मांदार्य कादंबरी आणि खूप काही (भाग १) ४ डिसेंबर, २०१८
मांदार्य कादंबरी आणि खूप काही (भाग १) ४ डिसेंबर, २०१८
मागच्या आठवड्यात राजेंद्र खेर यांची अगस्त्य ऋषींच्या जीवनकार्याचा वेध घेणारी अदभूत कादंबरी मांदार्य हाती आली. खूप दिवस वाट पाहत होतो मी. बुकगंगावर बुक करत ती पटकन मिळवली आणि प्रारंभ झाला एका विशिष्ट प्रवासाचा. अनेक ऋषी आणि महान चरित्रे काळाच्या पडद्याआड तशीच राहिली आहे आणि अश्या ऋषी चरित्रांना अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले जाणे आणि ते समोर येणे म्हणजे खासच.
अगस्तीऋषी एक महान ऋषी चरित्र आहे हे माहित असेलच पण ते इतके उत्तुंग आणि भव्य दिव्य आहे हे या कादंबरीतून प्रतीत होते. एक ऋषीतुल्य जीवनाला हा वैचारिक दंडवत विशेष ठरणार आहे. सदर कादंबरी केवळ अगस्त्य ऋषीच नाही तर इतर अनेक ऋषीतुल्य चरित्रे कशी असतील याचा प्रत्यय येतो. मन हळवे बनते आणि अलगद आदरभाव उभा राहतो सर्वांसाठी. हि कादंबरी इतर महान चरित्रे अभ्यासण्यासाठी एक मैलाचा दगड बनून दिशा दाखवेल एवढे नक्की.
या लिखाणात परिपूर्णता तर आहेच पण विज्ञान आणि अध्यात्म यांचा अनोखा मेळ आढळतो. कोणतेही वर्णन केवळ कपोलकल्पित कथा किंवा केवळ पौराणिक संदर्भ यावर न राहता त्याला तार्किक आणि वैज्ञानिक जोड दिली आहे. अगदी सोपे उदाहरण म्हणजे दशानन रावण या नावाची फोड नावाप्रमाणे करत त्याला वृत्तीशी जोडत त्याचे निरूपण केले आहे. '' दहा तोंडानी बोलतो तो दशानन! दहा ठिकाणी दहा परस्पर भिन्न विचारांनी बोलणारा आहे तो!'' हा असा रावण आजदेखील पाहावयास मिळेल हे वेगळे सांगायला नको. ज्याची अशी वृत्ती असेल तो रावणच म्हणावा इतके सोपे म्हणावे लागेल.
केवळ समुद्रप्राशन आणि नाडीग्रंथ असे दोन संदर्भपुरते उरणारे मांदार्य विंध्याचल ते प्रवराकाठ असा विशाल परिसर व्यापून टाकतात आणि संस्कृतीचे महान कार्य करतात हे ज्ञात होते. एवढा उत्तुंग कार्यभाग पाहून मन अलगद भावविभोर होत नतमस्तक देखील होते. या वाचनात खूप काही मिळाले असे म्हणेन कारण जीवनात पडणाऱ्या प्रश्नांना थेट उत्तरे देणारी महावाक्ये अगस्त्य बोलतात. त्यांची शब्दमाला कादंबरीतील चरित्रांना नसून ती आपल्यासाठीच आहे हे कळाले तरी वाचन सार्थकी लागले असे.
काही अशीच विशेष वाक्ये उदधृत करत आहे. या प्रत्येक वाक्याचा कादंबरीतील परिस्तिथीशी संबंध तर आहेच पण आपल्या रोजच्या जीवनात देखील हे डोकावतात हे नक्की.
"प्राप्त परिस्थितीला समर्थपणाने सामोरं जाण्यातच खरा पुरुषार्थ असतो. "
"वर्तमानात एखादी कटू वाटणारी घटना ,उपदेश किंवा निर्णय हा भावी काळात मधुर फळं मिळावीत यासाठीच वाट्याला येत असतो."
"अज्ञानातल्या सुखात रमणं हा मनुष्यस्वभावच असतो की काय कुणास ठाऊक!"
"मानवता जपणारी सात्विक वृत्तीची दैवी संस्कृती कष्टपुर्वकच रुजवावी लागते."
"नदी जमीन सुपीक करत जाते- पण मागे वळून ती आपलं ते कर्म बघत नाही. त्याच भूमिकेतून आपण जायचं. प्रवाही बनायचं:प्रेमसंबंध प्रस्थापित करायचे. फळ मात्र परमेश्वरावर सोपवून द्यायचे. "
"विकासमार्गावरचा एक पर्याय देऊन परिवर्तन घडवून आणायचं असत. एकदम बदल करायला सांगितलं तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. "
" विचारांनी मनुष्यपरिवर्तन झाल्याशिवाय कोणतेही नियम-आचारसंहिता उपयुक्त ठरू शकत नाही;उलट ती कुचकामी ठरत असते."
या कादंबरीत असे अनेक विचार अगस्त्य आपल्यात नकळत रुजवतात आणि आपल्याला पुष्ट करतात. कादंबरीतील शब्दवर्णन ते खास आहेच पण त्याही पलीकडे त्यातून मिळणारे शब्दअमृत जास्त भावले हे नक्की नमूद करू इच्छितो.
क्रमश:
-- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment