सरत्या वर्षाचा लेखाजोखा (संस्मरणीय) २८/१२/१८ (भाग २)

सरत्या वर्षाचा लेखाजोखा (संस्मरणीय) २८/१२/१८ (भाग २)

हे सरते वर्ष काहीसे खास होते हे आता कळते आहे. झरझर सरणारा काळ कसा पसार झाला हे कळत देखील नाही. प्रयत्न करत धाडसाने काही निर्णय घेतले तर ते सार्थ करायला हुरूप येतो. हिम्मत उभी राहते. मांडलेला डाव रडीचा आहे हे कळले की कोणती सोंगटी फेकायची यापेक्षा हा डाव सोडून नवा अध्याय लिहिणे शहाणपण ठरते आणि ठरलेही. काही काळ होणारी घुसमट किंवा तगमग उजवी असते रोज कुढत जगण्यात. सकाळी स्मितहास्य आणि समाधान आरश्यात दिसणार नसेल तर उसणे घेतलेले अवसान लवकरच गळून पडते किंवा आतल्या आत कमजोर करते. गरज असते ती गणित करून बेरजेचा भाग स्वीकारण्याची. २०१८ हेच घेऊन आले. बरंच काही वजा झालंय असं असलं तरी बेरजेचं गणित महत्त्वाचं.

गेल्या वर्षातील अनेक बेरजा अनुभवल्या. सर्वात महत्त्वाची आणि अभिमान वाटावी अशी लेखन कामगिरी म्हणजे प्राचार्य आव्हाडसर यांच्या जीवनप्रवासावर “प्राचार्य विजय केशवराव आव्हाड (सर) शिक्षण क्षेत्राला पडलेलं एक विजयी स्वप्न !” या पुस्तकाचे माझ्याकडून लेखन झाले. लिखाण करता करता सरांच्या जीवनपटाला उलगडताना अनेक मोठ्या हस्तींना भेटण्याचा योग आला. तब्बल दहा महिने भेटीगाठी, मुलाखती आणि मग लेखन असे सर्व घडत गेले. सरांना दिलेली प्रेमाची भेटच होती ती.

आयुष्यातील पहिलं वहिलं लेखन पुष्प आपल्या आचार्यांना प्रदान करावं यापेक्षा मोठा आनंद तो काय? यासाठी सर आणि सरांचे कुटुंब या सर्वांचा मी ऋणी असणार आहे उभ्या आयुष्यात. सर,या मनातील भावनांना शब्दरूप करतांना जर काही उणीव भासली वा अपुरे वाटले तर माफ करा.

पुण्यात शिफ्ट झालो आणि जीवन अजून गतिमान झाले. Dr Pramod Thombare असो, Sharad Amrutkar असो किंवा मानसी कुटुंब असो या सगळ्यामुळे होमकमिंगचाच फील आला. वाचन तर होतेच पण त्यात भर पडत गेली हे नक्की.  मधल्या काळात प्रख्यात लेखिका  निलांबरी जोशी यांची भेट झाली. अजिंक्य कुलकर्णी  हे तुमच्यामुळे झाले हे सांगायला नको. Neelambari Joshi यांचे कार्पोरेटकल्लोळ हे पुस्तक वाचले, ते आवडले देखील. त्यांचा बहुमोल वेळ देखील मिळाला. एवढी मोठी माणसे किती साधी आणि सोपी असतात हे पुन्हा एकदा अनुभवास आले. त्यांनी केलेले लेखनाबद्दल मार्गदर्शन खूप मदतरूप ठरत आहे हे नक्की. त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे आणी शिकत आहोत आम्ही.

वर्षाच्या शेवटी शेवटी ख्यातनाम लेखक Rajendra Kher यांची  मांदार्य हि कादंबरी हातात पडली. वाचन नाही तर चक्क पारायण झाले त्या पुस्तकाचे. वर्षाचा शेवट असा गोड होईल असे वाटले देखील नव्हते. या वाचनाचा आनंद पूर्ण झाला तो त्यांच्या भेटीने. Niranjan Khaire  सर आणि  Yashvant Vesikarसर आणि मला हि अविस्मणीय भेट होती हे ठाऊक आहे. आपल्या बोबड्या बोलीचे कोणी कौतुक केले तर बरे वाटते आणि उत्साह वाढतो अजून वाचण्याचा आणि अजून चांगले लिहिण्याचा.

या सरत्या वर्षात Deep Work या पुस्तकाने प्रचंड प्रभावित केले. अनेकांना ते भेट देखील दिले आणि सर्वांचा अनुभव सारखाच होता. आजही त्यातील विचार शिस्त लावत पुढे घेऊन जात आहेत. या पुस्तकासाठी पुन्हा एकदा अजिंक्यभाई तुमचा ऋणी आहे बर का..

गेल्या वर्षात अनेक लेख लिहिले गेले. खूप वेळा व्यक्त होण्याची संधी मिळाली. किती योग्य, अयोग्य हे न ठरवणेच ठीक वाटते. नव्या आशा, नव्या दिशा आणि नव्या चेतना घेऊन यावे नवे वर्ष. नव्या हस्तींना भेटत नवे आयाम खुलावेत. सर्वांना शुभेच्छा ।

--- सचिन गाडेकर

Comments