ग्रेट भेट विथ ख्यातनाम लेखक राजेन्द्र खेर सर १९/१२/१८

ग्रेट भेट विथ ख्यातनाम लेखक राजेन्द्र खेर सर १९/१२/१८

प्रख्यात लेखक सन्मा. राजेन्द्र खेर आणि त्यांच्या सौभग्यवती सौ. सीमंतिनी खेर यांची ग्रेट भेट घेण्याचा योग गेल्या बुधवारी आला. सरांचे कांदबरी रुपात आलेले मांदार्य हे नवे विचारअमृत सध्या सगळीकडे पोहचत आहे. ते वाचून झाले तेंव्हा पासून त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्कट इच्छा होती. एक महिनाभर मी, आमोदसर आणि निरंजनसर प्रयत्न करत होतो. आमच्या दैनंदिन गडबडीत अनेक आज- उद्या आले. अखेर बुधवारी जायचे ठरले आणि मोठ्या उत्सुकतेने निघालो. आमोदसर  यांचा परीचय होताच पूर्वीपासून आणि मधल्या काळात भेट नाही झाली म्हणून उत्कटता जाणवत होती. यापूर्वी निरंजनसर आणि खेर कुटुंब यांनी सलोखा जपला असल्याने ते बिनधास्त भासत होते त्याच्या बोलण्यातून अनेक जुन्या आठवणी देखील ऐकावयास मिळाल्या पण मी आणि आमोदसर खूप उत्सुक झालो होतो.

आम्ही पोहोचलो. होय, आम्ही पोहोचलो एका भावविश्वात. ते स्वागत, विनम्र विचारपूस, हे घ्याव लागेल असा आग्रह आणि अखंडित स्त्रवणारा विचारयज्ञ हे सगळं अनुभवत होतो. मी मांदार्य वाचल्यावर फेसबुकवर २ प्रतिक्रिया लिहिल्या होत्या, स्वत: लेखकांनी छान लिहिलंय असे म्हणाले आणि मला माझ्या  फाटक्या झोळीला राजवस्त्र म्हणावे असे वाटले. त्यांची प्रतिक्रिया भारावून टाकणारी होती. त्याने अजून चांगले लिहिण्याचा आणि अभ्यास करण्याचा उत्साह मिळाला मला. किती मोठे काम आहे हे जाणवत होते. जबाबदारी वाढते अश्या शब्दांनी.

हळूहळू आम्ही प्रश्न विचारत मांदार्य आणि त्या मागचा प्रवास एक एक पान त्यांनी उलगडले. अगदी कधीपासून सुरुवात झाली आणि कसा हा खडतर प्रवास पूर्ण झाला, हा ज्ञानयज्ञ जो एका अश्या चरित्रावर आहे जे हजारो वर्षापूर्वी झाले आणि आता त्याची मांडणी करायची आहे असे अनेक प्रश्न आणि मग एक एक सोनेरी पान उलगडून ते आम्हास सांगू लागले. विशेषत: या कादंबरी लिहितांना किती सखोल अभ्यास करावा लागला हे प्रतीत होत होते. अनेक कालमर्यादा किंवा कालखंड यासाठी  लागलेला कस दिसत होता. त्यांनी आवर्जून सांगितलेली एक बाब म्हणजे धर्मपत्नी सीमंतिनी खेर यांनी सांभाळलेली कुटुंबाची बाजू भावविभोर करणारी होती. लेखनात आणि त्या विचारात पूर्ण हरवून जातो आणि संसाराचे चाक त्या सांभाळतात असा आदराने उल्लेख केला. धन्यो गृहस्थाश्रम: |

बोलता बोलता त्यांनी त्यांच्या लेखक होणे, लेखनात ऋषी चरित्रे किंवा ऐतिहासिक चरित्रे यावीत हे सगळे आपण करत नाही, ते होते, एक शक्ती करवून घेते असा नम्र भाव त्यांनी प्रकट केला. आमोदसर यांनी ‘दीक्षा’ या शब्दावर केलेली समीक्षा की एका आर्षद्रष्टा व्यक्तीने आपणास दिलेली जबाबदारी ही दीक्षा बनते आणि ती दिशा बदलून टाकते फारच आवडली. आणि त्यावर खेर सरांची प्रतिक्रिया फारच बोलकी होती. ते म्हणाले की  पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी मला ‘सरस्वतीपूजक’ असे संबोधित केले आणि मला कळाले की मला ते असे का म्हटले असतील. त्यांनी माझ्या जीवनाची दिशा बदलली आणि मला ही महान चरित्रे जणू साद घालू लागली.

किमान तीन तास हे सत्र सुरु होते. दिवस होता गीताजयंतीचा. मांदार्य कसे जीवनाला साद घालते आणि आजच्या वाचकाला ते आपलेसे वाटतील असा अविर्भाव त्यांनी व्यक्त केला. शेवटी यानंतर काय असा प्रश्न आम्ही विचारला आणि ते उत्तर गुलदस्त्यात ठेवूयात. लवकरच त्यांनी केलेला नवा संकल्प आम्हा समोर येवोत कारण आम्ही चातकासमान वाट पाहत आहोत हे नक्की. मग मस्त स्वत: लेखकांच्या सहीने सजलेले पुस्तक हाती पडावे यापेक्षा मोठा आनंद तो काय? पुन्हा एक प्रत घेतली आणि ती रवाना होईल अश्याच वाचकांसाठी जे वाट पाहत आहेत.

सरांचे हे आजीवन सरसवती साधना करण्याचे व्रत नमस्कारार्ह आहे. अशी अनेक उदात्त चरित्रे आम्हा समोर यावीत आणि वाचंकानी त्याचा भरभरून आस्वाद घ्यावा. पुन्हा एकदा एक अविस्मरणीय संध्याकाळ लाभली यासाठी दोन्ही लेखकांचे मनापासून आभार.

-- निरंजन खैरे, आमोद वेसिकर आणि सचिन गाडेकर

Comments