सरत्या वर्षाचा लेखाजोखा (लेखन आणि वाचन ) २८/१२/१८

सरत्या वर्षाचा लेखाजोखा (लेखन आणि वाचन ) २८/१२/१८

सरते वर्ष पसार झाले सुध्दा. गतवर्षी दोन लेख लिहिले होते आणि त्यात शेवटी असे नमूद केले होते जे आजही लक्षात आहे आणि पुन्हा इथे कॉपी पेस्ट करावेसे वाटते.
“नेहमीप्रमाणे कानोसा घेतांना गेल्या वर्षात माझ्यातला बदल मी पाहिला. त्या बदलातील बदल बरच काही बदलून गेले. बदल कधीही सहजासहजी स्वीकारला जात नाही कारण नेहमीच्या झालेल्या सवयी आणि जुळलेल्या तारा गुंता करून ठेवतात. मानवी मन अनेक तज्ञ लोकांनी अभ्यासले आहे. अजूनही खूप सारे काम चालू असे त्यांचे. मानवी मनाला आपण ठेवू तसे ते राहील का? आपण सांगू तसे ते मार्गक्रमण करेल का? ते पठडीतील जगणे सोडून नवा अध्याय स्वीकारेल का? अश्या आणि अनेक अगणित प्रश्न सोडवलेत या वर्षाच्या प्रवासाने. फार काही तीर मारावे रोजच्या रोज असे ही नाही परंतु नववर्ष उगवतीला हे आपले हुंकार बनावेत. फार काही तीर मारावे रोजच्या रोज असे ही नाही परंतु नववर्ष उगवतीला हे आपले हुंकार बनावेत. 
वर्षात २० पुस्तकं रगडावीत आणि ती पुस्तके, संदर्भ मुखात येत ज्ञानधारा बनावेत. अभ्यास हा ध्यास बनावा रोजनिशी.
वर्ष सरता सरता ४ नवीन जिवाभावाची माणसे जोडावीत जी किमान सरण रचल्यावर दोन अश्रू ढाळतील.
चुका होतातच हो पण झाल्या तरी मोठ्या मनाने त्या स्वीकारत सुधार व्हावा आणि वर्धिष्णू व्हावे.
शरीर थकते रोजच्या रोज परंतु तजेलदार मन टवटवीत राहील यासाठी त्याला नाविन्य आणि स्थिरता द्यावी. ध्यान, मनन, चिंतन आणि सतत विचारमंथन व्हावे.
या दरम्यान काही बंध तुटतील वा ढिले होतील पण ते पुन्हा सावरत नव्या उंचीवर न्यावेत त्या गरुडाच्या घरट्या समान.

या २०१८ च्या वर्षात अनेक विषय लिहिण्यात आले. त्यातील काही लेख हे असे होते. मग ते अगदी पद्मावत, चर्चासत्र, संक्रांत, विवश मी- हतबल मी, पोटतिडीक आणि खरा सायन्सप्रेमी, अजूनही गुलदस्त्यात, म्ह्स्नखाई आणि मी, भूतदया आणि सर्पमित्र, वीरभद्र आणि मायंबा यात्रा, तणावमुक्त शिक्षण (भाग १,२,३), सोक्रेटीस आणि सत्य,  लग्न सोहळे आणि मंगलाष्टक,  कर्मप्रवृत्ती आणि आपण, कार्ल मार्क्स (भाग १,२), अनपेक्षित आणि संतापजनक, पहिला वाहिला प्रयत्न आणि पुस्तक, श्रद्धांजली सुपरकॉप हिमांशू रॉय, देतो-देतो, नांदा सौख्यभरे नगरकर दाम्पत्य, दाने दाने पे लिखा है, मस्त संध्याकाळ विथ श्रीपाद, वाढदिवस विशेष विशाल साळुंखे, रेड चित्रपट समीक्षा आणि  बिभीषण, डेथ विश चित्रपट समीक्षा, १२ वी पास पोराचं करायचं काय? १०२ नॉट आउट चित्रपट समीक्षा आणि मनोवस्था, न त्वं शोचीतूमर्हसी, वाढदिवस विशेष प्रशांतभाई गीते, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, सिग्नल गर्दी आणि संवेदनशीलता, पक्षीसृष्टी आणि खिडकी, कोर्पोरेटकल्लोळ पुस्तक प्रकाशन, झेप, देवा श्री गणेशा, विचारमंथन, वाढदिवस विशेष अजिंक्य कुलकर्णी, वाढदिवस विशेष डॉ. ठोंबरे, दसरा आणि सीमोल्लंघन, शांतता- फक्त कोर्टाच काम चालू आहे, दिवाळी आणि इन्विटर, वाढदिवस विशेष इसक सर, mind your mind and let him decide, मांदार्य कादंबरी (भाग १,२), introspect youself, ग्रेट भेट विथ ख्यातनाम लेखक राजेन्द्र खेर इथपर्यंत येऊन थांबले. (हे सगळे मंथन http://spandanemazi.blogspot.com  या ब्लॉगवर आहेतच.)

या लेखनात अनेकांचे प्रेम लाभले. स्पंदने माझी हा ब्लॉग हळूहळू या सगळ्याचा साक्षी बनत आहे. अर्थात अनेकवेळा असे वाटून गेले की अजून चांगलं लिहिता आलं असतं. तसा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच आहे. अधिकाधिक वाचन याला समृध्द बनवेन हे अनेकांनी सुचवले आहे आणि तसाच प्रयत्न सुरु आहे. भाकरीच्या धक्क्यात आपल्यातील ईश्वरी सृजनशीलता कधी हरवू द्यायची नाही हे महत्त्वाचे आहे.

असो, वेळेची मारामार सतत असणार आहेच. थोडा वेळ काढत स्वत:ला अजून प्रगल्भ बनवूयात. अजून थोडे पुढे जाऊयात. २०१९ तयार रहा माझ्यातला मी अजून बाकी आहे.

--- सचिन गाडेकर

Comments