बाबा बोलावतात तेव्हाच…” — आमची केदारनाथ यात्रा (भाग ४ - देवप्रयाग संगम)

 

बाबा बोलावतात तेव्हाच…” — आमची केदारनाथ यात्रा (भाग ४ - देवप्रयाग संगम)


हरिद्वारमध्ये सकाळी आठच्या आसपास पोटभर नाश्ता करून आमच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. पुढे ऋषिकेशकडे जाताना नेहमीप्रमाणे ट्रॅफिकने मात्र आमची चांगलीच कसोटी पाहिली. छोट्या शहरातील अरुंद रस्ते, सतत ये-जा करणाऱ्या स्थानिक जीप्स, पर्यटकांची लगबग आणि हॉर्नचा गोंगाट यामुळे ट्रॅफिक झालं होतं. नियंत्रणासाठी पोलिसांची उपस्थिती असली तरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष मदत जाणवत नव्हती. पण या सगळ्या गोंधळातही एका बाजूला हिमालयाच्या कुशीतून वाहणारी गंगा आणि त्यात सुरू असलेलं रिव्हर राफ्टिंग पाहताना मन पूर्णपणे हरखून गेलं. पाण्यावरच्या त्या बोटी, उत्साहाने ओरडणारे पर्यटक आणि गंगेच्या प्रवाहासोबत चाललेला तो थरार पाहून आमच्याही मनात उत्सुकता दाटून आली. आमचं राफ्टिंग पुढच्या आठवड्यात ठरलेलं असलं तरी ते दृश्य पाहूनच adventure ची सुरुवात झाल्यासारखं वाटू लागलं.  

 

गाडी एकदाची ट्राफिक मधून सुटली आणि पुढे निघालो. साडे बारा वाजता आम्ही भूक लागली म्हणून रणवीर भंडारी गंगा व्ह्यू ढाब्यात जेवण केलं. इथली लोकं मात्र पोटभर जेवू घालतात. प्रेमाने बोलतात. काही हवं असेल तर सांगा असं विचारतात. तिथं एक पूर्ण चार लोकांच कुटुंबच या व्यवसायात उभं दिसलं. तात्पुरता सहा महिने रोजगार हाच काय तो कार्यभाग. असो. तिथं तसंही पटकन मिळेल असे राजमा चावल किंवा कढी चावल मिळतो. सगळ्यांनी ताव मारला. टीम गणपती अगोदर पोहोचल्याने ते पुढे निघाले आणि कार्तिक ग्रुप त्यांच्या शिफारसीने राजमा खायला बसला. दहाचा गट पटकन जेवू शकतो हे तिथं लक्षात आलं. जेवण झालं आणि निघालो. सकाळी ठरलेला प्रवास आता किमान दोन तास उशीराने पुढे जात होता. सगळेच ऋषिकेशहून केदारनाथ कडे निघालेत असे चित्र होते. तसंही आता ट्राफिक नाही असं एक तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन स्थळ नाही. 

आता थांबा होता देवप्रयाग संगम. एक अशी अद्भुत जागा जिथं अलकनंदा आणि भागीरथीचा संगम होतो. अनेक उपनद्या एकमेकांत विलीन होत होत गंगा बनते. सर्व देव नमस्कारा: केशवं प्रति गच्छति|हा घाट म्हणजे एका बाजूला हिरवट अलकनंदा, दुसऱ्या बाजूला गडद भागीरथी आणि त्यांच्या मिलनातून जन्म घेणारी गंगा. पुराणांनुसार, भगवान रामांनी रावणवधानंतर ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी येथे तपश्चर्या केली होती. इथलं प्रसिद्ध रघुनाथ मंदिर त्याच स्मृतीचं प्रतीक मानलं जातं. असंही म्हटलं जातं की ऋषी “देव शर्मा” यांनी येथे कठोर तप केलं आणि त्यांच्या नावावरून या स्थळाला “देवप्रयाग” हे नाव पडलं. दुपारच्या दीडच्या आसपास आम्ही देवप्रयाग संगमावर पोहचलो. आता खाली घाटावर जाणे शक्य नसल्याने व्ह्यू पोइंट वरूनच दर्शन घेतलं.

 

 या संगामाच्या दोन ओळी फार प्रसिद्ध आहेत. त्या ह्या अश्या

तू भागीरथी सी चंचल, मैं अलकनंदा सा शांत |

मिलें जब दोनों एकसाथ, तो जन्म लेती है एक नई गंगा। || 

आता या ओळी फक्त दोन नद्यांची गोष्ट सांगत नाहीत, तर त्या जीवनाचा, नात्यांचा आणि जगण्याच्या तत्त्वज्ञानाचा खोल अर्थ उलगडतात. भागीरथी म्हणजे वेग, उत्साह, आवेग, स्वप्नं आणि धडपड… तर अलकनंदा म्हणजे स्थैर्य, शांतता, संयम आणि समजूतदारपणा. जीवनात प्रत्येक माणूस या दोन प्रवाहांपैकी कुठल्या ना कुठल्या प्रवाहासारखा असतो. कुणी भावनांनी ओसंडून वाहणारं, तर कुणी शांतपणे सगळं सामावून घेणारं. दोन व्यक्ती जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा बहुधा असंच असतं. एक भागीरथी तर दुसरा अलकनंदा. किती समपर्क आहे हा संगम. किती गोड आणि सरळ संदेश आहे आपल्या सगळ्यांना. एकसारखे छापे मारलेले दोघंही असावेत, अगदी सारे गुण, साऱ्या सवयी जुळवाव्यात हा अट्टहासचं चुकीचा.  

प्रत्येकाला ईश्वराने वेगळं घडवलं आहे. मी आहे तसा आणि आहे तितका का स्वीकारला जात नाही? का यांत्रिक समरसता हवी आहे? गंगा आणि भागीरथी यांचा वेग एकसारखा नाही. रंग एकसारखा नाही, प्रवाह एकसारखा नाही आणि तरी त्यातून जन्मते तो गंगा. कारण  खरी सुंदरता “सारखे” असण्यात नसते… ती “वेगळेपण स्वीकारण्यात” असते. दोन भिन्न स्वभाव जेव्हा अहंकार विसरून एकत्र येतात, तेव्हा त्यातून संघर्ष नाही तर “गंगा” जन्म घेते — म्हणजेच एक नवीन ऊर्जा, नवीन नातं, नवीन प्रवास आणि नवीन अर्थ निर्माण होतो.


 नात्यांमध्येही हेच सत्य आहे. फक्त प्रेम पुरेसं नसतं; समजूत, स्वीकार आणि एकमेकांच्या प्रवाहात मिसळण्याची तयारी लागते. जेव्हा एक जण धावत असतो तेव्हा दुसरा आधार बनतो; एक जण कोसळत असतो तेव्हा दुसरा शांतपणे उभा राहतो. आणि अशाच संतुलनातून नातं पवित्र होत जातं. जगाकडे पाहिलं तरी हाच नियम दिसतो. निसर्ग, समाज, विचार, संस्कृती  हे सगळं विविधतेवर उभं आहे. म्हणूनच संगम म्हणजे फक्त दोन पाण्यांचा मिलाप नाही… तो अहंकार विसरून “आपण” होण्याचा क्षण आहे. हे ईश्वरा, जर काही दान द्यायचं असेल तर हे दे. माझ्या असा आयुष्यात संगम भर जो देवप्रयाग सारखा असेल.

 


क्रमश:

प्रा. सचिन शंकर गाडेकर

(गडकरी समूह)

Comments