आव्हानात्मक प्रश विचारत गेलात. आणि एकदा देशप्रश्न मनामध्ये रुजले, की मुलं आयुष्यभर एका प्रश्नाचा अभ्यास करतात हे इतिहासात लिहिलंय. खूप छान वाटतं, जेव्हा IT फिल्ड मध्ये असूनही कुणीतरी आम्हाला समृद्ध करतंय. त्यासाठी खूप खूप धन्यवाद!!

माझं नाव पहिलं येईल ना, मला लोक ओळखतील ना असले
Logical आणि practical विचार करून आयुष्य एखाद्या झाडाप्रमाणे वठण्यापेक्षा, तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीने आम्ही emotionally विचार करायला लागलो आणि आयुष्याला नदीपण आलं! आणि सर, नदी वाहून नाही जात! नदी वाहत राहते!!

असेच दिवसेंदिवस आम्ही चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करू, आणि तुमचे संस्कार पुढच्या पिढीला
forward करू!! कारण, संधी देतो तो शिक्षक, शिकायला उद्युक्त करतो तो शिक्षक, फक्त शिकवतो तो शिक्षक नाही.!

आज आमचं पहिलं वर्ष officially संपलं! म्हणून तुम्हाला हा अभिप्राय देतोय!! चुकभुल द्यावी घ्यावी!!!

तुमचाच विद्यार्थी,
निनाद सुमंत
FY.MSc (Comp. Sci)

Comments