मांदार्य कादंबरी आणि खूप काही (भाग २) १३ डिसेंबर,२०१८

मांदार्य कादंबरी आणि खूप काही (भाग २) १३ डिसेंबर,२०१८

मांदार्य ही कादंबरी दोन भागात विभागली आहे. पहिला भाग पश्चिम दिग्विजय तर दुसरा भाग दक्षिण दिग्विजय असा आहे. यात स्वर्ग, देवनगरी, इंद्र, देवादिदेव अश्या अनेक संकल्पना तार्किक पद्धतीने मांडल्यामुळे त्या भावतात. स्वत: अगस्त्य आणि त्यांचा शिष्य शंख आणि प्रगाथा यांचे संवाद त्यांचे न राहता कधी ते संवाद वाचकाचे आणि अगस्त्यांचे बनून जातात हे कळतच नाही. नकळत आपल्या अनंत प्रश्नांना, विचारांना ऋषिवर उत्तरे देतात. लेखक राजेन्द्र खेर यांच्या लेखणीची ती कमाल आहे हे नक्की. या वाचन प्रवासात अनंत महान चरित्रे समोर येतात. लेखकांनी केलेला अभ्यास आणि  केलेले कष्ट पदोपदी दिसून येतात. एक महान ऋषी परंपरा आणि काळाच्या पडद्याआड राहिलेली व्यक्तिमत्वे त्यांनी आपल्या समोर आणली आहेत.

यातील बौद्धिक खाद्य इतके रुचकर आणि पौष्टिक आहे की ते पुन्हा पुन्हा चर्वण करावेसे वाटते. एका छोट्या संभाषणात मांदार्य कुटुंब आणि त्यातील सौहार्द समजावतात. एका टोळीला उद्देशून केलेला उपदेश आजच्या सुशिक्षित आणि स्वत:ला आधुनिक म्हणणाऱ्या अप्रगत समाजासाठी लागू पडतो, चपखल बसतो. मांदार्य म्हणतात की कुटुंबात एक समज निर्माण झाली पाहिजे. नवरा-बायकोला परस्परांचा आदर करता आला पाहिजे. पत्नीच्या कार्यात निरपेक्षता असते. तिचे कष्ट कोणत्याही धनात मोजता येणार नाही. स्त्री आणि पुरुष यांचे वेगळे आहेत पण त्याचे साहचर्य मात्र कुटुंबाला सुखी करू शकत.

आजच्या मुक्त प्रवाही आणि विचारी पिढीला ते समजावतात की कौटुंबिक जीवन सुदृढ नसेल तर व्यक्ती सैरभैर बनू शकते. स्वैरतेत तात्पुरते सुख मिळते पण अंतिमत: दु:खच दु:ख. मानवाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कुटुंबव्यवस्था असणं अतिशय महत्त्वाचं आहे! विवाहानंतर दोन जिवांच साहचर्य आणि एकरूपता अपेक्षित असते. परस्परांमध्ये अलौकिक प्रेमभाव निर्माण झाला तरच कुटुंब सुखी होते. त्यासाठी परस्परांचा अहं परस्परांमध्ये विरघळून गेला पाहिजे. परस्परांच्या दायित्वाचा आदरही राखता आला पाहिजे.

आजच्या काळात संसाराची दोन्ही चाके चालत असतील तर त्यांसाठी मांदार्य नमूद करतात. ते म्हणतात परस्परांच्या कार्यक्षेत्राचा सन्मानही करता आला पाहिजे. मूकपणे भावप्रकटन करता यायला पाहिजे. जेंव्हा पती किंवा पत्नी अथवा दोघांचाही अहं बळावतो तेंव्हा मी मिळवतो तर मी कसाही वागेन, काहीही करीन असा अहंकारग्रस्त भाव जर मनात रुजला तर  कुटुंबाला तडे जायला लागतात. दोघांचे अहंभाव परस्परांमध्ये विसर्जित व्हायला हवे. परस्परांच्या कष्टाचं मोजमाप धनाच्या आधारे कधी करता कामा नये. (हे विचार आजच्या आमच्या पिढीला किती आवश्यक आहे हे सांगायला नको.) 

मांदार्य ऋषीच्या जीवनातील प्रवास पाहता असे दिसते की जिथे जिथे सकारात्मक विचार कच खाताना किंवा कमी पडताना दिसतात तिथे मांदार्य पुढे सरसावतात आणि विस्कटलेली घडी पुन्हा बसवतात. उभी केलेली मानवी संस्कृती उध्वस्त करणाऱ्या असुरी सत्तेला आणि त्यांच्या आक्रमणाला आव्हान देत कधी प्रेम तर कधी शस्त्र वापरत रोखतात. ते एका ठिकाणी म्हणतात की शास्त्रविचार खंडला की शस्त्रविचार जोर धरतो. सज्जनांची अकर्मण्यता राक्षसी कर्मण्यतेला खतपाणी घालत असते. आपल्या शिष्यांना सांगतांना असेच वाटते की ज्यांना कोणाला स्वत:च्या या जगात येण्याचा आणि काय विशेष करण्याचा प्रश्न असेल तर मांदार्य सांगतात की या धरणीवर आपण सर्वांनी कर्तव्यकर्म करण्यासाठीच जन्म घेतलेला असतो- मौजमजेसाठी नाही. मद, लोभ, आसक्ती आणि ममत्वाचा भावभावना मनुष्याला नेहमीच कर्तव्यापासून परावृत्त करू पहात  असतात.  त्यावर विजय मिळवून आपलं कर्तव्यकर्म शुष्क भावनेनं नव्हे तर भावपूर्ण अंत:करणाने पार पाडलच पाहिजे, यातच आपला विकास असतो.

कोणास प्रश्न पडेलही मग रावण का तयार होतात? का असुरी वृत्ती वाढीस लागते तर मांदार्य म्हणतात की व्यक्तिगत महत्वाकांक्षा आणि दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याची वृत्ती व्यक्तीचा अध:पात करतेच पण पर्यायानं संपूर्ण समाजालाही मारक ठरते. अश्या असुरी वृत्तीचे दमन करू शकते ती यज्ञीय शक्ती आणि दंडशक्ती. याच जोडीने ते सांगतात की ईश्वरी कार्यात एकदम परिवर्तन कधीच होत नसत. वेळ ला लागतच असतो, त्यालाच तप म्हणतात. मंद गतीने झालेलं कार्यच दीर्घकाल तिक्त असतं. ते हे देखील सांगतात ईश्वरी कार्यात येणारी आव्हाने देखील मोठीच असतात. तिथे उभं राहणं फार महत्त्वाचं आहे.

अश्या अद्भुत विचारांचा ठेवा किती व्यक्त करावा आणि किती नाही असे वाटते आहे. मला असे अनेकदा वाटून गेले की ही कादंबरी व्यक्तीअधिष्ठित न राहता ती विचाराधीष्ठीत झालेली आहे. वाचकांनी अगस्त्य तर वाचावेतच पण त्यासोबत प्रवाहित झालेले विचार जास्त अंगीकारावेत असे भासते. मांदार्य यांचा अगस्त्य होतो तो त्यांच्या महान कर्मयोगाने. त्यांचे जीवन जणू आपणास कर्मयोगाची दिशा दाखवत आहे वाटते.

क्रमश:

-- सचिनगाडेकर

Comments